दोन लाखांवरच्या सोने खरेदीवर 1 टक्का “टीसीएस’

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मोठ्या रोख व्यवहारांमध्ये होत असलेला काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी सरकारने आधीची यासाठीची 5 लाख रुपयांची मर्यादा रद्द केली आहे

नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांची खरेदी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रोखीने केल्यास 1 एप्रिलपासून उद्गम कर भरणा (टीसीएस) 1 टक्का द्यावा लागणार आहे. सध्या ही मर्यादा 5 लाखांपर्यंतच्या खरेदीसाठी आहे.

अर्थ विधेयक 2017 संमत झाल्यानंतर सोन्याचे दागिनेही सर्वसाधारण वस्तू म्हणून गृहीत धरण्यात येणार आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार वस्तू व सेवांच्या 2 लाख रुपयांवरील खरेदीवर 1 टक्का "टीसीएस' आकारण्यात येतो. आता या वस्तूंमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची 2 लाखांपेक्षा अधिक रोखीने खरेदी करताना 1 टक्का टीसीएस 1 एप्रिलपासून द्यावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्राप्तिकर विभाग सोन्याच्या विटांची 2 लाखांपेक्षा अधिक रोखीने खरेदी आणि दागिन्यांची 5 लाखांपेक्षा अधिक रोखीने खरेदी यावर 1 जुलै 2012 पासून टीसीएस आकारत आहे. मागील अर्थसंकल्पात वस्तू व सेवांच्या 2 लाखांपेक्षा अधिकच्या रोखीच्या खरेदीवर 1 टक्का टीसीएस आकारण्यात आला होता.

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर "टीसीएस' आकारण्याची विशेष तरतूद नाही, त्यामुळे सोन्याचा समावेश सर्वसाधारण वस्तू गटात करण्यात येणार आहे. हा समावेश करण्यात आल्याने सोन्याच्या दागिन्यांच्या 2 लाख रुपयांवरील रोखीच्या खरेदीवर 1 टक्का "टीसीएस' भरावा लागेल. मोठ्या रोख व्यवहारांमध्ये होत असलेला काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी सरकारने आधीची यासाठीची 5 लाख रुपयांची मर्यादा रद्द केली आहे.

मोठ्या व्यवहारांवरील निर्बंधांमुळे निर्णय
काळा पैसा रोखण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 3 लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव आहे. अशा मोठ्या रकमेच्या रोख व्यवहारांवर तेवढ्याच रकमेचा दंड करण्याची तरतूदही आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रोखीने खरेदी केल्यास 1 टक्का "टीसीएस' लागू होईल. सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या 5 लाख रुपयांवरील रोखीने खरेदीसाठी "टीसीएस' लागू आहे.

Web Title: TCS On Gold Jewellery Purchase