प्लॅस्टिकबंदी आणि आपण... 

प्लॅस्टिकबंदी आणि आपण... 

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूतार्वर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला. शनिवारपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. दंडात्मक कारवाई म्हणून अगदी पाच हजाराची पावतीही फाडायला सुरवात झाली. सामान्यांच्या रोजच्या जीवनात प्लॅस्टिकचा वापर (खरंतर अतिवापर) होत असल्याने या निणर्याचा परिणाम आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाल्या. या निर्णयाची खिल्ली उडवणारे, विनोदी मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातून क्षणभर मनोरंजन झाले पण मूळ प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. 

अल्प काळातच प्लॅस्टिकने आपले आयुष्य व्यापले. घरात येणारी जवळपास प्रत्येक वस्तू आता प्लॅस्टिकच्या बॅगमधून येऊ लागली आहे आणि म्हणूनच प्लॅस्टिकबंदीच्या निणर्याचा मोठा फटका आपल्याला जाणवला. खाद्यपदार्थ विक्रेते, लघुद्योग, किंवा पॅकेजिंगसाठी लागणारे प्लॅस्टिक यावर बंदीचा होणारा परिणाम हा वेगळा विषय आहे. सध्या फक्त सामान्य लोकांपुरताच हा मुद्दा पाहूया. थोडा विचार केला तर लक्षात येईल आपल्या घरातील, रोजच्या जगण्यातील निम्म्याहून अधिक गोष्टी या प्लॅस्टिकपासून बनलेल्या आहेत. यातील बादली, मग, कुंड्या, डबे अशा काही वस्तू आपण वर्षानुवर्षे वापरतो. मात्र, बाजारातून सामान भरून आणलेली पिशवी, वेष्टनासाठी वापरलेले प्लॅस्टिक बॅग, खाद्यपदार्थ किंवा साखर-डाळीच्या एक किलो, पाच किलोच्या पिशव्या रिकाम्या होताच कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. रस्त्यावरील भाजीवाल्यापासून ते मोठ्या दुकानांपर्यंत छोट्या मोठ्या खरेदीवर ते सामान ठेवण्यासाठी मिळणारी (कधी कधी तर 2-3 कॅरीबॅगही मिळत असत) पातळ, पारदर्शी कॅरीबॅग रोजच घरात येत असे. तीसुद्धा बहुतांशवेळा अशीच कचऱ्यात जात असे. तिचा पुर्नवापर फार कमी केला जात असल्यामुळे असा प्लॅस्टिकचा कचरा ओसांडून वाहू लागला. या बेजबाबदारपणामुळेच प्राण्यांच्या शरीरात प्लॅस्टिक जाण्यापासून ते नद्या-नाल्यांमध्ये पाणी तुंबण्यापर्यंत अनेक दुर्घटनाही घडल्या. समुद्रकिनारी आणि समुद्रात प्लॅस्टिकचा कचरा वाहून आल्यामुळे तिथे उद्भवणाऱ्या समस्या आणखी वेगळ्याच आहेत. या सर्वांचा पर्यावरणावर निश्‍चितच विपरित परिणाम होत होता, त्यामुळे प्लॅस्टिकबंदीसारखा निर्णय सरकारने घेतला.

प्लॅस्टिकऐवजी कागदी पिशव्या, कापडी पिशव्या वापराव्यात, असंही प्रबोधन केलं जात आहे. कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, कागदनिमिर्तीत बरेच पाणी प्रदूषित होते, ते रसायनमिश्रित पाणी समुद्रासारख्या स्रोतात सोडले जाते. यातूनही पर्यावरणाची हानीच होत आहे. एकीकडे आपण 'पेपरलेस' होण्याचा आग्रह धरत असताना आता कागदी पिशव्यांचा पर्याय कितपत रास्त आहे, याचाही विचार व्हायला हवा. त्याशिवाय कागदी पिशव्यांचे आयुष्य, क्षमता आणि किंमत याचाही विचार व्हायला हवा. सध्या बाजारात नव्याने दाखल झालेल्या पांढऱ्याशुभ्र पिशव्या पाहिल्या तर हाच मुद्दा थोड्याफार प्रमाणात लागू होत असल्याचे लक्षात येईल. त्यांचे विघटन होऊ शकते, पर्यावरणपूरक आहेत, ही त्याची जमेची बाजू. 

प्लॅस्टिकबंदी यशस्वी झाली तरी त्यानंतरचे चित्र फार आशादायी असेल असे वाटत नाही. फार तर कचऱ्यातील प्लॅस्टिकची जागा रद्दी पेपर, कागदी व कापडी पिशव्या घेतील. कारण 'युझ अँड थ्रो'ची सवय असलेल्या लोकांना वस्तूंचा पुर्नवापर, काटकसर या गोष्टी माहितीच नाहीत. एकदा वापरलेली (कधीकधी तर न वापरताही) प्लॅस्टिकची पिशवी थेट कचऱ्यात फेकून द्यायची संस्कृती अनेक ठिकाणी होती. नाही म्हणायला काही घरांमध्ये पातळ पिशव्यांचा उपयोग फ्रीजमध्ये भाजी ठेवायला किंवा ओला कचरा साठवण्यासाठी केला गेला. पण दोन-चार दिवसांनी ती पिशवीही कचऱ्याच्या डब्यातच जातात. मोठ्या जाड पिशव्या कधीतरी कामी येतील म्हणून अनेक गृहिणींनी साठवूनदेखील ठेवल्या होत्या. पण असा पुनर्वापर फार कमी असल्यामुळेच कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. मागच्या काही वर्षातील आपल्या बदललेल्या जीवनशैलीकडे पाहिले तरी हा बदल जाणवू शकेल. खरं तर प्लॅस्टिक वजनाने हलके, किफायतशीर व सोयीस्कर असल्याने मागच्या काही वर्षात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला. काही ठिकाणी स्टील, लोखंड, कागद, पुठ्ठा याला पर्याय म्हणून प्लॅस्टिक अधिक फायद्याचे वाटले. मात्र, ज्या प्रमाणात वापर वाढला त्या प्रमाणात या प्लॅस्टिकचा पुर्नवापर तसेच पुर्नप्रक्रिया झाली नाही आणि त्यामुळेच आज आपल्याला प्लॅस्टिक प्रदूषणाने विळखा घातला आहे. आताही काही ठराविक प्रकारच्या प्लॅस्टिक वापराला परवानगी आहे. अजूनही आपण प्लॅस्टिकचा कचरा इतर कचऱ्यासोबतच देतो. किमान आतातरी प्लॅस्टिकचा शक्‍य तेवढा पुर्नवापर आणि वापरास अयोग्य प्लॅस्टिक कचऱ्यात न टाकता त्याचे वेगळे संकलन करून ते पुर्ननिर्मितीच्या प्रक्रियेसाठी जाईल, याची काळजी घ्यायला हवी. फक्त प्लॅस्टिकच नाही तर पाणी, हवा, खनिजसंपत्ती अशा सर्वच साधनसंपत्तीचा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक वापर करण्याची वेळ आली आहे. थोडक्‍यात, आपल्या सुखसोयींसाठी उपलब्ध असलेल्या या गोष्टींचा वापर करण्याच्या पद्धतीचाच आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे, आपली चंगळवादी मानसिकता बदलावी लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com