संसदीय समितीसमोर पटेल हजर राहणार  

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

नवी दिल्ली - देशभरातील अनेक बॅंकांमध्ये उघडकीस येत असलेल्या गैरव्यवहारांच्या पार्श्‍वभूमीवर संसदीय समितीने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 

नवी दिल्ली - देशभरातील अनेक बॅंकांमध्ये उघडकीस येत असलेल्या गैरव्यवहारांच्या पार्श्‍वभूमीवर संसदीय समितीने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 

काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील अर्थविषयक स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत बॅंकिंग क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्‍न वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांच्यासमोर उपस्थित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी हजर राहण्यास समितीने सांगितले आहे. गैरव्यवहार आणि बॅंकिंग नियमावली यासंबंधी त्यांच्याकडे विचारणा केली जाईल. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या समितीचे सदस्य असून, ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

रिझर्व्ह बॅंकेला सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसे अधिकार नसल्याचे विधान ऊर्जित पटेल यांनी नुकतेच केले होते. या पार्श्‍वभूमीवर गव्हर्नरना कोणत्या प्रकारचे अधिकार असावेत, हे समिती पटेल यांच्याकडून जाणून घेणार आहे. बॅंकिंग नियामकाची जबाबदारी सर्वच बाबतीत महत्त्वाची असल्याने गव्हर्नरना समितीने चौकशीसाठी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

‘पीएनबी’, ‘आयसीआयसीआय’वरही चर्चा 
स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रांमधील बॅंक गैरव्यवहारांवर चर्चा झाली. यात पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्यावरही चर्चा करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्‍नांना अर्थ मंत्रालयाने उत्तरे दिली असून, याबाबत सविस्तर अहवाल तीन आठवड्यांत सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: urjit patel will be present before the parliamentary committee