'विप्रो'च्या 600 कर्मचाऱ्यांना 'नारळ'; आणखी चौदाशेंना काढणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

विप्रो शेअर

सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोच्या शेअरचा व्यवहार 500.65 रुपयांवर होत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 410 रुपयांची नीचांकी तर 606.75 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असणार्‍या 'विप्रो'ने सहाशे कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी केले आहे. कंपनीमध्ये सध्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, आणखी 1400 लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकनामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न बजावणार्‍या सहाशे कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 'विप्रो'चे मुख्यालय बंगळूर येथे आहे. कंपनीमध्ये सध्या 1 लाख 79 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जात असते. त्यामुळे कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम न करणार्‍या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते, असे 'विप्रो'कडून सांगण्यात आले.

टीसीएस आणि इन्फोसिसनंतर आता विप्रो येत्या 25 एप्रिलला 2016-17 या संपूर्ण आर्थिक वर्षाचे आणि चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोच्या शेअरचा व्यवहार 500.65 रुपयांवर होत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 410 रुपयांची नीचांकी तर 606.75 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ₹ 121,703.04 कोटींचे बाजार भांडवल आहे.

Web Title: wipro removes 600 workers, 1400 more on the list