'एफडी'ला पर्याय हवाय? (स्मार्ट गुंतवणूक)

मकरंद विपट 
सोमवार, 20 मार्च 2017

साधारण 2009-2010 ची गोष्ट असेल. अमितचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीची चांगली रक्कम मिळाली होती. 
 

साधारण 2009-2010 ची गोष्ट असेल. अमितचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीची चांगली रक्कम मिळाली होती. 
 

अमित: बाबा, तुमचं निवृत्तीबद्दल अभिनंदन. आयुष्यभर खूप काम केलंत, आता आराम करा. 
बाबा: धन्यवाद बेटा... 
अमित: बाबा, आता तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पैशांचं काय करणार आहात? 
बाबा: अमित, मी हे मिळालेले पैसे 2-3 वेगवेगळ्या बॅंकांत ठेवणार आणि दर महिन्याला त्याचे व्याज घेणार. म्हणजे माझा आणि तुझ्या आईचा खर्च त्या व्याजातून निघेल. 
अमित: साधारण तिथं काय व्याजदर आहेत सध्या आणि किती वर्षांसाठी ठेवणार आहात हे पैसे? 
बाबा: बेटा, सहकारी बॅंकेत वार्षिक 10 टक्के व्याज मिळतंय, त्यातून आमचा खर्च भागेल. मी ही एफडी तीन वर्षांसाठी करणार आहे. 
अमित: ठीक आहे बाबा... 

ठरल्याप्रमाणे अमितच्या बाबांनी तीन वर्षांची एफडी केली आणि दर महिन्याला ते त्याचे व्याज घेत होते. त्यांना मिळणाऱ्या रकमेवर बॅंक 'टीडीएस' करत होती. 'टीडीएस'नंतरही मिळणाऱ्या पैशांत अमितचे बाबा खूष होते, कारण त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा जो काही खर्च होता, तो 'एफडी'च्या मिळणाऱ्या व्याजातून भागत होता. 

वर्षे उलटत गेली. सगळे कसे व्यवस्थित चालले होते आणि 2013 वर्ष उजाडले. एके दिवशी अमितच्या बाबांना बॅंकेतून फोन आला. बॅंकेतील माणूस म्हणाला, ''तुम्ही तीन वर्षांपूर्वी जी 'एफडी' केली होती, ती पुढील आठवड्यात 'मॅच्युअर' होत आहे, तरी तुम्ही बॅंकेत येऊन ती 'रिन्यू' करावी. अमितचे बाबा बॅंकेत गेले. मागील 'एफडी'तून मिळणारे व्याज दरमहा काढून घेतल्याने आता 'मॅच्युरिटी'ची रक्कम जेवढी गुंतवली होती, तेवढीच मिळाली. अमितच्या बाबांनी एफडी रिन्यूअलचा फॉर्म भरला, तोही तीन वर्षांसाठी. आता मात्र एक फरक झाला. आता त्यांना 'एफडी'वर वार्षिक 8.5 टक्के व्याज मिळणार, असे बॅंकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले. बाबांचा चेहरा जरा पडला, पण दुसरा पर्यायच नव्हता. कारण या रिटायरमेंट फंडावर आता कोणतीही जोखीम त्यांना घ्यायची नव्हती. 

घरी आल्यावर अमितने विचारले... 

अमित: बाबा, केली का एफडी रिन्यू? 
बाबा: हो बेटा, पण यावेळेस व्याज फक्त 8.5 टक्केच मिळणार आहे, त्यामुळे अमित जर कधी गरज लागली तर मला तुझ्याकडून पैशांची मदत लागेल. 
अमित: ठीक आहे, बाबा... 

दिवसांमागून दिवस जात होते. अमितच्या बाबांचा खर्च त्यांनी केलेल्या 'एफडी'च्या व्याजातून कसाबसा भागत होता आणि 2016 वर्ष उजाडले. मागील वेळेसारखा परत बाबांना बॅंकेतून फोन आला. आता मात्र त्यांना 'एफडी'वर फक्त वार्षिक 7 टक्के व्याज मिळणार, असे सांगण्यात आले. अमितच्या बाबांना आता खरोखरच काय करावे ते कळत नव्हते; पण पुन्हा तोच विचार. या पैशांबाबत मला जोखीम घेऊन चालणार नाही. पुन्हा तीन वर्षांसाठी 7 टक्‍क्‍यांनी एफडी केली. घरी आल्यावर बाबांचा पडलेला चेहरा बघून अमितने विचारले... 

अमित: बाबा, काय झालंय? तुम्ही एवढ्या चिंतेत का दिसताय? 
बाबा: अरे अमित, बॅंकांच्या व्याजाचे दर दिवसेंदिवस कमीच होत चाललेत. यावेळेस तर मला 'एफडी'वर फक्त वार्षिक 7 टक्केच व्याज मिळालं. बेटा, आता मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांत नक्कीच आमचा खर्च नाही भागणार. आता मात्र आम्हाला तुझ्याकडून दर महिन्याला आर्थिक मदत नक्की लागणार. 

वाचकहो, वरील तीनही संभाषणांतून आपल्याला असे जाणवते, की बॅंकेच्या 'एफडी'चे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमती मात्र वाढत आहेत. कारण फक्त एकच, महागाईचा दर! जर आपण आपले पैसे असेच बॅंकेत 'एफडी'च्या रूपात ठेवले, तर एका मोठ्या कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला लागणाऱ्या पैशांत आणि आपल्याला दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांत खूप मोठी तफावत दिसेल. 

ही परिस्थिती जर बदलायची असेल तर एक पर्याय आहे. त्यात थोडी जोखीम आहे, पण जर आपण गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर यात फारशी जोखीम नाही, असे दिसून येईल. तो पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंडातील गुंतवणूक. जर आपण 'एफडी'मधील पैसे बॅलन्स्ड फंडात ठेवले आणि 'सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन' (एसडब्ल्यूपी) घेतला तर आपल्याला दरमहा उत्पन्नही मिळते आणि एका मोठ्या कालावधीनंतर आपली गुंतवणूक वाढण्यासही मदत होते. कारण या फंडातील काही भाग इक्विटी म्हणजे शेअर बाजारात गुंतविला जातो आणि काही भाग हा रोखे (डेट) बाजारात गुंतविला जातो. या गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे आपल्याला दरमहा मिळणाऱ्या रकमेवर करही भरावा लागत नाही. सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांचे बॅलन्स्ड फंड असतात. पण त्यातील चांगला फंड कोणता, जो जास्तीत जास्त आपल्याला परतावा देऊ शकेल, हे जाणून घेण्यासाठी एखाद्या अनुभवी सल्लागाराचा सल्ला घेऊनच यात गुंतवणूक करावी. कारण आता काळानरूप आपले विचार बदलायची गरज आहे, थोडीफार जोखीम घ्यावी लागेल. त्यासाठी नव्या पर्यायाचा विचार करायला हवा. 

(लेखक प्रिसिजन इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे सहप्रवर्तक व म्युच्युअल फंड तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Smart investment tips by Makrand Vipat on FD