गुड न्यूज: 'या' कंपनीत मिळणार 5 हजार कर्मचाऱ्यांना प्रमोशन

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

देशातील आघाडीची आयटी कंपनी आपल्या जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन देणार आहे.

बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी, विप्रो लि. आपल्या जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन देणार आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांनी कंपनीतच कार्यरत राहावे आणि कंपनीला भविष्यासाठी आव्हानांसाठी तयार करण्यासाठी विप्रोच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी अधिक चांगल्या संधीच्या शोधात इतर कंपन्यांमध्ये जाऊ नये यासाठी त्यांना प्रमोशन देऊन विप्रोतच कार्यरत ठेवण्याचे कारण यामागे आहे. सप्टेंबरअखेर विप्रोतील कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण 17 टक्के होते.

'इतर कंपन्यांच्या तुलनेत आमच्याकडे कर्मचारी अधिक काळ सेवा देताना दिसत आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे आणि येत्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा आमचा विचार आहे. पाच ते आठ वर्षांचा अनुभव असलेल्या जवळपास 5,000 कर्माचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे', असे मत विप्रोचे एचआर विभागाचे प्रमुख सौरभ गोविल यांनी व्यक्त केले आहे. एल1 पातळीवरील कर्मचाऱ्यांना एल2 पातळीवर बढती मिळेल तर एल2 पातळीवरील कर्मचाऱ्यांना एल3 पातळीव बढती देण्यात येईल.

जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत विप्रोने फ्रेशर्स कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांचा बोनस दिला होता. विप्रोतच कार्यरत राहण्यासाठी हा बोनस कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झालेल्या आणि एक वर्ष पूर्ण झालेल्या फ्रेशर्सना देण्यात आला होता. आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण कर्मचारी कंपनी बदलत असल्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर बोनस आणि पदोन्नती देण्याचा मार्ग अवलंबत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro to promote 5,000 employees to tame attrition