हिरवा निसर्ग हा संगतीने... 

प्रेषिता चपळगावकर
Thursday, 27 September 2018

निसर्ग संवर्धन आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्‍लबने ऑगस्ट महिन्यात रायरेश्वर, केंजळगड ट्रेक, भ्रमंती आयोजिली होती. सोलापूरसह पंढरपूर, पुणे, बीड येथील विविध क्षेत्रातील मंडळींनी ट्रेकमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. ट्रेकमध्ये सहभागी प्रेषिता चपळगावकर यांनी ईसकाळसाठी लिहिलेले अनुभव कथन... 

15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी आमची गाडी पोचली. किर्रर्र अंधार, उजवीकडे खोल दरी, निमुळती अनोळखी चिखलमय वाट, धो-धो पावसात विजेरीच्या उजेडात एकमेकांना आधार देत-घेत गड सर केला. गडावर पेवर ब्लॉकचा रस्ता तयार केलेला असल्याने चालणे बरेच सुखकर झाले. गडावरील गावकरी गोपाळराव जंगम स्वागतासाठी आले होते. त्यांच्या घरी गरमागरम पिठलं, नाचणीची भाकरी, ठेचा, पापड, वरण-भात आणि त्यांनी स्वत: बनवलेला लुसलुशीत स्पेशल शिरा खाऊन सारेजण तृप्त झाले. रात्रभर पावसाची रिपरिप चालू होती.

16 ऑगस्टच्या सकाळी गरमागरम कांदे-पोहे खाऊन आम्ही सर्वजण रायरेश्‍वर गडावरील टेकडीकडे निघालो. त्या ठिकाणी विविध रंगी माती पाहायला मिळाली. नजर जाईल तिथपर्यंत नाजूक रंगीबेरंगी फुललेली फुले हिरव्या पोपटी शालीवर वेलबुटीच्या नक्षीसारखी भासत होती. काही वेळा धुक्‍याचा गर्द पडदा आला की सहा फुटांच्या पुढील काहीच दिसेनासे व्हायचे. आम्ही पूर्णपणे ढगातून चालत होतो. त्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतले. ट्रेकचे आयोजक, इको फ्रेंडली क्‍लबचे कार्याध्यक्ष भाऊराव भोसले यांनी निसर्गभ्रमंतीविषयी प्रास्ताविक केले. 17 व्या शतकात स्वराज्य स्थापनेची ज्या ठिकाणी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या पवित्र वास्तूत 21 व्या शतकातील आम्हा मावळ्यांना इको फ्रेंडली क्‍लबने निसर्ग संवर्धनाची रायरेश्वराच्या साक्षीने शपथ दिली. 

दुपारच्या जेवणानंतर रायरेश्‍वरावरून आम्ही खाली आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. च्या घोषणा देत केंजळगडाच्या चढाईला सुरवात झाली. सव्वाचार हजार फूट उंचीवर महादेव डोंगररांगेतील हा उत्तुंग गड. एका भल्या मोठ्या पहाडाला कोणीतरी टोपी घातल्यासारखा आकार. गडावर जाताना अवघड अशा एकूण 55 पायऱ्या खडकात कोरून काढलेल्या आहेत. तेथील गुहेत क्षणभर विसावलो. इथून आजूबाजूस पाहिले असता अमोघ सौंदर्याने नटलेला सारा परिसर दिसतो. गडावर गेल्यानंतर छप्पर नसलेलं केंजाई देवीचं दर्शन घडतं. जवळच जुन्या काळातील चुना भट्टी लक्ष वेधून घेते. भग्नावस्थेत असणारे दगडी बांधकामाचे अवशेष विखुरलेले दिसतात. बाकी इतरवेळी दिसणारे ओसाड डोंगराचे माळरान हिरव्या पोपटी गवताने झाकले गेले होते. गड उतरून भोर घाटाकडे जाताना वाटेत झुलता पूल पहिला. पूर्वी हा खूप झुलायचा. पण आता तो मजबूत केला आहे. येथेही वेगाने खळाळतं पाणी पाहायला मिळालं. पश्‍चिममुखी असलेल्या मंदिरात रायरेश्वराचे धाकटे बंधू नागेश्‍वरांचे दर्शन घेतलं. या ठिकाणी एका वृक्षाखाली एका दगडावर चित्ररूपी कथा होती. विजय जाधव यांनी ती वाचून दाखवली. शिलालेख हा लिपीत कोरला जातो तर वीरगळ हे चित्ररुपात असते अशी नवी माहिती त्यांचेकडून मिळाली. सायंकाळी भोर येथे महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांच्या घरी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.

रात्री निगुडघर ता. भोर जि.पुणे येथील प्रसन्न आलाटे यांच्याकडे मुक्काम होता. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आमच्या स्वागतासाठी उभं असणारं गुलमोहराच झाड रात्री अडीचच्या सुमारास मुळासकट आडवं झालं. 17 ऑगस्टच्या सकाळी हिरडोशी गावचे अनुभव आणि कवितांसोबत मंगलताई आलाटे यांनी स्वहस्ते केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीचा नाश्‍ता केला. नीरा-देवघर धरण शंभर टक्के भरल्याने पाणी भरपूर सोडलेलं होतं. नदी दुथडीभरून वाहत होती. पुलावरून तिचं काठोकाठ भरलेलं रूप पाहून आम्ही भोरकडून महाडकडे जाणाऱ्या वरंधा घाटाकडे निघालो. पाऊसवेड्यांनी, धुवॉंधार पावसात-धबधब्याखाली चिंब भिजत, हिरव्या बरव्या श्रावण ऋतूत भटकंती चालू होती. चहूअंगानी कोसळणाऱ्या धबधब्यांना आम्ही रंगानुसार नावे ठेवली. चहाचा, दुधाचा, कॉफीचा चिक्कू ज्युसचा. दुष्काळी भागातले आम्ही धबधब्यांखाली मनसोक्त भिजत होतो. दुतर्फा वाहणाऱ्या छोट्या-मोठ्या असंख्य धबधब्यांनी एखाद्या जर्जर वृद्धेचे अल्लड तरुणीत रूपांतर व्हावे असा या घाटरस्त्याच्या परिसराचा कायापालट केला होता. डोळ्यांनी पोटभर निसर्ग पिण्याची मेजवानी अनुभवली. घड्याळ आपलं काम चोखपणे करत होतं. त्याने परतण्याची जाणीव करून दिली. निसर्ग सानिध्यात पुन्हा येण्याचे मनोमन आश्वासन देत आम्ही सोलापूरकडे निघालो. निसर्ग संवर्धन आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्‍लबने या भ्रमंतीचे नेहमीप्रमाणेच उत्तम नियोजन केले होते. इको फ्रेंडली क्‍लबसोबत वारंवार अशीच सुरेल प्रवासाची संधी मिळत राहो अशी अपेक्षा करीत साऱ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले. आता आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत खास महिलांसाठी इको फ्रेंडली क्लबने आयोजिलेल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर मोहिमेची उत्सुकता लागली आहे.
 

इतर ब्लॉग्स