'टाटा'च्या कंपन्यांना 10,700 कोटींचा फटका

पीटीआय
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

आशियायी बाजारपेठेत संमिश्र वातावरण
आशियायी बाजारपेठेत आज संमिश्र वातावरण होते. हॉंगकॉंगच्या निर्देशांकात घसरण तर चीन आणि जपानच्या निर्देशांकात वाढ झाली. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये सुरवातीला तेजी दिसून आली.

मुंबई : टाटा समूहातील अंतर्गत घडामोडींचा फटका मंगळवारी समूहातील कंपन्यांना बसला. टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागात 3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. टाटा समूहातील सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 10 हजार 700 कोटी रुपयांनी आज कमी झाले.

टाटा समूहातील अंतर्गत घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजारात आज घसरणी झाली. बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 87 अंशांनी घसरुन 28 हजार 91 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17 अंशांनी घसरून 8 हजार 691 अंशांवर बंद झाला. टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील कायदेशीर लढाईच्या चिंतेने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली. या नव्या "कॉर्पोरेट युद्धा'च्या चिन्हामुळे परकी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला. टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांवर आज विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्‍स 87 अंशांनी घसरून 28 हजार 91 अंशांवर बंद झाला. काल निर्देशांकात 101 अंशांची वाढ झाली होती.

टाटा इलॅक्‍सी 1.40, टाटा कम्युनिकेशन्स 2.26, इंडियन हॉटेल्स 3.16, टाटा केमिकल्स 2.09, टायटन 1.19 आणि टाटा मेटालिक्‍स 4.97 टक्के घसरण झाल्याने सेन्सेक्‍सला फटका बसला. टाटा स्टील 2.51, टाटा पॉवर 1.5, टीसीएस समभागात 1.20 आणि टाटा मोटर्सच्या 1.07 टक्के घसरण झाल्याने निफ्टी घसरला. टीसीएसचे बाजार भांडवल 5 हजार 753 कोटी रुपयांनी कमी होऊन 4 लाख 72 हजार 636 कोटी तर टाटा मोटर्सचे बाजार भांडवल 2 हजार 432 कोटी रुपयांनी कमी होऊन 1 लाख 58 हजार 990 कोटी रुपयांवर आले. टाटा समूहातील सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण 10 हजार 668 कोटी रुपयांची घसरण झाली.

Web Title: Tata Sons suffers loss of 10 thousand crores after Cyrus Mistry Outster