राजकारणाचे 'कर'नाटक

karnataka
karnataka

हे घडलं...
सकाळी

08.00 : मतमोजणीला सुरूवात; काँग्रेस आघाडीवर
10.30 : भाजप आघाडीवर
11.00 : भाजप बहुमताकडे; देशभर जल्लोष
दुपारी
01.00 : त्रिशंकू; धर्मनिरपेक्ष जनता दल किंगमेकर; कुमारस्वामींसाठी रस्सीखेच
03.00 : काँग्रेसचा ओढा कुमारस्वामींकडे
संध्याकाळी
05.00 : येडियुराप्पा राजभवनात; बहुमत सिद्ध करण्यासाठी मागितला वेळ
06.00 : मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामींपाठोपाठ राजभवनात; कुमारस्वामींना काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा

हे समजलं...हे उमगलं..
1. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमुळं कल झटपट समजायला लागतात; पण हे कल काहीवेळा चकवा देतात. गुजरातच्या निकालावेळीही काँग्रेस काही काळ आघाडीवरचा पक्ष होता. जल्लोष करायच्या वेळी काँग्रेस नेमका मागे पडत गेला. आज कर्नाटकात भाजपला हाच अनुभव आला. निकालाचा कल एकवेळ भाजपला बहुमत देऊन गेला; प्रत्यक्षात भाजप बहुमताच्या अलिकडेच अडखळला.

2. काँग्रेसने गोव्याच्या निवडणूक निकालापासून काही धडा शिकला आहे. गोव्यात चर्चेचे गुऱहाळ इतके लांबले की सत्तेचा लोण्याचा गोळा भाजपने पळवला. कर्नाटकात काँग्रेसने ही चूक केली नाही. सत्ता मिळणार नाही, हे समजताच काँग्रेसने कुमारस्वामींना थेट बिनशर्त पाठिंबा जाहिर केला आणि भाजपने गोव्यात केलेली खेळी दहापट मोठ्या कर्नाटकात उलटवली.

3. बहुमताच्या इतक्या जवळ येऊन कर्नाटकसारखे मोठे राज्य भाजप सहजपणे गमावणार नाही. कुमारस्वामींचा धर्मनिरपेक्ष जनता दल भक्कम बांधणी असलेला पक्ष नाही. कुंपणावरच्या कार्यकर्त्यांना चुचकारणे भाजपला अवघड नाही. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्याबाहेर दोन आमदार निवडून आले आहेत. त्यांना गुंडाळणेही भाजपला अशक्य नाही. येडियुराप्पांनी राजभवनात राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ मागितला, तो याच कारणांसाठी असावा.

4. कर्नाटकात जात आणि धर्म या दोन गोष्टींचे धृवीकरण (पोलरायझेशन) झालं, हे नाकारता येणार नाही. काँग्रेसने लिंगायतांच्या धृवीकरणाचा प्रयत्न केला तर भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा हातचे न राखता रेटला. जात आणि धर्म या दोन मुद्दयांपलिकडे कर्नाटकसारख्या विकसित राज्यातल्या निवडणुकीत विकासाचे मुद्दे चर्चेला आले नाही, हे लक्षण लोकशाहीसाठी निश्चितच चांगले नाही.

5. मुस्लिम मतांच्या टक्क्याचे राजकारण संघ परिवाराने जवळपास मोडीत काढले आहे. याची सुरूवात लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सत्तरावर जागा मिळवून झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने मुस्लिम मतांचा टक्का वगळूनच मतांची बांधणी केली. परिणामी, मुस्लिम मतांच्या एकगठ्ठा मतदानाचा परिणाम भाजपवर ना उत्तर प्रदेशात झाला, ना गुजरातेत ना कर्नाटकात. काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत हे समजून घेत मंदिरांना भेटीचा कार्यक्रम राबवला. कर्नाटकातही मुस्लिमेतर जाती-धर्माच्या स्थळांना आवर्जून भेटी दिल्या. त्याचा परिणाम झाला किंवा नाही, हा मुद्दा नाही. मात्र, मुस्लिम मतांचा टक्का पूर्णपणे वगळून राजकारण करायचे, ही भाजपची पॉलिसी काँग्रेसने दचकत का होईना स्विकारली आहे, हे कर्नाटकातही दिसले.

6. कर्नाटकनंतर थेट लोकसभेचीच निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला स्वबळावर काही करता येणं शक्य नाही, हे आता पुरेसं स्पष्ट झालं. काँग्रेसला प्रादेशिक पक्ष सोबत घ्यावेच लागतील आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या असलेल्या/नसलेल्या ताकदीचा भ्रम सोडावा लागेल. कर्नाटकात कुमारस्वामींसाठी जो त्याग काँग्रेस आज करत आहे, त्याहून कदाचित मोठा त्याग इतर राज्यातही काँग्रेसला करावा लागेल.

7. भाजपच्या 2014 च्या अफाट यशानंतरचा प्रत्येक राज्याचा निकाल प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संकुचित करतो आहे. मात्र, कर्नाटकातील निकालात धर्मनिरपेक्ष जनता दलासारख्या प्रादेशिक पक्ष केंद्रस्थानी आला. भाजप प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरतो. काम संपले, की या शस्त्राचे महत्व कमी कमी करत नेतो. या काळात भाजप स्वतःचे स्थान अधिक भक्कम करत जातो. महाराष्ट्रात शिवसेनेचे, हरियाणात तिथल्या प्रादेशिक पक्षांचे कलम करण्याचा खेळ भाजपने केला. हा खेळ कर्नाटकातल्या निकालानंतर कितपत चालेल, याचा विचार भाजपला करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com