भारत व ब्रिटनमध्ये व्यापारवाढ गरजेची: थेरेसा मे

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

भारत आणि ब्रिटनमध्ये औद्योगिक संशोधनासाठी भागीदारी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सौरऊर्जेवर आधारित संशोधन विकास केंद्र उभारले जाणार आहे.

नवी दिल्ली - भारत आणि ब्रिटन यांच्या व्यापारातील अडथळे दूर करुन गुंतवणूक वाढीस लागल्यास भराभराट होईल, असे मत व्यक्त करीत ब्रिटनला जगात मुक्त व्यापाराचा आदर्श निर्माण करावयाचा आहे, असे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी भारत -ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेत सांगितले. भारत आणि ब्रिटन द्विपक्षीय संबंधावर चर्चा करण्यासाठी आयोजित भारत -ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेचे आज (सोमवार) उद्घाटन झाले. 

"आम्ही ब्रिटनमध्ये आर्थिक आणि सामाजिक सुधारणांवर काम करीत आहोत. भारतातून होणाऱ्या गुंतवणूकीमुळे आमच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य प्राप्त होत आहे", असेही त्या यावेळी म्हणाल्या. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच युरोपाबाहेरील दौरा आहे.

यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की या तंत्रज्ञान परिषदेच्या निमित्ताने दोन्ही देशांचा एकत्रित वैज्ञानिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांच्या आधारावर एकत्रितपणे नवा प्रवास सुरु होत आहे. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीसारख्या प्रमुख उपक्रमांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे विज्ञान 'युनिव्हर्सल' आहे परंतु तंत्रज्ञान ही बाब 'लोकल' असायला हवी असे सांगत अशा परिषदांमधून देशांना एकमेकांच्या गरजा समजून घेण्यास मदत होते असे प्रतिपादन मोदींनी केले. 

भारत आणि ब्रिटनमध्ये औद्योगिक संशोधनासाठी भागीदारी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सौरऊर्जेवर आधारित संशोधन विकास केंद्र उभारले जाणार आहे.

Web Title: UK PM TheresaMay speaks at India UK Tech Summit in Delhi