करोडपती शिक्षणाचा धडा!

करोडपती शिक्षणाचा धडा!

‘शिक्षण ही वर्गात प्रत्यक्ष जाऊन शिकण्याची गोष्ट आहे,’ हा काळ चालू होता तेव्हाच बायजू रवींद्रन यांनी भविष्यातील शिक्षण पद्धतीचा विचार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘बायजूज्’  हे ई-लर्निंग ॲप! या ॲपच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शिक्षणाकडे नव्या  पद्धतीने बघायला शिकवले, इतकेच नव्हे, तर त्याला एका नव्या उंचीवरही नेऊन ठेवले. 

बायजू रवींद्रन यांचा जन्म १९८० मध्ये केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या गावी झाला. त्यांचे आई व वडील दोघेही शिक्षक होते. रवींद्रन यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील शाळेत झाले. त्यांना अभ्यासापेक्षा क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये अधिक रस होता, म्हणून त्यांनी कधीही आपल्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित केले नाही. गणित विषय चांगला असल्याने त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवून, शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीत दोन वर्षे काम केले.

कंपनीच्या कामानिमित्ताने मंगळूरला आले, तेव्हा तिथे त्यांचे काही मित्र ‘कॅट’ परीक्षेची तयारी करीत होते. त्यांच्या मित्रांनी गणित शिकविण्यासाठी रवींद्रन यांची मदत मागितली. ते गणित विषयात पारंगत असल्याने, त्यांनी आपल्या मित्रांना मदत केली. २००३ मध्ये त्यांनी स्वत: परीक्षा दिली व १०० टक्के गुण मिळविले. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शिकवायला सुरवात केली. 

सुरुवातीला घराच्या बाल्कनीमध्ये ते मुलांना शिकवू लागले. त्यांची प्रसिद्धी वाढू लागल्यावर, मोठा हॉल घेऊन शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी शिकविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला. २०११ मध्ये त्यांनी ‘थिंक अँड लर्न’ची स्थापना केली. त्यानंतर २०१५ मध्ये ‘बायजूज्’ नावाचे मुख्य ॲप त्यांनी सादर केले. 

रवींद्रन यांच्या पत्नी दिव्या गोकूळनाथ या कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत. त्या रवींद्रन यांच्या सुरवातीच्या विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. बंगळूरच्या ‘आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर दिव्या आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये अर्ज करीत होत्या. त्यासाठी ‘जीआरई’ परीक्षा पास होण्यासाठी त्यांना गणित कौशल्ये सुधारण्याची आवश्‍यकता होती. त्यांनी एका मित्राकडून रवींद्रन यांच्याबद्दल ऐकले.  तिथे शिकून ‘जीआरई’ परीक्षा दिल्यानंतर दिव्या यांनी रवींद्रन यांना फोन करून परीक्षा दिल्याचे कळविले. त्यावेळी रवींद्रन यांनी परीक्षेचा निकाल येईपर्यंत त्यांच्याकडेच इतर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे दिव्या यांनी शिकवायला सुरवात केली. 

२१ वर्षांच्या असलेल्या दिव्या यांना विद्यार्थ्यांपेक्षा मोठ्या दिसण्यासाठी साडी नेसावी लागत असे, तिथेच त्यांना शिकविण्यामध्ये रूची असल्याचे जाणवले. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अमेरिकेतील काही विद्यापीठांमध्ये त्यांची निवड झाली होती. परंतु, त्यांनी अमेरिकेत न जाता, येथेच राहायचे ठरविले. 

आता त्या रवींद्रन यांना कंपनी चालविण्यास मदत करतात. सध्या रवींद्रन आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती २२.३ हजार कोटी रुपयांची असून, ते देशातील ४६ व्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती आहेत. ‘बायजूज्’च्या गुंतवणूकदारांमध्ये मार्क झुकेरबर्ग आणि ‘टेंन्सेंट’, ‘सोफिना’ आदींचा समावेश आहे. ‘ॲप’च्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीतील शालेय मुलांना शिक्षण देणे, हे उद्दिष्ट आहे. ‘बायजूज्’ अॅप आतापर्यंत ४.२ कोटी वेळा डाउनलोड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com