इन्फोसिसच्या निर्णयाचे ट्रम्प यांच्याकडून स्वागत

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

कौशल्याधारित व्हिसावाटप प्रक्रिया
सध्या कौशल्य आणि वेतन यांचा विचार न करता लॉटरी पद्धतीने व्हिसावाटप केले जाते. यापुढे कौशल्याधारित व्हिसावाटप पद्धत अवलंबण्यात येत आहे. यामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्या जागी अन्य देशांतील कमी वेतनावरील कर्मचारी नेमणे अवघड होणार आहे.

वॉशिंग्टन: दहा हजार अमेरिकी नागरिकांना नोकरी देण्याचे इन्फोसिसच्या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. हा 'अमेरिका फर्स्ट' या धोरणाचा विजय असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिस लिमिटेडने येत्या दोन वर्षात दहा हजार अमेरिकी नागरिकांना नोकरी देण्याचे काल जाहीर केले होते. ट्रम्प यांनी नुकताच एच-1बी व्हिसाचा तात्कालिक कार्यक्रम आणखी कठोर करणारा आदेश काढला होता. त्यामुळे आता भारतातील आयटी कंपन्यांनी आपले धोरण बदलण्यास सुरूवात केली आहे.

ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ अर्थात अमेरिकन वस्तू, सेवाच खरेदी करा, आणि अमेरिकन युवकांनाच रोजगार द्या, अशा स्वरुपाचा आदेश काढला आहे. परदेशातील कुशल कामगारांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठीचा हा व्हिसा कार्यक्रम आहे. ट्रम्प यांनी नुकतेच यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच टीसीएस आणि इन्फोसिस या भारतीय कंपन्या "एच-1बी' व्हिसा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. या कंपन्या व्हिसा लॉटरी पद्धतीत अतिरिक्त अर्ज करून मोठ्या प्रमाणात व्हिसा मिळवित असल्याचे व्हाईट हाउसने स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर इन्फोसिसने अमेरिकी लोकांना नोकरीवर ठेवण्यात सुरूवात केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान या व्हिसा कार्यक्रमावर निर्बंध आणण्याचे आश्वासन अमेरिकन मतदारांना दिले होते. त्यानुसार ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण राबवण्याचे ठरवले आहे.

(अर्थविषयक अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com)

कौशल्याधारित व्हिसावाटप प्रक्रिया
सध्या कौशल्य आणि वेतन यांचा विचार न करता लॉटरी पद्धतीने व्हिसावाटप केले जाते. यापुढे कौशल्याधारित व्हिसावाटप पद्धत अवलंबण्यात येत आहे. यामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्या जागी अन्य देशांतील कमी वेतनावरील कर्मचारी नेमणे अवघड होणार आहे.

Web Title: White House welcomes Infosys decision to hire 10,000 Americans