सकारात्मक धोरणावर मोहोर

यशवंत केसरकर
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

तब्बल एका तपानंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज उभारण्याची पत उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन करणाऱ्या ‘मूडीज’ने देशाचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) Baa3 या स्थिर मानांकनावरून Baa2 म्हणजेच सकारात्मक अर्थव्यवस्था असे केले आहे.

तब्बल एका तपानंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज उभारण्याची पत उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन करणाऱ्या ‘मूडीज’ने देशाचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) Baa3 या स्थिर मानांकनावरून Baa2 म्हणजेच सकारात्मक अर्थव्यवस्था असे केले आहे. केंद्र सरकारने वर्षभरात राबवलेल्या धोरणांचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागला आहे. वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी, बॅंकांच्या भांडवल पुनर्भरणासाठी ठोस धोरणाची दखल मूडीजने घेतली आहे. याचबरोबर वाढत्या वित्तीय तुटीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकंदरीत मोदी यांच्या आर्थिक धोरणांना सकारात्मक प्रतिसाद पत मानांकनातून मिळाला आहे. विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या सरकारला ही बाब निश्‍चितच दिलासा देणारी आहे. 

देशाचे पत मानांकन स्थिरवरून सकारात्मक केल्याने देशात व परदेशातून उभारण्यात येणाऱ्या निधीस आता तुलनेने कमी व्याज दर लागणार आहेत. त्याचा फायदा केंद्र सरकारबरोबरच मोठ्या उद्योग-व्यवसायांना होणार आहे. पत मानांकनातून देशाची तसेच कंपन्यांची कर्ज परतफेडीची क्षमता समजते. पत मानांकन करताना देशाची अर्थव्यवस्था, आर्थिक धोरणे, वित्तीय तूट (अर्थसंकल्पीय व भांडवली), आर्थिक सुधारणांबाबत सरकारची मानसिकता आदींचा विचार करून पत मानांकन केले जाते. मुडीने देशाची पत उंचावतानाच देशातील मोठ्या वित्तीय संस्थांचे मानांकन सुधारले आहे.

कंपन्यांकडून पत मानांकन करताना साधारणतः AAA, Baa3, ca, ccc असे प्रमाणीकरण केले जाते. यातील AAA हे अत्यंत सुरक्षिताता दर्शवणारे मानांकन आहेत. तर Baa3 अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे दर्शवते; तर ca, ccc हे मानांकन गुंतवणुकीस चांगले वातावरण नसल्याचे निदर्शक आहेत. सध्या कॅनडा, जर्मनीचे पत मानांकन AAA आहे. त्यामुळे त्या अर्थव्यवस्थांचा भक्कमपणा समजून येतो. 

पत मानांकनाचा इतिहास पाहता १८६० पर्यंत मागे जावे लागते. स्टॅंडर्ड अँड पुअर ही सर्वात जुना पत मानांकन कंपनी आहे. ती दोन संस्थांच्या एकत्रीकरणातून जन्माला आली आहे. १८६० मध्ये हेन्‍री पुअर यांनी पुअर ही संस्था स्थापन केली. त्यांनी अमेरिकेतील रेल्वे व कॅनॉलमध्ये निधी गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी रेल्वेच्या अर्थपुरवठ्याचा इतिहास मांडला. संस्थेच्या पत मानांकनास सुरुवात झाली. त्यानंतर १९०६ मध्ये 
स्टॅंडर्ड स्टॅटॅस्टिक ब्युरोने रेल्वेच्या कर्जरोख्याशिवाय वित्तीय व्यवहारांचा अभ्यास करण्यासाठी कंपनी स्थापन झाली. १९४० मध्ये तिचे पुअर कंपनीत एकत्रीकरण झाले. स्टॅंडर्ड अँड पुअर ही कंपनी अस्तित्वात आली. आज ही जगातील आघाडीची पत मानांकन कंपनी आहे.

अमेरिकेत १९०९ मध्ये जॉन मूडी यांनी मूडीज पत मानांकन (क्रेडिट रेटिंग) कंपनी सुरू केली. आजही दर्जेदार पत मानांकन कंपनी म्हणून जागतिक स्तरावर मान मूडीजला आहे. 
याशिवाय जॉन फेच यांनी १९१३ मध्ये फेच ही पत मानांकन कंपनी स्थापन केली. जागतिक स्तरावर दबदबा असलेल्या या तीनच कंपन्या आहेत. त्यांची धोरणे ठरवताना एकमेकांच्या व्यवहारांवर त्यांचे बारीक लक्ष असते. १९७५ मध्ये अमेरिकेच्या सिक्‍युरिटी अँड एक्‍स्चेंज कमिशनने त्यांना मान्यता दिली आहे. 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदार या तिन्ही कंपन्यांचे पत मानांकन पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. मूडीजने भारताचे पत मानांकन उचावल्याने इतर दोन संस्थांकडूनही सकारात्मक बदल अपेक्षित आहे. कारण आंतरराष्ट्रीय पतमान कंपन्यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेकडे सकारात्मक पाहत नसल्याची टीका होत आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी या कंपन्यांवर टीका केली होती. भारतीय अर्थव्यवस्था दरवर्षी ६-७ टक्के दराने विकसित होत असताना पत मानांकनात बदल होत नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या टीकेनंतर काही महिन्यांत आलेल्या मूडीजच्या मानांकनात सुधारणा झाल्याने सुब्रमण्यम यांच्या टीकेचा सकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले जाते. 

मूडीजचा लौकिक
१९०९ मध्ये जॉन मूडी यांनी मूडी पत मानांकन (क्रेडिट रेटिंग) कंपनी सुरू केली. अमेरिकेतील गुंतवणूकदारांसाठी रेल्वे अर्थपुरवठ्यातील गुंतागुंत व अनिश्‍चितता बाँड, शेअर्सच्या मूल्याचे प्रमाणीकरण करणारे विश्‍लेषण प्रसिद्ध केले. त्यातून कंपनीचा लौकिक झाला. आजही दर्जेदार पत मानांकन कंपनी म्हणून जागतिक स्तरावर मान मूडीजला आहे.  

भाजप सरकारचा योगायोग
काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात नवे आर्थिक धोरण राबविण्यास सुरुवात केली. उदारीकरण व खासगीकरण सुरू केले. तेव्हा देशाचे पत मानांकन असुरक्षित असे होते. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होत गेली. २००४ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असताना स्थिर असे झाले; तर २०१७ मध्ये भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात यात सुधारणा होऊन मानांकन सकारात्मक झाले आहे. मानांकन बदल होताना केंद्रात भाजपचे सरकार हा योगायोग जुळून आला आहे.

सर्वेक्षणाची चढाओढ
मूडीजने भारताचे पत मानांकन उंचावल्यानंतर देशात ऑनलाईन व ट्विटरवर सर्वेक्षणाची चढाओढ सुरू झाली. एका आर्थिक वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांची कार्यशैली चांगली असल्याचे ६९ टक्के लोकांनी सांगितले आहे; तर ३१ टक्के लोकांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीला पसंती दिली आहे. ट्‌विटरवर नरेंद्र मोदींना ७४ टक्के लोकांनी पसंती दिली  आहे; तर २० टक्के लोकांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यशैलीला पसंती दिली आहे.

Web Title: Yeashwant Kesarkar article