अर्थभान : टीसीएस बायबॅक : एक फायदेशीर सौदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TCS

अर्थभान : टीसीएस बायबॅक : एक फायदेशीर सौदा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअर बायबॅकसाठी (पुनर्खरेदी) २३ फेब्रुवारी २०२२ ही ‘रेकॉर्ड तारीख’ जाहीर केली आहे. या ‘बायबॅक’चा लाभ घ्यायचा असेल, तर खरेदीचा आजचा (२१ फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. याचे कारण, टी+२ सेटलमेंटप्रमाणे आज खरेदी केलेले शेअर तुमच्या डिमॅट खात्यामध्ये २३ फेब्रुवारीला येतील व ‘बायबॅक’साठी पात्र असतील. अशा ‘बायबॅक’ची नक्की काय पद्धत असते आणि किती फायदा होऊ शकतो, ते थोडक्यात पाहू.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) शेअरचा शुक्रवारचा (१८ फेब्रुवारी) बंद भाव होता ३७९५ रुपये आणि ‘बायबॅक’चा भाव आहे ४५०० रुपये. म्हणजेच बाजारभावापेक्षा यावर साधारणपणे १९ टक्के प्रीमियम मिळताना दिसत आहे. त्यामुळे बहुतेक गुंतवणूकदारांचा असा गैरसमज होण्याची शक्यता असते, की आज ‘टीसीएस’चे कितीही शेअर ३७९५ रुपयांच्या आसपासच्या भावाला खरेदी करून लगेच ४५०० रुपयांना ‘बायबॅक’साठी देऊन एका शेअरमागे ७०० रुपयांच्या आसपासचा नफा सहजपणे कमावता येईल. (खरोखर तसे झाले असते तर देशात आज ७ कोटी नाही, तर ७० कोटी डी-मॅट खाती झाली असती.) पण प्रत्यक्षात तसे होत नसते.

शेअर बायबॅक म्हणजे?

बायबॅक म्हणजे, कंपनी स्वतःच आपले शेअर खरेदी करून ते रद्द करते आणि भागभांडवल कमी करते. हा एक कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा संकेत असून, कंपनीकडे भरपूर रोख ‘रिझर्व्ह’ आहेत, हे दिसते. टीसीएस या वेळेला एका शेअरला ४५०० रुपये या भावाने स्वतःचे तब्बल चार कोटी शेअर खरेदी करणार आहे. म्हणजेच एकूण बंपर १८,००० कोटी रुपये. परंतु, जर चार कोटींच्या वर शेअर ‘बायबॅक’साठी आले, तर ते त्या प्रमाणात (रेशो) स्वीकारले जातात. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के राखीव कोटा आहे. अर्थात, २७०० कोटी रुपयांचे ६० लाख शेअर फक्त रिटेल गुंतवणूकदारांकडूनच खरेदी करण्यात येतील. रिटेल गुंतवणूकदार म्हणजे ज्यांच्याकडे ‘टीसीएस’चे दोन लाख रुपयांपर्यंतचेच शेअर आहेत. बायबॅक किंमत ४५०० रुपये ठरविल्यामुळे, रिटेल विभागामध्ये येण्यासाठी, एका डिमॅट खात्यामध्ये ‘टीसीएस’चे कमाल ४४ शेअर पाहिजेत. त्या वरील शेअरसाठी राखीव कोटा नसतो.

रिटेल गुंतवणूकदारांना किती फायदा?

या प्रश्नाचे उत्तर ‘बायबॅक’साठी किती शेअर येतात, त्यावर अवलंबून आहे. जितके जास्त शेअर येतील, तेवढा फायदा कमी होत जाईल. रिटेल विभागासाठी १५ टक्के म्हणजेच ६० लाख शेअर हा कोटा राखीव आहे. परंतु, समजा रिटेल विभागामधून, दुप्पट म्हणजे १.२० कोटी शेअर ‘बायबॅक’साठी आले, तर ५० टक्के रेशो होतो. अर्थात, तुमच्याकडील ४४ शेअरपैकी फक्त २२ शेअर हे बायबॅकसाठी स्वीकारले जातील आणि २२ शेअर तुमच्याकडे राहतील.

या आधीच्या उदाहरणांचा विचार केला, तर असे दिसून येते, की बहुतांश भागधारकांना बायबॅकची तारीख, पद्धत आणि फायदे माहिती नसल्याने ते त्यांचे शेअर बायबॅकसाठी पाठवत नाहीत. त्यामुळे उरलेल्या भागधारकांना फायदा होऊन त्यांचे १०० टक्के शेअरसुद्धा बायबॅक केले जाऊ शकतात. मे २०१७ मधील टीसीएसच्या ‘बायबॅक’वेळी रिटेल विभागामध्ये १०० टक्के शेअर स्वीकारले गेले होते. परंतु, यावेळेला आपण रिटेलसाठीचा शेअर स्वीकारण्याचा रेशो (सावधपणे) ७० टक्के येईल, असे गृहीत धरू.

म्हणजेच, तुम्ही जर ४४ शेअर ‘बायबॅक’साठी दिले तर त्यातील ३१ शेअर स्वीकारले जातील. तुमची खरेदी किंमत जर एका शेअरला ३८०० रुपये अशी गृहीत धरली, तर ३१ शेअरवर नफा होतो २१,७०० रुपये. परंतु, तुमच्याकडे अजून १३ शेअर शिल्लक आहेत, ज्याची किंमत बाजारभावाप्रमाणे वर-खाली होईल. आपण जर ३१ शेअरवर झालेला फायदा उरलेल्या १३ शेअरच्या खरेदी किमतीमधून वजा केला तर उरलेल्या १३ शेअरसाठी, एका शेअरची खरेदी किंमत होते, २१३० रुपये. याचाच अर्थ, बाजारामध्ये जोपर्यंत ‘टीसीएस’च्या एका शेअरचा भाव २१३० रुपयांच्या खाली जात नाही, तोपर्यंत तुम्हाला तोटा होणार नाही. या कंपनीची सध्याची कामगिरी पाहता, नजीकच्या काळात या शेअरचा भाव २१३० रुपये इतका खाली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.

तात्पर्य

‘टीसीएस’चे जास्तीत जास्त ४४ शेअर आजच खरेदी करून ‘बायबॅक’साठी देणे फायद्याचे वाटते.

(लेखक भांडवली बाजाराचे अभ्यासक आणि गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Web Title: Suhas Rajderkar Writes Tcs Buyback Profitable Deal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ArthavishwaTCS
go to top