70 ते 75 हजार कोटींचा चलनपुरवठा केला जाणार : गर्ग

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

''देशातील रोख रकमेच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असून, सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिकच रोख रक्कम आहे. बँकांमध्येही पुरेशी रक्कम आहे. काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त आणि तेही अचानक व्यवहार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने तोडगा काढला जात आहे.''

- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली : देशातील काही ठिकाणी मोठा चलनतुटवडा निर्माण झाला आहे. निर्माण झालेला हा चलनतुटवडा सुरळीत करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यावर आज (मंगळवार) अर्थ कामकाज उपसचिव एस. सी. गर्ग यांनी सांगितले, की पाचशे कोटी मूल्याच्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटांची दरदिवशी छपाई सुरु करण्यात आली आहे. या महिन्यात 70 ते 75 हजार कोटींचा पुरवठा केला जाणार आहे. 

Cash India

देशातील काही राज्यांमध्ये जाणवणाऱ्या रोख रकमेच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज (मंगळवार) एक समिती स्थापन केली. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले, की ''काही भागांमधून अचानक आणि नेहमीपेक्षा जास्त व्यवहार झाल्यामुळे काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील रोख रकमेच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असून, सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिकच रोख रक्कम आहे. बँकांमध्येही पुरेशी रक्कम आहे. काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त आणि तेही अचानक व्यवहार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने तोडगा काढला जात आहे.''

याबाबत गर्ग यांनी सांगितले, ''पाचशे कोटी मूल्याच्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटांची दरदिवशी छपाई सुरु करण्यात येत आहे. या महिन्यात 70 ते 75 हजार कोटींचा चलनपुरवठा केला जाणार आहे. यासाठी आम्ही पाचवेळेस याच्या निर्मितीबाबत पावले उचलत आहोत. त्यानुसार येत्या काही दिवसांत 2500 कोटी मूल्याच्या पाचशे रुपयांच्या नोटांची दरदिवशी छपाई करणार आहोत''.
 

Web Title: supply would be about 70000 75000 crores say Finance Secretary S C Garg