पैसा गेल्याचं दु:ख.. पैसा मिळाल्याचा आनंद..!

पैसा गेल्याचं दु:ख.. पैसा मिळाल्याचा आनंद..!

11.05 ची कसारा फास्ट. ट्रेन तशी रिकामी होती. दारात दोन बायका बसल्या होत्या. दोघींनीही पिवळी साडी काळे ब्लाऊज घातले होते. त्या केटररकडे  कामावर असाव्यात आणि एखाद लग्न किंवा एखादं फंक्शन आटपून घराकडे निघाल्या असाव्यात. (असं मला वाटतं) दरवाजात दोघी डोळे लावून बसल्या होत्या. एकीच्या कानात हॅण्डस फ्री होते. 

घरी निघालेल्या एका भाजीवालीने उरलेल्या भाज्या विकण्यासाठी डब्यात फेऱ्या सुरू केल्या.. ए... दस दस..कोई भी सब्जी दस दस. 

डब्यातल्या बायकांनी भाजी घेतली. माझ्या समोरच्या बाईने ब्रॉकली घेताना थोडी घासाघीससुद्धा केली. 

तिला भाजीवालीने सुट्टे पैसे दिले त्यानंतर ती अचानक पैसे शोधू लागली. तिचे पैसे पडले असं ती सांगत होती. माझ्या शेजारच्या सीटवरच्या बाईने ते पैसे घरंगळत जाताना पाहिले होते. तिने तिला दरवाज्यात 'खाली बसलेल्या बायकांना विचार' असं सुचवलं. 

त्या पिवळ्या साडीतल्या एकीने दुसरीला खुणवलं 'कॉईन ठेवलं ते ती शोधतेय. तिचं आहे' तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं.पुन्हा डोळे लावून झोपली. 

 आता खाली बसलेल्या दोघी. दरवाजातल्या बाईने कॉईन उचललं असं सुचवणारी ती बाई आणि जिचं कॉईन हरवलं ती, अशा चौघींमध्ये चुळबूळ सुरू झाली. दरवाजातल्या बाईला 'माझे पैसे घेतले का' कॉईन हरवलेल्या बाईने  विचारलं..

दरवाजातली ती हेडफोन कानात असलेली बाई - ते पैसे तुझे होते? नोट होती ? 

पैसे हरवलेली बाई - तु पैसे घेतले का? 

दरवाजातली बाई - नोट होती की नाणं? 

इतक्यात भाजी विकणाऱ्या बाईनेही मध्ये पडत - पैसे घेतलेस तर दे. 

दरम्यान दरवाजातली बाई ब्लाऊजमध्ये हा एकदा दहाचं नाणं काढून एकदा दहाची नोट काढून पैसे तुझे का असं पैसे हरवलेल्या बाईला विचारत होती..

पैसे हरवली ती बाई थोडी वयाने होती. चेहऱ्यावरुन थकलेली वाटत होती. काय बोलावं हे तिला कळत नव्हत. 

भाजीवालीने मात्र आता पैसे उचलल्याचा संशय असलेल्या बाईला चांगलं धारेवर धरलं. पैसे दिसले की उचलायचे का? काय बंगला बांधणार आहेस? 

दरवाजातल्या बाईने 'उडून आलेल्या पैशातून बंगला नाही होत. पैसे तुझे आहे का ? कशाला बोलते ? तू गप्प बस ना वगैरे आरडाओरड सुरू केली. मुंब्रा आल्यावर त्या दोघी उतरुन गेल्या..

आता मात्र पैसे गेलेली बाई शांत झाली. तिचे पैसे गेले आणि दरवाजातल्या बाईने घेतले हे तिला सांगणारी बाईही उतरुन गेली होती. भांडणाचा आवाज थांबला 

कॉईनचा उल्लेख झाला म्हणजे 1 ते 10 रुपयांपर्यंतचं नुकसान झालेलं असावं. कारण समोरच्या बाईने 40 रुपयाची भाजी घेतली होती. भाजीवलीकडून ब्रॉकली 20 ऐवजी 15 ला मागत होती. तेवढा त्यांचा व्यवहार मी पाहिला होता. तिचे पैसे पडताना आणि ते समोरच्या बाईने उचलताना मी पाहिले नव्हते. पण ज्या अर्थी 10 ची नोट किंवा 10 चं कॉईन काढून ती बाई सारखं विचारच होती त्याअर्थी 10 चं कॉईन पडलेलं असावं इतकं खरं होतं. 

एकीकडे 5 रुपये कमी करण्यासाठी भाजीवालीकडे भाव करणाऱ्या बाईने 10 रुपये असे सहजी जाऊ द्यावे. दुसरीकडे मरमरुन थोडे पैसे जोडणाऱ्या बाईने 10 रुपयेसुद्घा लपवावे? 

एकीकडे हक्कासाठी भांडण्याची ताकद नाही किंवा 10 गेले ही भावना. तर दुसरीकडे इतके मिळाले तर ते का सोडा आणि मी दिले तक मी घेतले हे कळेल अशी दुहेरी भावना होती. 

असो पैशाबाबत समाजात दिसणारे दोन गट त्या प्रवासात दिसले. एकीकडे पैसा गेल्याचं दु:ख नाही. दुसरीकडे कितीही मिळाला तरी कमीच असणार होता.

ज्याच्याकडे काही नसतं तो ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो..दरवाज्यात बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावर 10 चा ठोकळा मिळाल्याचा आनंद गाडीतून उतरताना लपवला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com