‘एलआयसी’चा आयपीओ आता अधिकच आकर्षक?

‘एलआयसी’चा आयपीओ आता लवकरच बाजारात धडकण्याची शक्यता...
Suhas Rajderkar writes share market LIC IPO
Suhas Rajderkar writes share market LIC IPOsakal
Summary

प्रशासकीय कामे जरी उरकली असली तरीसुद्धा रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार खूपच अस्थिर झाला. त्यामुळे या आयपीओला उशीर झाला. परंतु, एका अर्थी, झाले ते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायद्याचेच झाले. कसे ते पाहूया.

मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदार ज्या प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) आतुरतेने वाट पाहात होते, तो ‘एलआयसी’चा आयपीओ आता लवकरच बाजारात धडकण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता, सरकारला हा आयपीओ याआधीच बाजारात आणायचा होता. त्यासाठी ‘एलआयसी’मधील प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम, ‘दीपम’ अर्थात डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेंट मॅनेजमेंट, बँकर, कायदेतज्ज्ञ, असे शेकडो लोक दिवस-रात्र काम करीत होते. प्रशासकीय कामे जरी उरकली असली तरीसुद्धा रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार खूपच अस्थिर झाला. त्यामुळे या आयपीओला उशीर झाला. परंतु, एका अर्थी, झाले ते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायद्याचेच झाले. कसे ते पाहूया.

प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) शेअरची किंमत ठरविण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे म्हणजेच ‘एलआयसी’चे मूल्य काढण्यात आले होते. ते साधारणपणे १६ लाख कोटी रुपये इतके होते. जर का हा आयपीओ मार्च महिन्यात किंवा त्या आधीच आला असता तर या मूल्यांकनानुसार शेअरची किंमत ठरविण्यात आली असती, जी निश्चितच जास्त असती. परंतु, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकी फेडरलने वाढविलेले व्याजदर, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, चलनवाढ आदी कारणांमुळे मागील काही महिन्यांत शेअर बाजार खूपच अस्थिर राहिला. बाजाराचे आणि गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खाली गेले. या सर्व बदललेल्या पार्श्वभूमीवर, ‘एलआयसी’चे मूल्य परत नव्याने काढण्यात आले. आता ते साधारणपणे ३० टक्क्यांनी घसरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ते अंदाजे ११ लाख कोटी रुपये इतके आले असावे. अर्थातच, एका शेअरची किंमत पूर्वी ठरविलेल्या किमतीपेक्षा कमी होणे अपेक्षित आहे. सरकारच्या खजिन्यामध्ये सुद्धा यामुळे कमी पैसे येतील. एकूणच, याचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

सरकारने त्यांच्या एकूण भागभांडवलापैकी ५ टक्के जरी भाग विकायचे ठरविले, तरी तो आकडा ५५,००० कोटी रुपये इतका मोठा ‘आयपीओ’ असेल. एका शेअरची मूळ किंमत १० रुपये असेल. त्यावर किती जादा रक्कम (प्रीमियम) घेतली जाईल, ते लवकरच घोषित करण्यात येईल. तरी सुद्धा ती साधारणपणे २५०० रुपयांच्या आसपास असावी, असे संकेत आहेत. ‘एलआयसी’ने साधारणपणे ५० ‘अँकर इन्व्हेस्टर’ नक्की केले आहेत; ज्यामध्ये ब्लॅकरॉक, फिडेलिटी, जेपी मॉर्गन, स्टॅंडर्ड लाईफ अशी मातब्बर आणि मोठी नावे आहेत. एलआयसीचा आयपीओ हा भारतामधील सर्वांत मोठा आयपीओ ठरणार असून, शेअरचे ‘लिस्टिंग’ झाले, की त्यांचे बाजारमूल्य हे रिलायन्स आणि टीसीएस या कंपन्यांच्या बरोबरीला येईल, असे म्हटले जाते.

तात्पर्य: बहुतेक गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत, असे दिसते आणि त्यातील बहुतांश गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओद्वारे प्रथमच शेअर बाजारात उतरत आहेत. अर्थातच, सरकारला त्यांना नाराज करायचे नाही. परंतु, पेटीएम आणि त्यासारख्या इतर आयपीओं नी केलेली घोर निराशा ताजी आहे. एलआयसीच्या आयपीओतील शेअरची किंमत, विमाधारकांसाठी राखीव शेअरचा कोटा, रिटेल गुंतवणूकदारांना किमतीमध्ये सवलत हे सर्व अधिकृतपणे घोषित झाल्यानंतरच, गुंतवणूकदारांनी सावधपणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या ‘आयपीओ’ला अर्ज करणे योग्य राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com