शेअर बाजारात तेजीची आतषबाजी 

शेअर बाजारात तेजीची आतषबाजी 

मुंबई: अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नव्या सुधारणांची घोषणा केली जाण्याची शक्‍यता असल्याने मंगळवारी (ता. 29) भांडवली बाजारात तेजीची आतषबाजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍सने 666 अंशांची उसळी घेतली होती. दिवसअखेर तो 581.64 अंशांच्या तेजीसह 39 हजार 831.84 अंशांवर स्थिरावला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 159.70 अंशांची वाढ झाली आणि तो 11 हजार 786.85 अंशांवर बंद झाला. नव्या संवत्सराची सकारात्मक सुरुवात करणाऱ्या निर्देशांकांनी दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत सुमारे दोन लाख कोटींची भर घातली. आजच्या सत्रात ब्लुचिप शेअर्सला मोठी मागणी दिसून आली. दुसऱ्या तिमाहीतील कॉर्पोरेट्‌सचे निकाल, अमेरिका-चीनमधील दीर्घकालीन व्यापारी संघर्ष निवळण्याचे संकेत आणि देशांतर्गत सकारात्मक वातावरणाने भांडवली बाजारातील वातावरण खरेदीस पोषक बनले होते. गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकरातील कपातीच्या शक्‍यतेने आज पुन्हा उचल घेतली. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी केंद्राकडून लवकरच सुधारणांचा धडाका लावला जाईल, अशी शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर कपातीची शक्‍यता बळावली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी आज चौफेर खरेदीची संधी साधली. सलग दुसऱ्या सत्रात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 17 टक्के वाढ झाली. टाटा मोटर्सला दुसऱ्या तिमाहीत तोटा कमी करण्यात यश मिळाले. त्यामुळे गुंतवणूकदार टाटा मोटर्सच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

टाटा स्टील, येस बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा आणि टीसीएस आदी बडे शेअर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 2.30 टक्‍क्‍यांची वाढ झाली. दरम्यान, भारती एअरटेल, कोटक बॅंक, पॉवरग्रीड, एसबीआय आदी शेअरमध्ये नफावसुलीमुळे तीन टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली.

टेलिकॉम निर्देशांकात सर्वाधिक चार टक्‍क्‍यांची घसरण झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांत वाढ झाली. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात किरकोळ वाढ झाली. कच्च्या तेलाच्या भावात 0.97 टक्‍क्‍याने घसरण झाली. 



जागतिक पातळीवरील आणि देशांतर्गत सकारात्मक वृत्तांमुळे बाजारात आज तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या तिमाही निकालांनी बाजारात तेजीचे रंग भरले. सरकारकडून करप्रणाली सुटसुटीत करण्याचे संकेत असून ज्यामुळे सकारात्मक वातावरण दिसून आले. 
- सिद्धार्थ खेमका, मुख्य विश्‍लेषक, मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com