शेअर बाजाराला ‘ट्रम्प अन्‌ नोटे’चा धक्का

शेअर बाजाराला ‘ट्रम्प अन्‌ नोटे’चा धक्का

सेन्सेक्‍समध्ये मोठे चढउतार; निर्देशांक ३३२ अंशांनी कोसळला 
मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने आणि सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी मोठी अस्थिरता निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी तब्बल १ हजार ६८९ अंशांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५४१ अंशांनी गडगडला. मात्र, नंतर सुरू झालेल्या खरेदीच्या जोरामुळे सेन्सेक्‍स सावरून ३३८ अंशांच्या घसरणीसह बंद झाला. 

आज सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्‍सची घसरगुंडी सुरू झाली. याला जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुरू असलेल्या घसरणीने आणखी गती दिली. निर्देशांक २५ हजार ९०२ या नीचांकी पातळीवर पोचला. त्यानंतर ब्लू चिप कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर वाढला. त्यामुळे निर्देशांक १ हजार ४९५ अंशांनी सावरला. अखेर तो कालच्या तुलनेत ३३८ अंश म्हणजेच १.२३ टक्‍क्‍याने घसरून २७ हजार २५२ अंशांवर बंद झाला. निफ्टी सकाळी ८ हजार १०० अंशांच्या खाली आला. त्यानंतर तो सावरला. कालच्या तुलनेत १११ अंश म्हणजेच १.३१ टक्‍क्‍याने घसरून तो ८ हजार ४३२ अंशांवर बंद झाला. 

जगभरातील शेअर बाजारांत घसरगुंडी 
उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मुरब्बी राजकीय नेत्या हिलरी क्‍लिंटन यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केल्याने जगभरातील शेअर बाजारांना धक्का बसला. आशियाई देशांतील जपानच्या निक्केई निर्देशांकात ५.३६ टक्के, हाँगकाँगच्या हॅंगसेंगमध्ये २.१६ आणि चीनच्या शांघाय निर्देशांकात ०.६२ टक्के घसरण झाली. युरोपीय देशांतील ब्रिटनच्या एफटीएसईमध्ये ०.१४, फ्रान्स सीएसी १.१० आणि जर्मनी डॅक्‍स १.०३ टक्के घसरण सुरवातीच्या सत्रात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com