आसाराम नको, तुकाराम हवेत...

asaram bapu
asaram bapu

आसारामबापूच्या निमित्ताने भोंदूबाबांच्या आहारी जाणाऱ्यांनी स्वतःचेच कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच अशा बाबांवर प्रहार करत, सावधगिरीचा सल्ला दिला होता. आज आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम महाराजांच्या मार्गावरून चालण्याची खरी गरज आहे. 

काही महिन्यांपूर्वीची घटना. एका खासगी वाहनातून स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापूचे काही शिष्य प्रवास करत होते. अचानक वळणावरती चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला. तरीही, चालकाने वाहनावर प्रयत्नाने नियंत्रण मिळविले. ते जवळजवळ 360 अशांत फिरून उलट्या दिशेला तोंड करत उभे राहिले अन्‌ प्रवाशांनी सुटकेचा एकच नि:श्‍वास सोडला. आसारामबापूच्या भक्तांनी बापूमुळेच अपघाताचे मोठे संकट टळल्याचे सांगत आपल्या या गुरूचा धावा केला. आपल्या बापूमध्ये एवढे अलौकिक सामर्थ्य असेलच, तर तो स्वतःहून तुरुंगाबाहेर का येत नाही? न्यायालयाकडे जामिनासाठी वारंवार अर्ज का करावा लागतो? मुळात त्याने आपल्याला संकटात टाकलेच कशाला? आदी प्रश्‍न एकाही भक्ताच्या मनात उपस्थित झाले नाहीत. 

नुकतीच आसारामबापूला अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली, अन्‌ ही आठवण ताजी झाली. आपल्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर या बापूने चार दशकात दहा हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. या बापूसमोर लाखो सामान्य नागरिकांबरोबर अनेक दिग्गज राजकीय नेतेही सपशेल लोटांगण घेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह, असहकार, सत्य या मूल्यांच्या शिकवणुकीतून लाखो सामान्यजनांना प्रेरित करणाऱ्या बापूंपासून (महात्मा गांधी) आपली विचारशक्ती गहाण ठेवून, सर्वबाजूने शोषण करणाऱ्या या बापूपर्यंतचा प्रवास मती गुंग करणारा आहे. 

"आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण, विज्ञानाची दृष्टी घेतली नाही', असे डॉ. नरेंद्र दाभोळकर म्हणत असतं. हीच दृष्टी रुजविण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या दाभोळकरांच्या खूनालाही आता साडेचार वर्षे उलटली आहेत. न्यायालयाने अनेकवेळा नाराजी व्यक्त करून, फटकारूनही तपास यंत्रणा आरोपीच्या मुसक्‍या बांधण्यात अपयशी ठरल्या आहेत. या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच भारताची जगात बलात्काऱ्यांचा व विचारवंतांच्या हत्या होणारा देश, अशी ओळख बनत असल्याची खंतयुक्त टिप्पणीही केली होती. 

आसाराम काय किंवा इतर काय... 21 व्या शतकातील भोंदूबाबांची यादी वाढतच आहे. या भोंदूबाबांच्या भोंदूभक्तांची संख्याही अगणित. विशेष म्हणजे, यापैकी एकाही भोंदूबाबाच्या भक्ताला बाबा गजाआड गेल्यानंतरही आपली श्रद्धा तपासून घ्यावी, असे अजूनही वाटत नाही. बलात्काराच्या खटल्यातील साक्षीदारांचे खून पाडण्यापर्यंत आसारामच्या भक्तांची मजल गेली. कोणावरचीही अविवेकी, अविचारी(अंध)श्रद्धा माणसाला किती खालच्या पातळीपर्यंत नेऊ शकते, याचे हे डोळस उदाहरण. 

आपल्या देशाला महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार दिला. मध्ययुगीन काळात विविध संतांनी महाराष्ट्राच्या मनोभूमीत पुरोगामी, विवेकी बिजांचे रोपण केले. संत ज्ञानेश्‍वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनीच आयुष्यभर या विचारांचाच जागर केला. तुकाराम महाराजांनी 16 व्या शतकात आपल्या परखड अभंगातून भोंदूबाबांचा समाचार घेतला. ते म्हणतात.. 

ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू। 
अंगा लावूनिया राख। डोळे झाकूनि करिती पाप। 
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा। 
तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।। 

अध्यात्माच्या नावावर वैराग्याचे सोंग आणत प्रत्यक्षात विषयवासनेच्या आहारी जाणाऱ्यांची संगत टाळण्याचा सल्ला तुकारामांनी या अभंगातून दिला. खरंतर, तुकोबांनी असे असंख्य अभंग लिहिले असले तरी वानगीदाखल हा एकच अभंग पुरेसा आहे. 

16 व्या शतकातील तुकाराम आज 21 व्या शतकातही कालप्रस्तुत वाटतात. तुकोबांचा "जे का रेजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथिची जाणावा,' हा अभंग तर खरा संत, साधू ओळखण्याची खूणच ठरावी. एकीकडे विठ्ठलभक्तीत रममाण होतानाच, या महान संताने अनिष्ट प्रथा, रूढी, कर्मकांडातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या शोषणास कायमच विरोध केला. ते करणाऱ्या बाबाबुवांवर त्यांनी आपल्या अभंगातून सातत्याने आसूड ओढले. त्यांच्या काळातही अध्यात्माचा बाजार मांडून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या बुवांचे पीक जोमात होतेच. ही सर्व परिस्थिती पाहूनच त्यांनी "शहाणे करून सोडावे सकळ जन,' या भूमिकेतून जनतेला सावध केले. स्वत: धर्मद्रोही ठरविले जाण्याची शक्‍यता गृहीत धरूनही हा द्रष्टा संत सामान्यजनांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. तुकोबा आज असतेच तरभोंदूबाबांना डोक्‍यावर घेणारी लाखोंची झुंड पाहून "बुडती हे जन देखवेना डोळा, येतो कळवळा म्हणूनिया' हा अभंग कितीदा म्हटले असते, कुणास ठाऊक . 

न्या. रानडे, आगरकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या आधुनिक संत - विचारवंतांनीही या विचारांचाच पाया मजबूत केला. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी, विवेकी होण्यासाठी शिक्षणाची गरज असतेच हा समज गाडगेबाबांनी खोटा ठरवला. 

आपल्या देशात पूर्वी शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी होते. देश सुशिक्षित होईल, तसे विवेकी व्यक्तींची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा होती. आज मात्र, सुशिक्षित अंधश्रद्धेच्या बाबतीत अशिक्षितांशी स्पर्धा करत आहेत. दुर्देवान, महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांपासून अशा भोंदूबाबांचे पीक जोमाने फोफावत आहे. सुरवातीची काही वर्षे या बाबाबुवांकडून भाविकांचे शोषण बिनबोभाट सुरू असते. आपले शोषण होतेय, हेही अनेक भाविकांच्या लक्षात येत नाही. मग, बलात्कारासारख्या घटनेविरुद्ध एखादा भाविक धाडसाने आवाज उठवतो. अशावेळी एरवी बाबाकडे संरक्षणाची भीक मागणारे इतर भाविक आपल्याच बाबाच्या रक्षणासाठी पुढे सरसावतात. त्यामुळे, मुळात अशा बाबाच्या आसऱ्याला न जाणेच अधिक श्रेयस्कर. आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम हवेत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com