भांडवलासाठी अशी हवी ‘अर्थ’पूर्ण तयारी

Capital
Capital

कोणते गुंतवणूकदार तुम्हाला हवेत, त्याची ‘विशलिस्ट’ तयार करा
संभाव्य गुंतवणूकदार ओळखणे, शोधणे व त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी तंत्रज्ञान आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सचा फायदा करून घ्या. त्या गुंतवणूकदाराची बलस्थाने, त्याला कोणत्या क्षेत्रांत रस आहे, त्याचे गुंतवणुकीचे प्रमाण आदी गोष्टी जाणून घेण्यासाठी संशोधन करा. या गुंतवणूकदाराने यापूर्वी केलेल्या गुंतवणुका आणि सार्वजनिक डोमेनमध्ये असलेली माहिती यांवरून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. इथे सहा मार्ग दिले आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही गुंतवणूकदाराबाबत संशोधन करू शकता आणि त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. 
1) Gust (https://gust.com/)
2) Angel list (https://angellist.co)
3) Crunchbase (http:// crunchbase.com/)
4) OddUp (www.oddup.com)
5) LinkeIn
6) Angel investment networks (Venture catalysts, Lets Venture, ah Ventures etc.)

तुमच्याकडे उत्तम उत्पादन असेल, तर तुम्ही kickstarter आणि indiegogo यांसारख्या क्राऊड फंडिंगला मुभा देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवरही तुमचे उत्पादन लिस्ट करण्याचा विचार करू शकता. जे लोक ‘अर्ली-ॲडॉप्टर्स’ म्हणजे नवीन उत्पादन वापरण्याबाबत इच्छा असणारे असतात आणि जे तुमच्या उत्पादनाला ‘प्री-ऑर्डर’ करू शकतात आणि तुमच्या उत्पादन विकासाच्या भांडवल गरजा भागवू शकतात त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स उपयुक्त ठरू शकतात.

सादरीकरण आणि आर्थिक मॉडेल तयार करा
‘पिच डेक’ म्हणजे तुमचा व्यवसाय स्पष्ट करणारी आणि तुमचे उत्पादन, सेवा किंवा सोल्युशन यांतील वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारी चित्रे आणि डेटा यांचा समावेश असलेले सादरीकरण. तुम्ही वेगवेगळ्या व्यावसायिक गुंतवणूकदारांपर्यंत जात असता, तेव्हा त्यांना व्यावसायिकदृष्ट्या योग्य मांडणी केलेला बिझनेस प्लॅन अपेक्षित असतो. तुम्ही बाजारपेठेकडे कसे बघता आणि तुमचा व्यवसाय पुढच्या बारा महिन्यांत, तीन वर्षांत किंवा पाच वर्षांत कसा आकार घेईल याबाबतचे तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी ‘पिच डेक’ ही चांगली संधी असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमचे ‘पिच डेक’ सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा स्लाइड्सचे असावे आणि त्यात खालील मुद्दे असावेत. :

  • एकूण सारांश (Executive Summary) : तुमच्या एकूण व्यवसायदृष्टीची तोंडओळख करून देणारी एक स्लाइड.
  • प्रॉब्लेम आणि सोल्युशन/ व्हॅल्यू प्रपोझिशन : तुमचे उत्पादन वैशिष्ट्यपूर्ण का आहे आणि ते लगेच कॉपी का करता येणार नाही त्याबाबत स्पष्टीकरण.
  • बाजारपेठेचे शिक्कामोर्तब : तुमचे उत्पादन किंवा सेवेसाठी पैसे खर्च करणारा ग्राहक तुमच्याकडे आहेत हे दाखवण्याचा हा एक मार्ग असतो.
  • उत्पादनाच्या बाजारपेठेचा आकार : तुमची कंपनी किती मोठी होऊ शकते आणि बाजारपेठ संधी किती मोठी आहे हे दाखवण्याचा हा मार्ग असतो. याचे विश्लेषण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि तुम्हाला त्यासाठी मदत लागली, तर तुम्ही आमच्याकडे मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता. 
  • बिझनेस मॉडेल : तुम्ही कसे उत्पन्न मिळवणार आहात, ग्राहकांकडून कशी आकारणी करणार आहात, ‘प्रायसिंग मॉडेल’ इत्यादीबाबत माहिती.
  • स्पर्धा : तशीच सेवा देणाऱ्या इतर कोणत्या कंपन्या आहेत?  
  • स्पर्धेतले तुमचे बलस्थान : तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या तुलनेत जास्त चांगले का आहात?
  • मार्केटिंग प्लॅन / गो-टू मार्केट : तुमचे उत्पादन ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही कोणती धोरणे किंवा तंत्रे वापरणार आहात?
  • संस्थापक टीम : हा व्यवसाय उभारणारे प्रोप्रायटर्स किंवा संस्थापक कोण आहेत, ते हा व्यवसाय चालवण्यासाठी योग्य का आहेत?
  • बोर्ड/ ॲडव्हायजर्स : तुमच्या सल्लागार मंडळामध्ये उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ असणे नेहमी मदतीचे ठरते.  
  • ट्रॅक्शन (Traction)/ माइलस्टोन्स (Milestones) : या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे किती ग्राहक आहेत, तुमचा व्यवसाय कसा उत्पन्न मिळवतो आहे इत्यादी सांगू शकता.
  • माध्यम/ युजर/ ग्राहक यांची ‘टेस्टिमोनिअल्स’
  • फंडरेझिंगबाबत विचारणा : तुम्हाला किती भांडवल पाहिजे आहे, ते किती काळ तुमच्या उद्योगाला पुरेल?
  • भांडवलाचा उपयोग : हे भांडवल मिळाले, की ते उद्योगाला कशा प्रकारे उपयोगी ठरेल?

नफा आणि तोटा, भांडवलाचा पुरवठा आदींबाबत तुम्हाला ‘फायनान्शिअल प्लॅन’ तयार करावा लागतो, तेव्हा बाजारपेठेच्या वाढीचा वेग, ग्राहक मिळवण्यासाठीचा खर्च आदी गोष्टींबाबत तुमचे नक्की अंदाज आहेत याबाबत तुम्हाला स्पष्टता ठेवावी लागेल. हा सगळा ‘फायनान्शिअल प्लॅन’ तयार करण्यासाठी तुमच्याकडे तज्ज्ञ नसतील, तर बाहेरच्या व्यावसायिकांची मदत घ्या. अशा प्रकारे भांडवल उभारणीसाठी एखाद्या स्टार्टअपबरोबर आधी काम केलेली व्यक्ती तुमच्या नेटवर्कमध्ये असेल, तर तिचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकेल.  आणखी एक पर्याय म्हणजे आकड्यांवर कमांड असलेल्या उत्तम चार्टर्ड अकाऊंटंटबरोबर काम करणे. मात्र, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे धोरणत्मक आणि उद्योगविषयक गरजा या तुम्हीच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 

तुमचे सादरीकरणाचे भाषण अधिक नेमके करा
आपली सगळी तयारी चालली आहे ती म्हणजे पैसे मागण्यासाठी! साहसवित्त भांडवलदारांनी भरलेली खोली असो, एखाद्या बँकरशी समोरासमोर करत असलेली चर्चा असो, किंवा एखाद्या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर काही सादरीकरण करणे असो-तुमचे भाषण अतिशय नेमके आणि प्रभावीच असले पाहिजे. तुमचे ‘इलेव्हेटर पिच’ म्हणजे सादरीकरणाच्या भाषणासाठी तुम्ही असा आराखडा वापरू शकता. हा केवळ सूचक आराखडा असून, शब्द प्रत्येकाच्या सादरीकरणात बदलू शकतात, हे लक्षात घ्या.

  • आमचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे.... (मुख्य कृतीचा उल्लेख). हे काम .....सारखेच (सुयोग्य तुलना) सोपे ठरेल. 
  • गेल्या दशकात आपण बघितले आहे ते म्हणजे.... (दोन-तीन ट्रेंड्सचा उल्लेख). हे ट्रेंड्स वाढण्याची शक्यता आहे-कारण.... (तंत्रज्ञानविषयक, नियामक किंवा स्पर्धात्मक प्रगती)   
  • कल्पना करा, तुम्ही ..... हे (साध्य होणारे संभाव्य काम), फक्त.... च्या साह्याने (युजरला करावी लागणारी किमान कृती) करू शकता. आम्ही ....... हे केल्याकेल्याच (कंपनीकडून विकसित होत असलेली क्रिटिकल गोष्ट) हे प्रत्यक्ष साध्य करू शकतो.
  • एकदा हे साध्य झाले, की आम्हाला अपेक्षित असलेली बाजारपेठ ....यांच्यापासून (सध्या अपेक्षित असलेला ग्राहकवर्ग) सुरू होऊ शकतेच, पण.... यांचाही (भविष्यातील ग्राहकवर्ग) त्यात समावेश होऊ शकतो. 
  • याचबरोबर आम्ही..... ही समस्याही (सध्या भेडसावत असलेला प्रश्न) टाळू शकतो. याच दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो आहोत. 

मोकळ्या जागांच्या जवळ कंसात दिलेल्या सूचना आता नीट समजून घेऊ. 

  • मुख्य कृतीचा उल्लेख : तुमच्या ग्राहकांनी तुमचे उत्पादन किंवा सेवा वापरताना अपेक्षित असलेली कृती कोणती?
  • सुयोग्य तुलना : तुमची कल्पना स्पष्ट होण्यासाठी योग्य तुलना कोणती होईल? (उदाहरणार्थ, ‘जणू उबेरची टॅक्सी बोलावण्यासारखेच’)  
  • ट्रेंड्सचा उल्लेख : तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारे आर्थिक, ग्राहकविषयक किंवा तंत्रज्ञानविषयक ट्रेंड्स कोणते आहेत?
  • तंत्रज्ञानविषयक, नियामक किंवा स्पर्धात्मक प्रगती : नुकतेच झालेले तंत्रज्ञानविषयक, नियामक किंवा स्पर्धात्मक बदल कोणते आहेत ज्यांच्या अभावामुळे तुमची कल्पना आधी प्रत्यक्षात येणे शक्य नव्हते? 
  • होणारे संभाव्य काम : तुमच्या ग्राहकाचे असे कोणते काम होऊ शकते जे आज जवळजवळ शक्य नाही?
  • युजरला करावी लागणारी किमान कृती : ग्राहकाला वर उल्लेख केलेले काम साध्य करण्यासाठी कोणती किमान कृती करावी लागेल?
  • कंपनीकडून विकसित होत असलेली क्रिटिकल गोष्ट : कंपनीला कोणती गोष्ट विकसित करणे गरजेचे आहे याबाबत (फार तपशिलात न जाता) सूचक ‘हिंट’
  • सध्या अपेक्षित असलेला ग्राहकवर्ग : सध्या तुम्ही कोणत्या प्रकारच्या ग्राहकवर्गावर भर देत आहात?
  • भविष्यातील ग्राहकवर्ग : भविष्यात कोणत्या ग्राहकवर्ग हे तुमचे लक्ष्य असेल? तो ग्राहकवर्ग मिळवण्यासाठी तुम्ही कसे पात्र व्हाल?
  • सध्या भेडसावत असलेला प्रश्न : तुमच्या दृष्टिकोनाला बाधा आणू शकणारा कोणता प्रश्न आहे आणि तो प्रश्न कसा सुटू शकतो?

पर्सनल टच
तुमच्या उद्योग संधीबाबत सादरीकरण करत असताना ती एखाद्या गोष्टीसारखी सादर करता येते का ते बघा, तिला पर्सनल टच द्या. तुमच्या सादरीकरणात तुमची उद्योगाबाबतची पॅशन प्रतिबिंबित होईल असे बघा. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com