शेअर बाजारात अपेक्षित मोठे “करेक्‍शन’ होईल?

राजेंद्र सूर्यवंशी
मंगळवार, 27 जून 2017

सलग 1800 अंशांच्या वाढीनंतर शेअर बाजारात मोठ्या "करेक्‍शन'ची भीती असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारात पुनर्प्रवेशासाठी वाट बघत आहेत. एका बाजूला "शेअरचे भाव महाग झाले आहेत,' असा सावध पवित्रा घेत सर्वसामान्य गुंतवणूकदार "करेक्‍शन'ची वाट बघत आहेत; तर दुसरीकडे देशी व परदेशी वित्तीय संस्था चढाओढीने बाजारात गुंतवणूक करीत आहेत. सध्याही हा ओघ फार कमी झालेला नाही.

सलग 1800 अंशांच्या वाढीनंतर शेअर बाजारात मोठ्या "करेक्‍शन'ची भीती असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारात पुनर्प्रवेशासाठी वाट बघत आहेत. एका बाजूला "शेअरचे भाव महाग झाले आहेत,' असा सावध पवित्रा घेत सर्वसामान्य गुंतवणूकदार "करेक्‍शन'ची वाट बघत आहेत; तर दुसरीकडे देशी व परदेशी वित्तीय संस्था चढाओढीने बाजारात गुंतवणूक करीत आहेत. सध्याही हा ओघ फार कमी झालेला नाही.

बाजार महाग आहे का?
आपला शेअर बाजार महाग झाला आहे, अशी सार्वत्रिक चर्चा चालू आहे. याचे विश्‍लेषण करून पाहूया. जानेवारी 2008 मधील आकड्यांशी तुलनात्मक आजची परिस्थिती बघता, 2008 मध्ये "निफ्टी'चा पीई -22 होता; आजचा 24.37 आहे. तेव्हा विकासदर 9.7 होता; आजचा 7.1 आहे. तेव्हा औद्योगिक उत्पादन निर्देशांक 13.7 होता; आज तो 2.7 आहे. चलन विनिमय दर 39.67 होता, आता तो 64.5 आहे. तेव्हा वित्तीय तूट 3.1 टक्के होती, आज ती 3.5 टक्के आहे. कच्च्या तेलाचा भाव 93 डॉलर प्रतिबॅरल होता, आज तो 50 आहे. यावरून स्पष्ट दिसत आहे, की जानेवारी 2008 च्या तुलनेत आजचा आपला बाजार महाग आहे. यावरून "निफ्टी'त 9150 अंशांपर्यंत "करेक्‍शन' अपेक्षित आहे; परंतु आजच्या परिस्थितीत लगेच हे घडेल, असे वाटत नाही. पावसाची उत्तम सुरवात आणि दुसरीकडे वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी एक जुलैला होत असल्याने बाजाराला आधार मिळाला आहे; परंतु "योग्य मूल्य' या निकषांवर बाजारात "करेक्‍शन' होणारच, यात शंका नाही; पण त्याचे अजूनही स्पष्ट संकेत दिसत नाहीत. 9513 अंशांखाली "निफ्टी' टिकल्यास ते शक्‍य होऊ शकेल.

तांत्रिक पातळी कशी राहील?

शुक्रवारच्या दिवसअखेर "निफ्टी' 9590 अंशांच्या पातळीवर बंद झाला आहे. तांत्रिक आलेखानुसार, या पातळीपासून वरच्या दिशेने 9680 व 9716 अंशांवर अनुक्रमे विरोध पातळी दिसत असून, 9513 व 9350 अंशांवर अनुक्रमे आधार पातळ्या दिसत आहेत. 9716 व 9513 अंश या दोन पातळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 9716 अंशांच्या वर "निफ्टी'चे 10 हजार अंशांचे लक्ष्य असेल व 9513 च्या खाली 9150 अंश ही "करेक्‍शन' पूर्ण होण्याची अंतिम पातळी असेल. 9716 अंशांवर व 9513 अंशांखाली "निफ्टी' लगेच जाण्याची शक्‍यता कमी आहे. 1800 अंशांच्या सलग वाढीनंतरही "निफ्टी'त अपेक्षित असलेले मोठे "करेक्‍शन' लगेच होईल, असे दिसत नाही. "बॅंक निफ्टी'त 24 हजार व 23 हजार अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. अजूनही "बॅंक निफ्टी'त वाढच होईल, असे संकेत आहेत.

खरेदी करण्यासारखे...
उज्जीवन बॅंक (सध्याचा भाव : रु. 310, उदिष्ट : रु. 460)

सुमारे 3712 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली ही छोटी खासगी बॅंक आहे. तिचे अधिकांश कामकाज ग्रामीण भागात चालते. मागील वर्षी शेअर बाजारात बिगर बॅंकिंग कंपनी म्हणून नोंदणी झाल्यानंतर पुढे तिचे खासगी बॅंकेत रूपांतर झाले आहे. कंपनीचे व्यवस्थापन चांगले असून, कंपनीत 75 टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे. कंपनीचे निकाल पाहता पीई 18 व पी/बीव्ही 3 आहे. उद्योगाचा पीई 30, विकासदर 1.5 व निव्वळ नफ्याचे प्रमाण 18 टक्के असल्याने आज या कंपनीत गुंतवणूक करण्यास वाव आहे. पुढील एक वर्षात तिचा शेअरभाव 460 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

राजेंद्र सूर्यवंशी
(डिस्क्‍लेमर : लेखक शेअर बाजाराचे संशोधक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Web Title: Will there be a large "correction" in the stock market?