उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्त  

सकाळ न्युज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

बंगळूर: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रो लि.चे संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अझिम प्रेमजी पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. विप्रोने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. प्रेमजी 30 जुलै, 2019 ला विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत. अझिम प्रेमजी यांनी विप्रोची धुरा तब्बल 53 वर्षे वाहिली आहे. भारताच्या उद्योग विश्वात विशेषत: आयटी क्षेत्रात विप्रोचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अझिम प्रेमजी यांची निवृत्ती विप्रोसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

प्रेमजी निवृत्तीनंतरसुद्धा विप्रोच्या संचालक मंडळावर अकार्यकारी संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. अझिम प्रेमजी यांचे पुत्र रिशाद प्रेमजी यांची विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर रिशाद हे विप्रोचे पूर्णवेळ संचालकसुद्धा असतील.

 विप्रोच्या संचालक मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक अबिदाली झेड निमुचवाला यांच्या पदाच्या फेरबदलाचीही घोषणा केली आहे. निमुचवाला आता विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत.

'माझ्यासाठी हा खूप प्रदिर्घ आणि समाधानकारक प्रवास होता. भविष्यात मला अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यावर लक्ष द्यायचे आहे. रिशादच्या नेतृत्वावर मला प्रचंड विश्वास आहे. रिशाद विप्रोला नव्या उंचीवर नेईल अशी मला खात्री आहे', असे मत यावेळी अझिम प्रेमजी यांनी व्यक्त केले आहे.

अझिम प्रेमजी यांनी एका साबण उत्पादक कंपनीचे रुपांतर एका 8.5 अब्ज डॉलरच्या जागतिक किर्तीच्या आयटी कंपनीत केले आहे. ते विप्रो एंटरप्राईझेस लि.चे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. त्याचबरोबर विप्रो-जीई हेल्थकेअरच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांच्याचकडे असणार आहे. भारताच्या आयटी क्षेत्रात अझिम प्रेमजी यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro founder Azim Premji to retire on July 30