उच्चशिक्षितांची अश्लिल विकृती...

social media crime
social media crime

'एमसीए'चे शिक्षण घेत असताना पॉर्नसाइट्‌स पाहण्याचे लागलेल्या व्यसनामुळे अटक केलेला लातूरचा संशयित विकृत झाला. त्यातूनच त्याने सोशल साइट्‌सवर मुलींच्या नावाने बनावट खाती उघडून मुलींशी अश्‍लील संवाद साधणे, व्हिडिओ कॉल करून अश्‍लील वर्तन करीत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या युवकाने तब्बल 658 महिलांना त्रास दिल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु, इंटरनेट विश्वात तो एकटाच नाही तर अनेकजण आहेत. ऐन तारुण्यात अशा प्रकारची विकृती जोडून अनेकांचे भवितव्य अंधारमय होताना दिसत आहे...

इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना. यामधून काय घ्यायला हवे अन् काय नको, हे नेटिझन्सवर अवलंबून असते. इंटरनेटने जग जवळ आणून ठेवले आहे... सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, हे सगळे खरे. पण... त्याचा चांगला वापर केला नाही तर परिणाम भोगावे लागतात. इंटरनेटच्या अतिवापराने अनेकांच्या मनावर परिणाम होताना दिसत आहे. अनेकजण पॉर्न साइट्स पाहताना दिसतात. एकदा सवय लागली की त्याचे व्यसनात कधी रुपांतर होते हे कळतही नाही. मग त्यामधून विकृती वाढत जाते.

सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा मोठा वापर होत आहे. राजकीय व्यक्तींपासून ते मोठं-मोठे व्यावसायीक सोशल नेटवर्किंगचा चांगल्या प्रकारे वापर करून नेटिझन्सला जोडण्याचे प्रयत्न करतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून काय शक्य नाही? असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर सर्वच शक्य आहे, हे निघेल. पण... दुसऱया बाजूला अनेकजण त्याचा गैरवापरही करताना दिसतात. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर अनेकजण बनावट खाते तयार करून त्याचा गैरवापर करताना दिसतात. यामधून मोठी फसवणूक होत असल्याच्या बातम्याही झळकत असतात. तरीही काही जण या मोहरुपी जाळ्यात अलगत ओढले जातात अन् अडकतात. या जाळ्यातून सुटका होत नाही असे समजल्यानंतर शेवटी पोलिसांकडे धाव घेताना दिसतात. फेसबुकने नुकतीच तब्बल 58.3 कोटी  बनावट खाती डिलीट केली आहेत. या आकड्यावरूनच जगभरात फसवणाऱयांची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येते.

इंटरनेटवर कमी शिकलेला अथवा न शिकलेला फसला जातो अथवा फसवतो असे नाही तर विकृतीनंतर हे प्रकार घडताना दिसतात. लातूरमधील उच्च शिक्षण घेणाऱया युवकाला महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान पॉर्नसाइट्स पाहण्याचे व्यसन लागले अन् तो विकृत झाला. दिवसेंदिवस विकृती वाढत गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवतींना लक्ष्य करून त्यांच्याशी अश्‍लील संवाद साधायचा, तर कधी अश्‍लील व्हिडिओ पाठवायचा. त्याने आणखीही काही युवतींना त्रास दिल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी-व्यवसाय करण्याचे सोडून तो पॉर्नसाइट्स पहात बसला अन् अडकत गेला. त्याची शिक्षा त्याला भेटणारच आहे. पण... आजही या मार्गावर अनेकजण आहेत. संगणक, लॅपटॉप, मोबाईलच्या माध्यमातून अनेकजण पॉर्नसाइट्स पाहात असतात, असे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

उच्च शिक्षण घेऊन या विकृतीमध्ये अडकायचे की माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन झेप घ्यायची हे ठरविण्याची वेळ येवून ठेपली आहे. अन्यथा उच्च शिक्षण घेऊन जीवन उद्धवस्त होण्यास वेळ लागणार नाही. इंटरनेटवर चांगल्याबरोबरच वाईट गोष्टी पण आहेत. पण... काय घ्यायचे हे ठरवावे लागणार आहे. उच्च शिक्षितांमध्ये अश्लिल विकृती वाढण्याचे नेमके कारण काय आहे? कशामुळे अशी कृत्ये होतात? यापासून दूर जाण्यासाठी काय करायला हवे? आहे तुमच्याकडे काही उत्तर... तुमच्याकडे काही सुचना असतील तर जरूर प्रतिक्रियांच्या माध्यमातून मांडा. तुमच्या एका प्रतिक्रयेमुळे काही प्रमाणात फरक पडला तरी अनेकांचे नुकसान टळणार आहे.... चला प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त व्हा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com