नोटा बदलून न मिळाल्याने महिला झाली अर्धनग्न

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयात 31 मार्चपर्यंत बदलून मिळतील, असे जाहीर केले होते.

नवी दिल्ली - जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने हताश झालेल्या गरीब महिलेने बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या प्रादेशिक कार्यालयासमोर अखेर अर्धनग्न होऊन निषेध नोंदविला.
रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयसमोर ही महिला आपल्या चिमुकल्या मुलासह आली होती.

वारंवार विनंत्या करूनही सुरक्षारक्षक तिला जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आतमध्ये सोडत नव्हते. त्यामुळे कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच तिने ठिय्या मांडला. सुरक्षारक्षकांनी तिला जबरदस्तीने बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर ती अंगावरील कपडे काढून अर्धनग्न झाली. यामुळे खळबळ उडाली.

सुरक्षारक्षकांनी अखेर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ती महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले. रिझर्व्ह बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय हे संसद भवनापासून अगदी नजीक असून, अतिसुरक्षित भागात ते येते. येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या निवृत्त आणि वृद्ध नागरिकांनी सरकारने दिलेले आश्‍वासन न पाळल्याची टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयात 31 मार्चपर्यंत बदलून मिळतील, असे जाहीर केले होते.

Web Title: Unable to exchange notes, woman strips at RBI