‘फ्रीडम एसआयपी’ स्वप्नपूर्तीचा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 SIP

‘फ्रीडम एसआयपी’ स्वप्नपूर्तीचा मार्ग

- विशाल पाठक

बऱ्याचदा आयुष्यातील बराच कालावधी गेल्यावर अनेकांच्या लक्षात येते, की ते एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करत असूनही त्यांची स्वप्ने आणि छंद-आवड हे त्या कामापेक्षा वेगळे आहेत. यामध्ये अगदी नियमित नवनव्या ठिकाणी भ्रमंती, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अशा नानाविध आवडींचा, स्वप्नांचा समावेश असू शकतो. तसेच लवकर सेवानिवृत्ती घेण्याच्यादृष्टीने नियमित मासिक उत्पन्नाच्या तरतुदीसारख्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टाचाही समावेश असू शकतो. ही स्वप्ने अथवा उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी एखाद्याकडे निरंतर लक्षणीय स्वरूपात निधी येत राहणे किंवा रोख प्रवाह असणे आवश्यक आहे. तथापि, बहुतेक वेळा एकतर उत्पन्न आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने किंवा पैशाचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे सतत आर्थिक तंगी मागे लागलेली असते. परिणामी अनेकांची अशी स्वप्ने पुरी न होता कायम दूरचीच राहतात.

अशाच मंडळींना तारून नेणारा एक पर्याय आहे तो म्हणजे ‘फ्रीडम एसआयपी’चा. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्रीडम एसआयपी ही योजना शिस्तबद्ध पद्धतीने नियतमित स्वरूपात सुरू राहिलेल्या ‘एसआयपी’चा पूर्वनिर्धारीत मुदत काळ संपल्यानंतर, जमा झालेली रक्कम सुयोग्य योजनेत हस्तांतरित (स्विच) करते आणि पुढे मग त्यातून नियमित पैसे काढण्याची (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल) सुविधा मिळते. थोडक्यात, ‘फ्रीडम एसआयपी’मध्ये तीन टप्पे आहेत. एक म्हणजे निवडलेल्या कार्यकाळात ‘एसआयपी’द्वारे संपत्ती वाढवणे, दीर्घ मुदतीत जमा झालेली ही संपत्ती जतन करण्याच्या एकमेव उद्देशाने ती कमी जोखीम असलेल्या लक्ष्य योजनेत हस्तांतरित करणे आणि नंतर ‘एसडब्ल्यूपी’ अर्थात सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅनद्वारे नियमित पद्धतीने त्यातून पैसे काढणे. ‘फ्रीडम एसआयपी’चे एक पर्यायी वैशिष्ट्य म्हणजे, ती तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयानुरूप ८, १०, १२, १५, २०, २५ आणि ३० वर्षांचा कार्यकाळ देऊ करते. उदाहरणार्थ, तुम्ही आठ वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा १०,००० रुपये ‘एसआयपी’ केलेली असल्यास, पुढे ‘फ्रीडम एसआयपी’च्या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला दरमहा १०,००० रुपये पद्धतशीरपणे काढण्याचा पर्यायही खुला होईल. कार्यकाळ १० वर्षांचा असेल, तर पैसे काढण्याची रक्कम १५,००० रुपये म्हणजे ‘एसआयपी’ हप्त्याच्या दीडपट असेल. १२ वर्षांच्या कार्यकाळापासून मासिक पैसे काढण्याचे प्रमाण दोन पट किंवा दरमहा २०,००० रुपये किंवा ३० वर्षांच्या एसआयपी कालावधीसाठी दरमहा १.२० लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याचे प्रमाण वाढू शकेल.

'फ्रीडम एसआयपी’ हे एक उद्दिष्ट; तसेच उपाययोजनेवर आधारित गुंतवणूक नियोजन आहे. जे तुम्हाला तुमच्या छंद-आवडीला मूर्तरूप देण्याचे आणि मुख्य म्हणजे निवृत्ती कधी घ्यायची हे ठरविण्याचे स्वातंत्र्य देते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कल्पनेत विचार केलेले जीवन तुम्हाला जगू देते. तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या स्वप्नांची काळजी घेण्यासाठी फक्त योग्य प्रमाणात ‘एसआयपी’ची रक्कम निवडा आणि तिचे शिस्तीने पालन करा. बाकी सगळे काम ‘फ्रीडम एसआयपी’कडून विनासायास होईल.

‘सुवर्ण’संधी : सॉव्हरिन गोल्ड बाँड

१९ डिसेंबर २०२२ - इश्‍यू सुरू होण्याची तारीख

२३ डिसेंबर २०२२ - इश्‍यू बंद होण्याची तारीख

एक ग्रॅम - किमान गुंतवणूक

चार किलो - कमाल गुंतवणूक

५४०९ रुपये - प्रति ग्रॅम किंमत

५३५९ रुपये - डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत

आठ वर्षे - सुवर्ण रोख्यांचा कालावधी

२.५० टक्के - वार्षिक व्याज