घाऊक चलनवाढीचा दिलासा

घाऊक चलनवाढीचा दिलासा

नवी दिल्ली:  इंधन आणि खाद्यान्नाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याने सप्टेंबर महिन्यात घाऊक चलनवाढीतून दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ निर्देशांकाने ०.३३ टक्‍क्‍याचा तळ गाठला असून गेल्या तीन वर्षांतील नीचांकी स्तर आहे. ऑगस्टमध्ये तो १.०८ टक्के होता. सप्टेंबर २०१८ मध्ये घाऊक चलनवाढ दर ५.२२ टक्के होता.  

केंद्र सरकारने सोमवारी (ता.१४) सप्टेंबरमधील घाऊक चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली. सप्टेंबर महिन्यात खाद्यान्नामधील चलनवाढ ७.४७ टक्‍के आहे. बटाट्याच्या किमतींमध्ये २२.५० टक्‍के घसरण झाली. इंधन आणि ऊर्जा गटातील चलनवाढीचा दर उणे ७.०५ टक्के राहिला. ऑगस्टमध्ये तो उणे ४ टक्के होता. कारखाना उत्पादित वस्तूंमधील चलनवाढ ०.४२ टक्‍क्‍यांवर कायम आहे. गेल्या महिन्यात दोन खनिजे आणि खाद्यवस्तू यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून अले. भाजीपाला आणि कांद्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने खाद्यान्न वस्तूंमधील चलनवाढ ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे ‘आयसीआरए’च्या अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी सांगितले.  

किरकोळ चलनवाढीचा पारा चढला
दरम्यान, घाऊक चलनवाढीने दिलासा दिला असला, तरी किरकोळ बाजारातील महागाई वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ३.९९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. ऑगस्टमध्ये तो ३.२८ टक्के होता. किरकोळ बाजारात खाद्यान्नांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खाद्यान्न वस्तूंचा चलनवाढीचा दर ५.११ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. भाजीपाल्याच्या किमतींमध्ये १५.४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com