तुमचा अर्थसंकल्प शिलकीचा की तुटीचा? (पैशाच्या वाटा)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

आपल्या देशाचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लवकरच संसदेत मांडला जाईल. असाच अर्थसंकल्प आपण आपल्यासाठी मांडू शकतो का? याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा. खरे तर अर्थसंकल्प म्हटला, की डोळ्यांसमोर आकडेमोड उभी राहते आणि त्यामुळे अनेक जण या विषयाबाबत नाखूश असतात; परंतु बारकाईने पाहिल्यास आपला वैयक्तिक अर्थसंकल्प हा आकडेमोडीपेक्षा आपल्या मानसिकतेशी अधिक निगडित असतो, असे लक्षात येईल. कारण, अर्थसंकल्प मांडला, की त्याप्रमाणे आर्थिक शिस्त पाळणे आणि त्याचा आढावा आपणच घेणे, हे ओघाने आलेच.

आपल्या देशाचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लवकरच संसदेत मांडला जाईल. असाच अर्थसंकल्प आपण आपल्यासाठी मांडू शकतो का? याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा. खरे तर अर्थसंकल्प म्हटला, की डोळ्यांसमोर आकडेमोड उभी राहते आणि त्यामुळे अनेक जण या विषयाबाबत नाखूश असतात; परंतु बारकाईने पाहिल्यास आपला वैयक्तिक अर्थसंकल्प हा आकडेमोडीपेक्षा आपल्या मानसिकतेशी अधिक निगडित असतो, असे लक्षात येईल. कारण, अर्थसंकल्प मांडला, की त्याप्रमाणे आर्थिक शिस्त पाळणे आणि त्याचा आढावा आपणच घेणे, हे ओघाने आलेच. म्हणून स्वतःला आर्थिक शिस्त लागावी, असे वाटणारी प्रत्येक व्यक्ती असा अर्थसंकल्प मांडण्यास पुढाकार घेईल. सुरवातीला हे काम थोडे अवघड वाटू शकेल; पण एकदा त्याचे फायदे लक्षात आले, की आपण ते अधिक लक्षपूर्वक करू.

आपला वैयक्तिक सोपा अर्थसंकल्प कसा मांडायचा, ते थोडक्‍यात पाहूया. सुरवातीला आपल्या दर महिन्याला होणाऱ्या किराणा सामान, घरखर्च, वीज, दूरध्वनी बिल यासारख्या खर्चांची सरासरी रकमेसह यादी तयार करा. त्यानंतर एकादी मोठी कौटुंबिक सहल, घराचे रंगकाम, फर्निचर, नूतनीकरण यासारख्या वर्षातून एखाद्या वेळेस होणाऱ्या भांडवली खर्चाची यादी बनवा. याशिवाय सणासुदीला होणाऱ्या खर्चाची अंदाजे रक्कम मांडा. शेवटी गृह किंवा वाहनकर्जावरील मासिक हप्ता, विमा हप्ता, रिकरिंग डिपॉझिट, पीपीएफ, म्युच्यअल फंडाची एसआयपी यासारख्या गुंतवणुकीच्या रकमांचा तपशील मांडा. आता या सर्व खर्चांची बेरीज करा. यामध्ये वैद्यकीय खर्चासारख्या आपत्कालीन खर्चासाठी काही रक्कम मिळविल्यास अधिक योग्य ठरेल. आता दुसऱ्या बाजूला येणाऱ्या वर्षभरातील दर महिन्याच्या उत्पन्नाची बेरीज लक्षात घ्या. सरतेशेवटी एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केल्यास रक्कम शिल्लक दिसत असेल, तर आपला अर्थसंकल्प "शिलकीचा' आहे; अन्यथा "तुटीचा' आहे, हे लक्षात येईल. आपले काम येथे संपत नाही. येणाऱ्या वर्षभरात आपले बॅंक पासबुक आणि रोख खर्चाचे तपशील नीट ठेवल्यास आपण आपल्या अर्थसंकल्पानुसार चाललो आहोत की नाही, हेही लक्षात येईल.

आपला अर्थसंकल्प तुटीचा असेल, तर आपण ही तूट कशी भरून काढणार? त्यासाठी पैशाच्या कोणत्या नव्या वाटा शोधाव्या लागतील? याचा विचार करायला हवा आणि जर शिलकीचा अर्थसंकल्प असेल, तर शिल्लक रकमेचे काय करणार, कोठे गुंतविणार, हे ठरवावे लागेल. असा अर्थसंकल्प मांडण्याचा उद्देश हा किचकट आकडेमोड करून प्रत्येक पैशाचा हिशेब लावणे हा नसून, आपण आर्थिक शिस्त पाळत आहोत का आणि आपली वाटचाल शिलकीकडे की तुटीकडे आहे हे कळणे हा आहे, हे लक्षात ठेवावे.
- डॉ. वीरेंद्र ताटके

Web Title: your budget and balance