व्होडाफोन-आयडियाची पुढील महिन्यापासून दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

  • व्होडाफोन-आयडियाचा 1 डिसेंबरपासून सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय
  • भारती एअरटेलचाही देखील शुल्कवाढीचा निर्णय

नवी दिल्ली : आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाने येत्या 1 डिसेंबरपासून सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने देखील शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.

देशातील दूरसंचार क्षेत्राची अवघड परिस्थिती आणि जगाच्या तुलनेत भारतातील मोबाईल सेवा शुल्क फारच स्वस्त असल्याचे कारण देत व्होडाफोन-आयडियाने शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; तर व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी एअरटेलने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समिती आणि दूरसंचार क्षेत्रातील सर्वच महत्त्वाचे घटक आर्थिक तणावांच्या सद्यस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे. येत्या 1 डिसेंबरपासून होणार असलेली शुल्कातील वाढ नेमकी किती असेल, याबाबतची माहिती दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेली नाही. याआधी सचिवांच्या समितीने मोबाईल सेवा आणि डेटाच्या संदर्भातील किमान शुल्क ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. समितीने दूरसंचार खात्याकडून यासंदर्भातील सूचना मागवल्या आहेत.

सध्या देशातील दूरसंचार क्षेत्र हे ढवळून निघाले आहे. रिलायन्स जिओने स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक कंपन्यांना बाजारपेठेत तग धरण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांना थकीत महसूल आणि परवाना शुल्कापोटी दूरसंचार खात्याला एकत्रितरीत्या जवळपास 92 हजार कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोनला 50 हजार 921 कोटींचा; तर एअरटेलला आतापर्यंतचा सर्वात मोठा 23 हजार 45 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone-Idea service pay hike from next month