ए मूर्ख ए बावळट... (हर्षदा परब)

हर्षदा परब
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

ट्रेनचा प्रवास म्हणजे भांडण अशी एक समजूत, लोकलने प्रवास करणाऱ्यांचा असतो. त्या दिवशी डोकं जास्त दुखत होतं. साडे आठची फास्ट ट्रेन सीएसटीहून पकडली. दादरला भरपूर बायका मुली महिला डब्यात चढल्या. गर्दीबरोबर ए मूर्ख आत हो... ए बावळट जा ना आत असे दोन वेगवेगळे आवाज ऐकू आले. अगदी काही सेकंदातच ट्रेनमध्ये चढणाऱ्या बायकांच्या धडधड आवाज थांबला. ट्रेन वेगात आली आणि बग कशी बघतेय मुर्ख, बावळट कुठली आणि मुर्ख आणि बावळटने सुरू होणारी वाक्य माझ्या जवळ-जवळ येऊ लागली. अगदी जवळ. ठणकणारं डोकं शांत व्हावं म्हणून मांडीवरच्या बॅगेवर कंबरेत वाकून झोपलेली मी अस्वस्थ होऊन डोळे चोळत उठले. अरे हे काय आवाज...

ट्रेनचा प्रवास म्हणजे भांडण अशी एक समजूत, लोकलने प्रवास करणाऱ्यांचा असतो. त्या दिवशी डोकं जास्त दुखत होतं. साडे आठची फास्ट ट्रेन सीएसटीहून पकडली. दादरला भरपूर बायका मुली महिला डब्यात चढल्या. गर्दीबरोबर ए मूर्ख आत हो... ए बावळट जा ना आत असे दोन वेगवेगळे आवाज ऐकू आले. अगदी काही सेकंदातच ट्रेनमध्ये चढणाऱ्या बायकांच्या धडधड आवाज थांबला. ट्रेन वेगात आली आणि बग कशी बघतेय मुर्ख, बावळट कुठली आणि मुर्ख आणि बावळटने सुरू होणारी वाक्य माझ्या जवळ-जवळ येऊ लागली. अगदी जवळ. ठणकणारं डोकं शांत व्हावं म्हणून मांडीवरच्या बॅगेवर कंबरेत वाकून झोपलेली मी अस्वस्थ होऊन डोळे चोळत उठले. अरे हे काय आवाज... माझ्या समोर उभ्या असलेल्या बायकांचा येतोय.

तली एक गोरी गोरी मुलगी ए मूर्ख हो ना बाजूला... कळतं काय अस ओरडत होती. राग तिच्या गालावर चढून गाल लाल झाले होते. डोळे वटारून मूर्ख बघ कशी बघतेय. मूर्ख बघ कशी हसतेय. मूर्ख अग आता तरी बाजूल हो. अशी वाक्य दनादन आदळत होती. या वाक्या दरम्यान तिने आणि तिच्या बावळट बोलणाऱ्या मैत्रिणीने धडाधड बॅगा वरच्या रॅकवर भिरकावल्या होत्या. ए मूर्ख हसतेय काय... येऊ का तिकडे. ए बावळट हो ना बाजूला. ए मूर्ख तुला तिथे येऊन मारेल. त्या बावळटला बघ... ती हिरवा ड्रेसवाली बघ कशी तिथे जाऊन उभी राहिली. बघना ही मूर्ख होती आता ती बावळट तिथे जाऊन तिला जॉईन झाली. यांना ना मारलं पाहिजे. ये मूर्ख हो ना बाजूला. घाटकोपर वाल्यांना चढता येणार नाही.

मूर्ख आणि बावळट हे तसे मूळमूळीत शब्द असल्याने त्यांचा प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला उच्चार होत आहे, अशी मी माझी समजूत काढली होती. एखादी डेंजर शिवी हाण की आणि हो मोकळी हे बोलण्याचं धाडस मी केलं नाही. कारण, मूर्ख आणि बावळट जितक्यांदा आलं त्यावरुन त्यांना डेंजर शिवी येत नसावी किंवा त्यांना ती द्यायची नसावी असा मी अर्थ लावला. रिस्क घेणं परवडणारं नव्हतं. डोकं घणाणत होतं आणि त्याबरोबर कानाजवळ वाजणारं मुर्ख आणि बावळट शब्दाचे ढोल मेंदूच्या आत घुसले होते.

ए मूर्ख हसतेस काय.. बघ तिला कळत काय... बघ अगं तुझ्यामुळे आम्ही अडकलो. बघ त्या बायकांना चढता येणार नाही. अर्ध्या खाली राहतील. मूर्ख समजत नाही का तुला.
बघ ना बावळट कुठली सारखी इथे बघते आहे.
भरलेल्या गर्दी मला कोण मुर्ख कोण बावळटं ते सापडत नव्हतं. मागे वळून-वळून पाहिलं तर सारखा माझ्या मागे उभ्या असलेल्या काळ्या ड्रेसवालीचा काळा ड्रेस फाडकन तोंडावर आदळायचा. गर्दीत बायकाच बायका दिसत होत्या. दरवाज्यात उभ्या असलेल्या बायकांपर्यंत नजर पोहोचत नव्हती.

घाटकोपर येईपर्यंत मूर्ख आणि बावळटचा दणदणाट मला आता इतका अस्वस्थ करू लागला होता की, मला घुसमटल्यासारखं होतं होतं. डोकं तर बधीर झालं होतं. घाटकोपर आलं तेव्हा...

मुर्ख आणि बावळट बोलणाऱ्या त्या दोघींपैकी
बावळट बोलणारी ती - बावळटला एवढं बोललो तरी काही परिणाम नाही.
मूर्ख बोलणारी ती - बघ ना... इतरांना काहीच पडलं नाही. आपण दोघीच भांडतोय.
हो ना जाऊ देत मरू देत... फास्ट ट्रेनमधल्या त्या अर्ध्या तासात गर्दीतही शांतता होती
मूर्ख आणि बावळट मात्र आत्ता ही पोस्ट लिहतेय तरी माझ्या कानावर आदळतंय आणि डोक्यात घुमतय...
ट्रेनमधलं हे खुपच सौम्य एकतर्फी भांडण होतं. इतर वेळेस मारामारीपर्यंत प्रसंग ओढवतो. असा एक प्रसंग खास तुम्हाला सांगायचा आहे. एका ब्लॉगमध्ये नक्की सांगेन.

इतर ब्लॉग्स