एअरटेलची मालकी परदेशी कंपनीकडे...!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारती टेलिकॉममधील मुख्य गुंतवणूकदार असलेल्या सिंगटेल आपला हिस्सा आता 50 टक्क्यांच्या वर वाढवणार आहे

मुंबई: देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलची भारती एअरटेल ही मुख्य प्रवर्तक कंपनी आहे. या भारती टेलिकॉममधील मुख्य गुंतवणूकदार असलेल्या सिंगटेल आपला हिस्सा आता 50 टक्क्यांच्या वर वाढवणार आहे. त्यामुळे एअरटेलची मालकी परकी कंपनीकडे जाणार आहे. सिंगटेल ही सिंगापूर येथील कंपनी असून, सिंगापूर टेलिकम्युनिकेशन्स लि. असे तिचे नाव आहे. एअरटेलमधील मोठा हिस्सा आता सिंगटेलकडे जाणार आहे. सध्या भारती एअरटेलमधील 41 टक्के इक्विटी हिस्सा भारती टेलिकॉमकडे आहे.

भारती टेलिकॉममधील 52 टक्के हिस्सा सुनिल मित्तल कुटुंबियांकडे आहे. त्यामुळे सध्या ती भारतीय मालकीची कंपनी आहे. भारती टेलिकॉममधील 48 टक्के हिश्याची मालकी सिंगटेलकडे आहे. मात्र सिंगटेलने आपला हिस्सा थोडासा जरी वाढवला तरी भारती टेलिकॉमची वर्गवारी परकी गुंतणूकीत होणार आहे. या नव्या वर्गीकरणानंतर भारती टेलिकॉमच्या संपू्र्ण 41 टक्के हिश्याचे वर्गीकरण परकी गुंतवणूकीत होणार आहे. त्यामुळे सध्याची परकी हिस्सेदारी जी 43 टक्क्यांवर आहे ती 85.07 टक्क्यांपर्यत वाढवता येणार आहे. परकी गुंतवणूक कायद्याच्या नियमांत बसत सरकारची परवानगी घेण्यासाठी भारती एअरटेलने मागील महिन्यात कंपनीतील परकी हिस्सेदारी 100 टक्क्यांपर्यत वाढवण्यासाठी अर्ज केला आहे.

सध्याच्या नियमांनुसार 49 टक्के परकी गुंतवणूक सरकारच्या परवानगीशिवाय केली जाऊ शकते तर 50 ते 100 टक्क्यांपर्यतच्या परकी हिश्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. जिओने निर्माण केलेल्या जबरदस्त आव्हानामुळे एअरटेलला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आहे. कंपनीवरील कर्जाचा बोझा वाढतच चालला आहे. कर्ज कमी करण्यासाठी भारती टेलिकॉमने सिंगटेलच्या माध्यमातून भांडवल उभारण्याचे ठरवले आहे. सिंगटेलचा भारती टेलिकॉममधील हिस्सा वाढणार असला तरी मित्तल यांचा सध्याचा 27 टक्क्यांचा हिस्सा फारसा कमी न होता 26 टक्क्यांच्या आसपास असणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एअरटेलवर मार्च 2019 अखेर 4,500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यानंतर बॉंडच्या माध्यमातून कंपनीने 3,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. त्याद्वारे कंपनी 25,000 कोटी रुपयांच्या राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singapore singtel acquires 50 percent airtel shares