β निर्लज्जांनो, आधी "पोलिसातील माणूस' बघा !

β निर्लज्जांनो, आधी "पोलिसातील माणूस' बघा !

काल शिवाजीनगरला वाहतुक पोलिसांची व्हिडीओ शुटींग करून त्यांच्याशी काही टवाळखोर हुज्जत घालत होते. त्यातच आज सकाळी मुंबईच्या वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. तर रात्री नऊ वाजता पुण्यातील एका पेठेत दुकानदार व महिलेची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचीच कॉलर पकडून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या वर्दीला हात घालण्याबरोबरच थेट त्यांचा जीव घेण्याची माजुरडी वृत्ती नेमकी आली कुठून ? इतके स्वस्त झालेत का पोलिसांचे जीव ! कुणीही उपटसुंभाने उठावे आणि आमच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलावा, अधिकाऱ्यांना शिव्या घालाव्यात, कुठल्या-कुठल्या कायद्यांची धमकी देऊन त्यांना "ब्लॅकमेल‘ करावे, त्यांच्याकडूनच खंडणी वसुल करावी.. काय सुरू आहे हा सगळा प्रकार? या सगळ्याचा अर्थ असा आहे, की पोलिसांचे हात बांधलेले आहेत. 

तिकडे पाकिस्तानच्या एका गोळीला दहा गोळ्यांनी उत्तर द्या, असे सांगणारे मोदी सरकार... इकडे मात्र समाजाचे रक्षण करणारे पोलिसच काही टुकारांचे लक्ष ठरत असतानाही शिंदे यांच्या कुटुंबाला केवळ सरकारी नोकरी देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार त्याच पक्षाकडून होतो आहे. एक पोलिस अधिकारी व कर्मचारी तिकडे त्या बिहार कि कुठल्या राज्यात जाऊन गुन्हेगाराला पकडताना छातीवर गोळ्या झेलतात, तरीही त्याचे इथल्या निगरगट्ट राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला काहीच सोयरसुतक नाही. समाजाबद्दल तर न बोललेलेच बरे आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्या, त्यांना उठता-बसता शिवीगाळ करणाऱ्या आणि मोबाईवर त्यांची शुटींग काढणाऱ्या महाभागांनी कधी तरी त्यांचा "पॉझिटीव्ह‘ विचार करून बघावा.

तुमचे सण, उत्सव, समारंभापासून ते तुमच्या नेत्यांच्या सुरक्षिततेपर्यंत सगळ्या गोष्टी पोलिसाशिवाय पुर्ण होत होतात काय? कधी ऊन-पाऊस कि थंडी-वारा न बघता 24 तास पोलिस तुमच्यासाठी धडपडत असतो. कधी बघितलयं पोलिस स्टेशन बंद आहे ते! अरे निर्लज्जांनो पोलिस स्वतःचा तर सोडाच, पण आपल्या लेकराबाळांच्या वाढदिवसालाही कधी हजर राहत नाही रे! ड्युटीची वेळ संपत असतानाच आलेल्या एखाद्या "डेडबॉडी‘चं पोस्टमार्टम करून ते त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापर्यंतचे काम पोलिस करतो. त्या डेडबॉडीची दुर्गंधी त्यांचे नातेवाईकही घेऊ शकत नाही, तिथे हा माणुस शेवटपर्यन्त थांबतो तो कुठल्याही तक्रारीविना. तुम्ही दारू ढोसून गाड्यांवर बोंबट्या मारतात, तेव्हा तुमचा जीव जाऊ नये, म्हणून तुमच्या तोंडाचा वास घेऊन स्वतःचे आरोग्य बिघडवून घेणारा हाच पोलिस ना! तिकडे दिवसभर चौकांमध्ये थांबून वाहतुकीचे नियंत्रण करताना प्राणघातक वायु छातीत भरुन आजाराला निमंत्रण देणारा हाच माणुस ना! वाहतुकीचे नियम तुम्ही मोडणार, तुम्हाला जाब विचारून दंड भरायला सांगितला की त्याच्यावरच डाफरत तोंडावर शंभरची नोट फेकताना लाज वाटत नाही का रे तुम्हाला? कोणत्याही दादा, भाईच्या मुसक्‍या आवळणारा हाच असतो ना! कधी करतो स्वतःच्या जीवाची पर्वा तो? होय... घेत असेल तो पैसे, पण तुम्हीच भाग पडता त्याला पैसे घ्यायला. चिडत असेल तुमच्यावर, देतो तुम्हाला त्रास तो. त्याच थोडेफार प्रमाण असेलही, पण त्यांच्यातही चांगले गुण असतातच की. चांगले, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी-अधिकारी आहेतच की! अहो, कोट्यवधींची लुट करणारे, भ्रष्टाचार करणारे तुम्हाला चालतात...तुम्ही एकदा मत दिले की पाच वर्ष तुम्हाला लुबाडणारे राजकारणी, उद्योजक तुम्हाला चालतात, मग पोलिसानी काय तुमचे घोडे मारले आहे? एकदा बिहार, दिल्लीमध्ये जाऊन आल्याशिवाय तुम्हाला "महाराष्ट्र पोलिस"चं महत्व कळणारच नाही. 


गणेशोत्सव किंवा कुठल्याही उत्सवात हा बिचारा 28-29 तास रस्त्यावर उभा असतो, त्यांना तुम्ही कधी जेवण की, कधी पाणी विचारत नाहीत. त्याची साधी चौकशी करत नाही. तरीही तो तुमच्यावर नाराज नसतो. तुमच्या सुरक्षिततेसाठी हा बिचारा आपल्या "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय‘ या बिरूदाला जागत दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या छाताडावर घेतो. हाच पोलिस कर्मचारी/अधिकारी कधी तुकाराम ओंबाळे, कामठे, साळसकर किंवा हेमंत करकरे होऊन तुमचा जीव वाचवितो, तर कधी एखाद्या बेवारस, अनाथ, हरवलेल्यांचा आणि मुक्‍या जनावराचे प्राणही वाचवतो. त्यांचा आधार बनतो. साहेब पोलिसांवर टीका करणं खूप सोपं आहे हो; पण कधी तरी त्याच्या कामाचे कौतुक करा. पाठीवर हात ठेवून कधी तरी लढ म्हणा..बघा हा वाघ कसा डरकाळी फोडतोय! 

तुम्हाला हात जोडुन विनंती आहे, वर्दीवर हात उचलु नका, नाहीतर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com