देशातील 50 टक्के एटीएम बंद का होणार? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे: सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे देशातील तब्बल 50 टक्के एटीएम बंद होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही एटीएम कोणत्याही तांत्रिक नाही तर, आर्थिक कारणांमुळे बंद होण्याची शक्यता असल्याचे 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे मंदार आगाशे यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या मुलाखतीतील काही प्रमुख मुद्दे.  

पुणे: सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे देशातील तब्बल 50 टक्के एटीएम बंद होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही एटीएम कोणत्याही तांत्रिक नाही तर, आर्थिक कारणांमुळे बंद होण्याची शक्यता असल्याचे 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे मंदार आगाशे यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या मुलाखतीतील काही प्रमुख मुद्दे.  

एटीएम केंद्र सुरु ठेवण्यासाठी लागणारी वीज, जागेचे भाडे, दररोज करावा लागणारा पैशांचा भरणा, सुरक्षा इत्यादीसाठी बँकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 150-200 ट्रान्झॅक्शन / व्यवहार होणे गरजेचे आहे. मात्र मात्र, काही निमशहरी आणि ग्रामीण भागातील एटीएममधून आवश्यक त्या प्रमाणात व्यवहार होत नसल्याने एटीएम सुरु ठेवणे बँकांना परवडत नाही. परिणामी ही एटीएम्स धोक्यात आली आहेत. 

एकीकडे, मोठमोठ्या बँकांचे एटीएम्स बंद होण्याची शक्यता असताना ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील सहकारी बँक, नागरी बँक किंवा छोट्या आर्थिक संस्थांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असून त्यांना त्यांच्या जागेचा वापर करून अशा प्रकारची एटीएम्स चालू करता येतील जेणेकरून जागेसाठीचे भाडे किंवा सुरक्षेवर अतिरिक्त खर्च न करता एटीएमची अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. 

याशिवाय, ग्रामीण भागात मायक्रो एटीएमसारखे पर्याय प्रभावी ठरतील. मायक्रो एटीएमच्या माध्यमातून बँक खातेधारकांना पैसे काढण्याची तसेच, जमा करण्याची सोय असल्याने ग्रामीण भागात चांगला पर्याय ठरू शकतो. 

31 डिसेंबर पर्यंत एटीएम कार्ड बदलून घेणे का महत्वाचे आहे? 

जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा 31 डिसेंबर नंतर ते बंद होण्याची शक्यता असल्याचे संदेश बँकाकडून ग्राहकांना येत आहेत. कारण, जुन्या कार्डवरून ग्राहकांची माहिती चोरणे सहज शक्य आहे. त्यामुळे कार्डचे क्लोनिग करून आर्थिक गैरव्यवहार होतात. हे टाळण्यासाठी 'ईएमव्ही' कार्ड्स प्रभावी ठरतील. नवीन कार्ड हे 'चीप' आधारित असल्याने त्याचे क्लोनिंग करणे शक्य नाही. 'ईएमव्ही' कार्ड हे अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे, नवीन कार्ड सुरक्षेची हमी देतात. 

एटीएम फ्रॉड कसे रोखता येतील? 

भारतातील बँकिंग व्यवहार सर्वाधिक सुरक्षित आहेत. परंतु, ग्राहकांमध्ये आवश्यक ती जागरूकता नसल्यामुळे एटीएम फ्रॉड किंवा हॅकिंग सारख्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी ग्राहकांनी सावध असणे गरजेचे आहे. एटीएम फ्रॉड रोखण्यासाठी प्रामुख्याने आपला पिन सतत बदलत ठेवणे हाच चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर, बँकेच्या नावाखाली बाहेरून येणारे अनोळखी फोनकॉल्सवर कधीही पिन शेअर करू नये. 

अर्थविषयक अधिक बातम्यांसाठी भेट द्या www.sakalmoney.com ला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why ATM operators are threatening to close half the ATMs