अनिल अंबानींच्या 'आरकॉम'ला झटका

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

रिलायन्स कम्युनिकेशनला (आरकॉम) झटका देत सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमची मालमत्ता रिलायन्स जिओला विकण्यासंदर्भात स्थगिती दिली आहे.

मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशनला (आरकॉम) झटका देत सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमची मालमत्ता रिलायन्स जिओला विकण्यासंदर्भात स्थगिती दिली आहे. बँकांच्या समूहाने आरकॉमच्या 25 हजार कोटींच्या मालमत्तेची विक्री करण्यास स्थगिती आणण्याची याचिका दाखल केली होती. त्यावर  न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद देत मालमत्ता विकण्यासंदर्भात स्थगिती दिली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच मालमत्ता विक्रीवर स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. आता न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 5 एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. बुधवारी आरकॉमच्या रोखेधारकांनी कर्ज कमी करण्यासाठी मालमत्ता विकण्यास परवानगी दिली होती. आरकॉमवर मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, 44,300 कोटी रुपयांचे (6.8 अब्ज डॉलर्स) कर्ज आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या दूरसंचार कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर्ज आरकॉमवर आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात आरकॉमचा शेअर 4.37 टक्के घसरणीसह 24.10 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु. 6,651.11 कोटींचे बाजारभांडवल आहे.  

Web Title: Supreme Court orders status quo on RCom's assets sale to Reliance Jio

टॅग्स