एकटी TCS अख्ख्या पाकिस्तान शेअर बाजाराला भारी !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जगभरात 128 देश असे आहेत ज्यांचा जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) 100 बिलियन डॉलरपेक्षा कमी आहे. यामध्ये श्रीलंका, इक्वेडोर, स्लोवाकिया, केनिया, लंक्झेमबर्ग, कोस्टा रिका, बल्गेरिया, बेलारूस आणि जॉर्डनसारख्या देशांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : भारताची टीसीएस ही आयटी कंपनी सोमवारी 100 बिलियन डॉलर बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 

टाटांचा कोहिनूर

टीसीएस टाटा उद्योग समूहाच्या मुकुटातील कोहिनूर आहे. टीसीएसच्या कामगिरीचे खूप कौतुकही झाले. 2018 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मिळविलेल्या 6,904 कोटींच्या भरभक्कम नफ्यामुळे टीसीएसच्या बाजारमूल्यात घवघवीत वाढ झाली आहे. त्यामुळे टीसीएस 100 बिलियन डॉलर बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठित गटात विराजमान झाली. या गटात अॅमेझॉन, फेसबुकसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जगभरात फक्त 63 कंपन्या या गटात आहेत. यावरून त्याचे महत्व लक्षात यावे.

पाकिस्तानच्या शेअर बाजारपेक्षा मोठी

पाकिस्तानच्या शेअर बाजारात 559 कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. सद्यस्थितीत एका अमेरिकी डॉलरचे मूल्य पाकिस्तानच्या जवळपास 116.04 रुपयांइतके आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या एकूण शेअर बाजाराचे मूल्य जवळपास 80 बिलियन डॉलर आहे. त्याउलट एकट्या टीसीएसचे बाजारमूल्य 100 बिलियन डॉलर आहे. म्हणजेच टीसीएसचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या शेअर बाजाराच्या एकत्रित मूल्यापेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे. 

128 देशांचा जीडीपी 

जगभरात 128 देश असे आहेत ज्यांचा जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) 100 बिलियन डॉलरपेक्षा कमी आहे. यामध्ये श्रीलंका, इक्वेडोर, स्लोवाकिया, केनिया, लंक्झेमबर्ग, कोस्टा रिका, बल्गेरिया, बेलारूस आणि जॉर्डनसारख्या देशांचा समावेश आहे. 

जगात फक्त 65 देश असे आहेत, ज्यांचा जीडीपी 100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. यावरून आपल्याला या 100 बिलियन डॉलर बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या गटाचे महत्व लक्षात येते.

Web Title: TCS Company Share Price Very Higher Than Pakistan Share Market