हो, मी 500 रुपयांची नोट बोलत आहे!

I am 500 Note
I am 500 Note

हो, हो! मी 500 रुपयांची एक नोट बोलत आहे. काही तासांपूर्वी मोठी किंमत असलेल्या माझी आता किंमत शून्य आहे. हा, माझे सारे नातेवाईक वगैरे एकत्र करून रद्दीमध्ये मला काही भाव येईल. पण पूर्वीसारखा नाही. जाऊ द्या! आपल्याकडे किंमत नसलेल्या सजीवाचं किंवा निर्जिवाचं ऐकून घेण्याची प्रथा नाही. पण तरीही मला तुम्हाला शेवटचं काही सांगायचं आहे. असं समजा की मला फाशी द्यायला नेले जात आहे आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.

दिवाळीत झालेल्या खर्चाचा ताण काढण्यासाठी माझा शेवटचा मालक काल त्याच्या मित्रासोबत हॉटेलत आला होता. हो, माझ्या हयातभर माझे मालक दररोज बदलत होते. कधी-कधी तर दिवसातून 10-10 मालकही बघितले आहेत मी. आता मात्र मला कधीच मालक नसेल. असो. तर हॉटेलमध्ये असलेल्या गल्ल्यातून मी थेट मालकाच्या खिशापर्यंत पोचले. मालकाने माझ्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकला. मला उलटून पालटून निरखून बघितले. माझं सौंदर्य, माझी सत्यता तपासून पाहिली आणि मी त्याच्या पाकिटात विराजमान झाले. तिथे मला माझ्यापेक्षा माझी दूरची भावकी असलेल्या 100 रुपयांच्या तीन नोटा भेटल्या. तिच्याकडे मी हीन कटाक्ष टाकला आणि पाकिटात आरामत पडून राहिले.

त्यानंतर मी मालकाच्या घरी आले. मालकाने घरी आल्यावर पाकिट त्याच्या हॉलमधील टीव्हीसमोरील एका काचेच्या टेबलावर ठेवले. त्यातून मी हळून बाहेर डोकावले. तर मला थेट टीव्ही दिसत होता. माझ्यासोबत असलेल्या 100 रुपयांच्या नोटांना मात्र मी टीव्ही बघू दिला नाही. त्यांच्या छाताडावर उभी राहून मी टीव्ही पाहत होते. तेवढ्यात मालकाचा एक मुलगा आला आणि तो बाबांकडे पैसे मागू लागला. मला माहित होतेच की माझी किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे मी एका 100 च्या नोटेकडे "चल, निघ इथून' अशा आविर्भावात पाहू लागले. काही वेळाने ती नोट गेलीदेखील. माझा गर्व आणि आत्मविश्‍वास आणखी बळावला. तेवढ्यात मालकाने बातम्यांचे चॅनेल लावले. "आज रात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा बंद' अशी घोषणा करण्यात आली आणि माझ्या काळजात धस्सं झालं. एखाद्या दहशतवाद्याने निष्पाप नागरिकाच्या गळ्यावर सुरी ठेवल्यावर त्याला जे वाटत असेल त्यापेक्षा अधिक वेदना मला झाल्या. मी जिवंत होते. पण मला किंमत नव्हती. एका क्षणात माझी किंमत जवळपास शून्य झाली होती. ज्यांच्या छाताडावर मी पाय रोवून उभी राहिली होते त्यांनी आता माझ्या पायाला धक्का पोचविला होता. मात्र त्या आधीच मी कोसळले होते. काही वेळाने मालकाने मला आणि त्याच्या घरातील माझ्या काही सख्या नातेवाईकांना सोबत घेतले. आता मी मालकाच्या खिशात 1000 रुपयांसोबत होते. आम्ही बोलू लागलो. "संपलं सारं. आता आपली किंमत शून्य', असे सारे वातावरण खिशात होते. आमच्याकडे एक जीर्ण झालेल्या नोटेने निर्वाणीचे भाषण सुरू केले. "फक्त माणसाचचं काही खरं नाही तर नोटांचंही काही खरं नाही. हे जग नश्‍वर आहे. आता आपण रद्दीत जाणार', त्याच्या या भाषणामुळे खिशात प्रचंड निराशा, अस्वस्थता आली. मालक कोठे घेऊन जात आहे काही कळेनासे झाले. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी आम्हाला मालकाने दाखविले. पण आमच्याकडे पाहून आनंदित होणारे चेहरे आता तोंड पाडत होते. एवढे वाईट झालो होतो का आम्ही? एका क्षणात आमची किंमत शून्य झाली होती. जगाची नश्‍वरता आम्हाला जाणवत होती.

काही वेळाने मला पेट्रोलपंप दिसला. पण तेथेही मालकाचा पंपवाल्याशी वाद झाला आणि मी पुन्हा खिशातच राहिले. त्यानंतर मालक कोणत्यातरी रांगेत थांबला. तेथे बराच वेळ थांबल्यानंतर मालकाने आम्हा सर्वांना एकत्र केले आणि एका मशिनमध्ये कोंबले. तेथे आमच्या कितीतरी पिढ्या एकत्र दिसत होत्या. ज्यांनी हजारो मालक पाहिले होते. कितीतरी कामे केली होती. कितीतरी लॉकअप पाहिली होती. बऱ्याच जणांना पुजेचा मान मिळाला होता. तर आमच्यापैकी काही जण तर "नवजात' होती. आताच काही काळापूर्वी त्यांनी जन्म घेतला. किती नश्‍वर जग हे. मला हे सारं सारं असह्य होत होतं. शेवटी माझा तोल गेला आणि मी रडू लागले. संपलं सारं. आमच्यामध्ये आमच्या नातेवाईकांची भरच पडत होती. अगदी चेंगराचेंगरी व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या मशिनमध्ये. आता मात्र यातून आपली सुटका नाही. किंमत संपली आहे जगण्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे आता मशिनमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात शेवट झाला असता तरीही आम्हाला त्याचे दु:ख उरलेले नव्हते. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही ज्यांच्या कामी आलो होतो त्यांनी आम्हाला या मशिनच्या काळकोठडीत डांबून ठेवण्याचा शिक्षा दिली होती. एकेकाळी आम्हाला कपाटामध्ये, पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये अगदी जीवापड जपण्यात आले होते यावर आमचाच विश्‍वास बसत नव्हता. तेवढ्यात मशिनच्या बाहेरून आवाज आला "बाबा मी एक नोट माझ्या पुस्तकात नाहीतर वहीत ठेवू का? आठवण म्हणून?' बहुतेक एक छोटा मुलगा त्याच्या बाबांकडे विनंती करत होता. त्यामुळे आमची जगण्याची, आम्हाला जोपासण्याची किरकोळ आशा पल्लवित झाली होती.

शेवटी माणसांनो एकच सांगणं आहे. छान जगा, जगू द्या. दुसऱ्यांना किंमत द्या. कारण तुमची किंमत कधी शून्य होईल हे सांगता येत नाही. बस्स, बाकी काही नाही...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com