माझ्या आठवणीतील पुणे.. (डॉ. विजय जोशी)

representational image
representational image

16 वर्षं झाली इंग्लंडला येऊन.. वैद्यकीय व्यवसायामुळे इथेच राहावे लागले. कामाच्या व्यापामुळे पुण्यापासून दूर राहून ही सगळी वर्षे कशी गेली कळालेच नाही! अर्थात मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे वर्षातून एकदातरी पुण्याला जाणे हे नित्याचे होते. त्यामुळे माझे 'आठवणीतले पुणे' आणि सध्याचे वेगाने बदलणारे पुणे यांचे चित्र डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नसे. 

मला आठवणारे पुणे म्हणजे माझे शालेय जीवनातील पुणे.. गणपती उत्सवाने भारलेले पुणे.. दिवाळीत सुगंधाने न्हाणारे पुणे.. मे महिन्याच्या सुटीत मित्र आणि नातेवाईकांच्या सानिध्यात घालवलेले पुणे आणि इतर दिवशी सणासुदींची रेलचेल असलेले पुणे..! 

मे महिन्याची सुटी संपवून पुनश्‍च शालेय जीवनाची सुरवात जूनमध्ये व्हायची.. त्यामुळे पहिला महिना हा नवीन गणवेश, दप्तर खरेदी, पुस्तक खरेदी यात जायचा. नवीन पुस्तकांचा वास घेत अभ्यासाला सुरवात व्हायची. नव्या-जुन्या मित्रमंडळींबरोबर ओळख व्हायची आणि आपोआप सुटीतील गुपिते बाहेर पडायची.. 

हळूहळू नाईलाजास्तव शाळेत मन गुंतवावे लागायचे. त्यावेळी वाहतूक आजच्या सारखी नसल्यामुळे चालतच आम्ही शाळेत जात असू. वाटेत तीन-चार मित्रमंडळी गोळा करत आम्ही शाळेत पोचत असू.. मध्येच कुठेतरी रस्त्यावर पेरू, चिंचा, बोरे घेण्याचे उद्योग! क्रिकेट मॅचच्या वेळी रस्त्यावरील दुकानांमध्ये टीव्हीवर शतकी भागीदारी बघत अनेकदा शाळेला उशीर व हातावर बसलेल्या छड्या अजूनही आठवतात.. 

शाळेतही अभ्यास व इतर दंगामस्ती भरपूर.. नू. म. वि. प्रशालेत असल्यामुळे नवरात्रीला जोगेश्‍वरीच्या देवळात प्रसादासाठी आमची धडपड, तर गणेशोत्सवात आजूबाजूच्या गणपतीची सजावट बघ असले उद्योग.. तेही शाळेच्या दोन तासांच्या मधल्या मोठ्या सुट्टीत..! शाळेतील सगळ्यांत उत्साहाचे दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.. यावेळी नाटक, सिनेमा, खेळांच्या स्पर्धा व शेवटी बक्षीस समारंभ यात दिवस कसे जायचे हे कळायचेही नाही.. 

संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटायची.. घरी जाताना कुठे बर्फाच्या गाडीवरील बर्फ खा.. कधी मित्रांच्या सायकलवरून डबल-ट्रिपल सीट जा असले उद्योग चालायचे.. त्यावेळी क्‍लासची फार कटकट नसायची.. पण कालांतराने स्पर्धात्मक जगात ही एक गरज निर्माण झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने दमछाक व्हायला लागली. पण तेवढे दिवस सोडले, तर शालेय जीवन तसे सुखकारक होते. दप्तरांचे ओझेही फारसे नसायचे आणि परीक्षेचा काळ सोडल्यास इतर दिवस शाळेत कसे जायचे कळायचे नाही. अर्थात शाळेत कंटाळाही यायचा; पण सुट्ट्याही भरपूर असायच्या.. 

अशा सुट्यांमधील पुणे मनाला एक वेगळाच आनंद देऊन जायचे. शाळेत जुलै-ऑगस्टमध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन इत्यादी सण हजेरी लावायचे. नागपंचमीला घरोघरी साप घेऊन येणारे गारुडी, त्यांच्या पुंगीच्या तालावर नाचणारे साप पाहण्यासाठी आमची तारांबळ उडायची. रक्षाबंधनाला राख्यांच्या सजवलेल्या राख्या घेऊन नातेवाईकांकडे जाण्याची धांदल, तर नारळी पौर्णिमेला घरोघरी नारळी भाताचा आस्वाद! त्याचवेळी 15 ऑगस्ट म्हणजे शाळेत ध्वजवंदन आणि मग शाळेला सुट्टी! शाळेतून परतताना प्रत्येक चौकाचौकातील ध्वजवंदन व त्याभोवतीच्या फुलांचा सडा घालून सजवलेल्या नयनरम्य रांगोळ्या हे दर्शन विलोभनीय असे. त्या उत्साहास द्विगुणीत करणारी देशभक्तीपर गीते खरोखरीच एक नवचैतन्याची अनुभूती देत.. 

त्यानंतर खऱ्या अर्थाने पुणे भारले जायचे ते येणाऱ्या गणेशोत्सवामुळे! सगळीकडेच मांडव टाकले जायचे. रस्ते गजबजलेले असायचे. संगीताच्या चालीवर नाचणारी दिव्यांची रोषणाई आणि वैविध्यपूर्ण सजावट बघत आम्ही रात्री जागवायचो. शेवटी गणेशविसर्जन मिरवणूक म्हणजे आनंदाला उधाणच! शाळेला सुट्टी असल्यामुळे रात्रभर लक्ष्मी रस्ता पिंजून काढला जायचा. मानाच्या कसबा गणपतीपासून ते शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत आमचा मुक्काम लक्ष्मी रस्त्यावरच! 

त्यावेळी आमच्या सोसायटीतही आम्ही गणपती बसवायचो.. त्यामुळे सर्व सोसायट्यांमध्ये लगीनघाईचा उत्साह असायचा.. कुणी प्रसादात गुंतलेले, कुणी सजावटीमध्ये रममाण, कुणी नाटकाच्या तालमीत तर कुणी विसर्जन मिरवणुकीच्या आखणीमध्ये! मग शेवटच्या दिवशी आमची स्वतंत्र मिरवणूक. त्यासाठी ढोल-ताशांचा सराव.. 

गणेशोत्सवाची धामधूम ओसरते ना ओसरते तोच नवरात्रीचे आगमन.. पण त्यावेळी दांडिया, गरबाचा धुमाकूळ एवढा नव्हता.. दसऱ्याच्या दिवशी शाळेला सुट्टी आणि आम्ही सर्व आपट्याची पाने वाटण्यात दंग.. वडिलधारी मंडळी सोने खरेदीत.. या काळात आम्ही आतुरतेने वाट बघायचो ती कोजागिरी पौर्णिमेची.. पौर्णिमेच्या चंद्राला साक्ष ठेवून सोसायटीच्या गच्चीवर केशरयुक्त दूध पिण्यासाठी सगळी मंडळी हजर असायची.. 

या आनंदावर विरजण घालण्यासाठी सहामाही परीक्षा आणि पुन्हा अभ्यास एके अभ्यास! 

त्यानंतर आगमन व्हायचे ते दिवाळीच्या मंगलमय दिवसांचे. सर्वत्र आनंद आणि उत्साह वातावरणात भरलेला असायचा. दिव्यांचा झगमगाट आणि विविधरंगी आकशदिव्यांची सजावट ल्यायलेले रस्ते माणसांनी ओसंडून वाहत. निसर्गातही थोडा गारवा आलेला असायचा. शाळेला सुटी असल्यामुळे संपूर्ण दिवस आमच्या ताब्यात असायचा. 

दिवाळीच्या काही आदल्या दिवसांपासून आम्ही किल्ला तयार करण्यात गुंग! त्यासाठी माती गोळा करणे, सजावटीसाठी मावळे, शिवाजी महाराज यांचे पुतळे आणणे, अवतीभवती रांगोळी काढणे, अशा कामांमध्ये दिवस जायचा. संध्याकाळी चक्कर मग फटाक्‍यांच्या स्टॉल्सवर. कुठले फटाके घ्यायचे, कुठले नाही यावर रोज चर्चा व्हायची. अशा धामधुमीमध्ये वसुबारसेला गाय-वासराची पूजा करून खऱ्या अर्थाने दीपोत्सवाची सुरवात व्हायची. 

त्यानंतर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळत सारे आसमंत भरून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या चारही दिवसांचे स्वागत व्हायचे. नरकचतुर्दशीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून घराबाहेर पणत्या लावणे आणि फटाके उडविणे यात आमची चढाओढ असायची. त्यानंतर आमचे टोळके जायचे ते सारसबागेतील गणेश दर्शनासाठी! त्यावेळी दिवाळी पहाट वगैरे आजच्यासारखे कार्यक्रम नसायचे. तरीही सकाळी उदंड उत्साह आणि आनंद असायचा. सर्वत्र नव्याची नवलाई जाणवायची. मग घरी येऊन नातेवाईकांबरोबर घरच्या फराळावर ताव मारायचा.. त्यावेळी रेडीमेड फराळ अभावानेच मिळायचा.. 

अशातच दिवाळी चोरपावलांनी पुढे पुढे सरकायची.. मग लक्ष्मीपूजन-पाडवा-भाऊबीज! नवीन कपडे, भरपूर फटाके आणि घरी पाहुण्यांची रेलचेल, तर बाहेर दिव्यांचा झगमगाट, पणत्यांची आरास, सजवलेले मातीचे किल्ले व नयनरम्य रांगोळ्या.. पाडव्याला नवीन खरेदी तर भाऊबीजेला बहिणींना ओवाळणी हे नित्याचेच कार्यक्रम. अतिशय आनंदात घालविलेले हे दिवाळीचे मंगलमय दिवस कधी संपूच नयेत, असेच वाटायचे. शेवटी एकदा तुळशीच्या लग्नापर्यंत साठवलेले फटाके उडवून आता दिवाळी संपली आहे असे आम्ही जाहीर करायचो. 

आता एव्हाना पुण्यात थंडीचे आगमन झालेले असायचे. नवीन स्वेटरची खरेदी असायची. थंडीचा कडाका वाढला की नाताळची शाळेला सुटी लागायची. नाताळची खरी मजा कॅम्प बाजूला असायची. याचदरम्यान पुण्यात सुरांची पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सावची रंगत असायची. 

31 डिसेंबरला नववर्षाच्या आगमनाची तयारी करत रात्रीचा जल्लोष आम्ही अनुभवत असू. या रात्री टीव्हीवर रंगारंग कार्यक्रम असत. तर बाहेर हॉटेल्समध्ये तुडुंब गर्दी असे. नववर्षात मकर संक्रांतीला तीळगुळ देऊन गोड बोलण्याचे आवाहन सगळ्यांना केले जायचे. घरोघरी तीळगुण वड्या, लाडू तयार केल्या जायच्या. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची धामधूम असे.. शाळेत परीक्षा असल्या तरीही आम्हाला वेध होळीचे लागायचे. होळी आली थंडी जाळत असे ओरडत आम्ही होळीसाठी जुने-पुराणे सामान, टाकाऊ वस्तू, लाकूडफाटा, गोवऱ्या जमा करत असू. 

होळीनंतर रंगपंचमीला स्वत:ला आणि इतरांना रंगात रंगवून विद्रुप करायला आम्ही मोकळे! त्यावेळी मोबाईल सेल्फीचा जमाना नव्हता. मग गुढी पाडवा! सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जायच्या. राम नवमी, हनुमान जयंतीला आम्ही रामजन्माचा पाळणा हलविण्यास, प्रसादास रांगेत उभे! याचवेळी शिवजयंतीची मिरवणूक असायची. त्यामुळे खरोखरीच हिंदवी स्वराज्य आल्याचा भास व्हायचा. 

अभ्यासाला लागा, परीक्षा एक-दोन महिन्यांवर आल्या, अशी ताकीद घरातून मिळाली की आम्ही वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागायचो. खेळणे बंद, अभ्यास एके अभ्यास! शेवटी हा दोन-तीन आठवड्यांचा कठीण कालखंड सोडला, की एप्रिल-मेमध्ये आम्ही पुन्हा बंधमुक्त! दुपारी घरी एकत्र बसून पत्ते कुटणे, कॅरम खेळणे, पोहणे अशात वेळ जायचा. इतर वेळी आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या पाडणे, फणस काढणे, पर्वती चढायला जाणे हेही चालू असे.. 

त्यावेळी पुण्यात असे अनेक वाडे होते, की तिथे या फणस, आंबे, चिकू, पेरू, नारळाची झाडे होती. आता वाडे जमीनदोस्त होऊन फ्लॅट संस्कृतीत याचे दर्शन दुर्लभच आहे. जून सुरु होतानाच शाळेचा रिझल्ट आणि मृगनक्षत्राचे आगमन व्हायचे. नवीन मृदगंध अनुभवत मागचे वर्ष कसे भुर्रकन उडाले, हे कळायचे नाही. 

अशी अनेक वर्षे काळाबरोबर पुढे सरकली. शाळेतून कॉलेजमध्ये आलो. स्पर्धात्मक जगात क्‍लासेस, अभ्यास यांच्या ओझ्याखाली पूर्वीसारखे सणासमारंभात मिरवणे कमी झाले. मेडिकल कॉलेजमध्ये अजून अभ्यास वाढला. शिक्षण पूर्ण करून आता मी इंग्लंडमध्ये स्थायिक झालो. आजूबाजूच्या देशांत हिंडलो. पण पुण्यातले ते दिवस अजूनही आनंदाची स्मृतिचित्रे आहेत. त्या दिवसांची मजा इथे नाही हे खरे! अजूनही शनिवारवाडा किंवा एस. पी. कॉलेज मैदानावरची दणाणणारी भाषणे आठवतात आणि नकळत मन भूतकाळात जाते. 

आता इंटरनेटच्या जमान्यात पुणे तितकेसे दूर नाही. तरीही वेगाने बदलणारे पुणे आणि माझे आठवणीतले, मनाच्या गाभाऱ्यात दडलेले पुणे यात बराच बदल जाणवतो. उंची हॉटेल्स, वाढणारी मॉल संस्कृती, परदेशी वस्तू, गाड्या, परदेशी खाद्यपेयांची दुकाने यात अजूनही रस्त्यावरची पाणीपुरी, वडापाव खमंग लागतो. या नव्या पुण्यात पुण्याची श्रीमंती/विदेशीपणे उठून दिसते; पण माझे ओळखीचे पुणे हरवलेले दिसते. 

बर्गर किंग आणि पिझ्झा हटपेक्षा सिंहगडावर मिळणारे पिठले-भाकरी व दह्याची वाटी याची गोडी काही अवीटच आहे. खरं सांगायचं तर देशी परदेशी गाड्यांच्या घोळक्‍यातून परत एकदा पुण्याची सायकलवरून चक्कर मारावीशी वाटते आणि माझ्या ओळखीच्या पुण्याच्या खुणा कुठे दिसत आहेत का, हे आतुरतेने बघावेसे वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com