'आधार'ची माहिती मिळविणाऱ्या आठ संकेतस्थळांवर कारवाई 

पीटीआय
गुरुवार, 20 एप्रिल 2017

काही बेकायदा संकेतस्थळे बंद करण्याचा आदेश आम्ही दिला होता. त्यानंतर पुन्हा काही नवी संकेतस्थळे अस्तित्वात आली. या संकेतस्थळांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : 'आधार'शी निगडित सेवा देण्याच्या बहाण्याने नागरिकांचे 'आधार' क्रमांक आणि अन्य माहिती बेकायदा मिळविणाऱ्या आठ संकेतस्थळांविरुद्ध राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 

'आधार'निगडित सेवा देण्याच्या बहाण्याने माहिती बेकायदा मिळविणाऱ्या संकेतस्थळांविरुद्ध राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाने प्रथमच अशा प्रकारची कारवाई केली आहे. aadhaarupdate.com, aadhaarindia.com, pvcaadhaar.in, aadhaarprinters.com, geteaadhaar.com, downloadaadhaarcard.in, aadharcopy.in, duplicateaadharcard.com या आठ संकेतस्थळांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही संकेतस्थळे राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाची मान्यता असल्याचे भासवून 'आधार'निगडित सेवा देण्याच्या बहाण्याने नागरिकांचे 'आधार' क्रमांक आणि अन्य माहिती मिळवत होती. याआधी 'आधार'शी निगडित सेवा बेकायदा देणारी 12 संकेतस्थळे आणि 12 ऍप्लिकेशन बंद करण्यात आली होती. तसेच, अशा प्रकारची 26 संकेतस्थळे आणि ऍप्लिकेशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. 

याविषयी बोलताना राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे म्हणाले, ''काही बेकायदा संकेतस्थळे बंद करण्याचा आदेश आम्ही दिला होता. त्यानंतर पुन्हा काही नवी संकेतस्थळे अस्तित्वात आली. या संकेतस्थळांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, 'आधार' कायदा, फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

Web Title: UIDAI registers police case against websites faking to be linked with Aadhar Card