वाढीव तू वाढीव

file photo
file photo
नेमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दर गणपतीला डीजे ची चर्चा होते. कधी कमी ,तर कधी जास्त, तरी तो कुठे वाजतो तर कुठे नाही. यावेळी थोडी चर्चा जास्त झाली इतकेच. पण त्यामुळेच असेल कदाचित, मनात एक विचार आला की नक्की डीजे चा डेसीबल असतो तरी किती तो स्वतः च मोजावा आणि मग खात्री करून घ्यावी. " सीइंग इज बिलिव्हिंग" असे म्हणतात. त्यामुळे मग अनंत चतुर्दशी ला पुण्यातला नळ स्टॉप, कर्वे रोड, अलका चौक, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड वरून परत अशी ३ तासाची पायी रपेट केली. फरक इतकाच केला की सोबत लोकेशन ट्रॅक करणारे गुगल फिट आणि डेसीबल ट्रॅक करणारे देसीबल एक्स हे अँप पूर्ण वेळ चालू ठेवले. या छोट्याश्या इन प्रोम्पटू सर्व्हेतून लक्षात आलेल्या गोष्टी मात्र खूप इंटरेस्टिंग होत्या.

या तीन तासात मिनिमम देसीबल ८० डीबी तर मॅक्सिमम देसीबल हे तब्बल १२३ डीबी नोंदले गेले. लक्ष्मी रोड वर ढोल ताष्यांपासून १० फूट अंतरावर ११५-११६ डीबी ची सर्वाधिक नोंद होती तर त्यांच्यासमोर थांबलेल्या १० मिनिटांच्या कालावधीचा एव्हरेज हा १०३-१०४ डीबी च्या आसपास होता. मात्र, हाच प्रयोग कर्वेरोड ला डीजे शेजारी केल्यावर तिथला सर्वाधिक आकडा हा १२३ डीबी होता तर एव्हरेज आकडा ११३ डीबी होता. याला कारण कदाचित सिस्टीम सतत वाजत राहते तर ढोल ताशांचा आवाज कमी जास्त होत राहतो हे असू शकेल. गमतीचा भाग म्हणजे या रपेटीत सर्वात जास्त त्रास झाला तो पिपाण्यांचा. त्यांच्या कर्णकर्कश आवाजाची रेंज ही तब्बल १०६ डीबी वगैरे होती. अर्थात या सगळ्या निरीक्षणात थोडीफार ह्युमन एरर आणि अँप ऍक्युरसी चा प्रश्न आहेच. तरीही निदान काही एक अंदाज या सर्व्हे ने दिला.

मग आता प्रश्न पडतो की सर्व्हे केला, पुढे काय? डीजे वर बंदी तर आधीपासूनच आहे, मग या सर्व्हेचा उपयोग काय? पण या सगळ्या उपक्रमातून असे लक्षात आले की मुद्दा हा कायद्याचा व यंत्रणेचा नसून मुद्दा हा मानसिकतेचा आहे. नुसती बंदी आणून वा कायदा करून जर का प्रश्न सुटत असते तर एव्हाना बरेच प्रश्न सुटले असते. एखादी गोष्ट करू नये हे समाजाने एकत्र येऊन ठरवावे लागते ,तेव्हा कुठे बदलला सुरुवात होते. आणि त्यासाठी घडवावे लागते ते समाजमान. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण आयदर बंदीची भाषा बोलतो किंवा मग आमच्याबाबतीच का ? अशी विरोधाची भाषा बोलतो. त्यापेक्षा आवाज मर्यादेत नक्की काय हवा आणि तो प्रत्यक्षात किती असतो हे सांगत राहिले तर ते मनातून जास्त कंव्हीन्स होईल ना. माझ्यापुरता मी सर्व्हे केल्यावर आणि अनुभव आल्यावर माझं मी कंव्हीन्स झालो की आवाज खरच मर्यादेबाहेर असतो आणि तो मर्यादेत हवा. मी फेसबुक पोस्ट टाकली आणि काही हजार जणांनी ती वाचल्यावर कदाचित काही प्रमाणात तेही कंव्हीन्स झाले असतील. त्यामुळे सतत असे प्रयोग करत राहणे आणि खरी, योग्य माहिती ट्रान्सपरंट पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत राहणे हा जनमत घडवण्याचा एक सोपा मार्ग असू शकतो.

खरतर मी स्वतः अवघ्या पंचवीशीतला एक तरुण आहे आणि या वयात असणारी तारुण्य सुलभ ऊर्जा माझ्यातही आहे. शिवाय जास्त डीबी चा आवाज असला की शरीरातील ऊर्जा वाढते हेही खरे आहे. पण, मुद्दा उरतो तो तारतम्याचा. आपल्याला नाचून आनंद मिळत असेल तर तो बाय चॉईस आपण एखाद्या पब किंवा ओपन स्टेडियम मध्ये जाऊन एखाद्या कार्यक्रमात मिळवला तर हरकत कोणाचीच असायचे कारण नाही. एकतर , आपण तिथे आपली एनर्जी रिलीज करण्यासाठीच जमलेलो असतो आणि त्याचा बाकी कोणाला त्रास होत नसतो. पण तीच गोष्ट आपण जर का रस्त्यावर करत असू तर ज्यांना हे सर्व नको आहे त्यांच्यावर आपण ती लादत असतो. शिवाय, गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय असल्याने आपल्या नकळत आपण कोणाची श्रद्धा तर दुखावत नाही ना हेसुद्धा पाहावे लागते. बर, कित्येकदा रस्त्याचा ओपन डान्स फ्लोअर होत असताना उत्साह उन्मादात कन्व्हर्ट होतो. त्याने होणारे परिणाम वेगळेच.

आणि मग उरतो तो प्रश्न आपला व्यवस्थेवरच्या विश्वासाचा. एका बाजूला न्यायलयीन निर्णय, दुसऱ्या बाजूला तरुणाईला नाकारता न येण्याची राजकीय अपरिहार्यता, हजारो लोकांसाठी उपलब्ध असणारे तोकडे पोलिसबळ आणि तारुण्यसुलभ उत्साह या साऱ्याचा मेळ नक्की कसा घालायचा? आणि आपल्या मनाजोगे झालेच नाही तर मग त्यासाठी सर्वच व्यवस्थाना वेठीस धरायचे का? तसे धरल्याने नक्की काय साध्य होते? का आवाजाच्या झिंगेत आपण हा विचार करायची "सदसदविवेकबुद्धी" च विसरून जातो काय?

मध्यंतरी आवाज वाढीव डीजे नावाचे एक गाणे आले होते. तो डीजेचा आवाज वाढवायला काहीच हरकत नाही. फक्त, वेळ काळ योग्य असली पाहिजे इतकेच. ती योग्य वेळ ,जागा कळायचे भान आपल्या सर्वांना मिळो हीच गणारायचरणी प्रार्थना.

गणपती बाप्पा मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com