लाल शेऱ्याच्या धाकाने नराधमाने चिरडल्या कळ्या

Arvind-Pawar
Arvind-Pawar

शिराळा संदेश साप्ताहिकाचा तत्कालीन संपादक, शिवसेनेचा तालुकाध्यक्ष, यातूनच १९९५ मध्ये युती शासनाच्या काळात आश्रमशाळेचा संस्थापक झालेल्या अरविंद पवार या नराधमाने कोवळ्या जीवांची केलेली होळी सुन्न करणारी. हे करताना त्याला मदत करणारी स्वयंपाकीण किंवा डोळेझाक करीत विश्‍वामित्री पवित्रा घेणारे शिक्षक समाजातील बोटचेप्या प्रवृत्तीचे प्रतिनिधी. आश्रमशाळेतील बालिकांना त्याने लाल शेऱ्याची भीती दाखवून त्‍यांचे शोषण केले. या विकृतीला ठेचून काढणे, हे पोलिस यंत्रणेसमोरील आव्हान असेल. 

समाजातील वंचितांसाठीच्या आश्रमशाळा नेमक्‍या कोणासाठी? शासनदरबारी एखादी आश्रमशाळा मिळवायची म्हणजे एखादे दारू दुकानाचे लायसन मिळवण्यासारखे झाले आहे. तसाच बाजार मंत्रालय स्तरावर चालतो. त्यासाठी शिक्षणाचा गंध नसलेली अरविंद पवारसारखी बांडगुळे लागतात. त्यांच्यासाठी तिथे पायघड्या घातल्या जातात; मग नोकरभरती, प्रतिविद्यार्थी अनुदान, पगारातून संस्थाचालकांसाठी कपात अशी कायम मिळकतीची कुरणे तयार होतात. अशा भरमसाट पैशातून आलेल्या मस्तीतूनच मग वासनांधता बळावत जाते.

कारण आपण करू ते पचवू शकतो, ही मुजोरी केवळ अशा वारेमाप पैशांतून येते. कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक म्हणून पवार मिरवत होता. प्रतिष्ठित म्हणून त्याला पायघड्याही घातल्या जात होत्या. त्यातूनच अशी दुष्कृत्ये त्याच्यासाठी डाव्या हाताचा खेळ झाली. प्रत्येकाला मॅनेज करता येते. फक्त किंमत वेगवेगळी असते या सूत्राने ही मंडळी मोकाट होतात. आजच्या शैक्षणिक क्षेत्राची ही काळी बाजू कुरळप प्रकरणाने पुढे आली आहे.

कोण हा पवार? सर्वसामान्य घरातून आलेला आणि बघता बघता गब्बर झालेला. गेल्या वीस वर्षांतील ही त्याची वाटचाल पाहून, शिक्षण क्षेत्रापुढे काय वाढून ठेवले आहे, हे आता लक्षात येईल. आश्रमशाळेचा त्याने एखाद्या संस्थानाप्रमाणे उपयोग करून घेतला. शाळेतील शिपाई त्याचे घरगडीच. त्याच्या शेतातील झाडे तोडायला जाऊन एका शिपायाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी काय झाली हे आजतागायत पुढे आले नाही. शाळेतील एका नववीत शिकणाऱ्या मुलाने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून आत्महत्येसाठी टाकलेल्या उडीचेही तेच झाले. गणेशोत्सवात ट्रॅक्‍टरखाली सापडून मृत झालेल्या मुलाबाबतही पोलिस-चौकशी पुढे गेली नाही. ही काही उघड झालेली प्रकरणे. उघड न झालेली किती असतील? या प्रकरणांतही त्याने महिला पोलिस उपनिरीक्षकास पैशाचे आमिष दाखवले. सुदैवाने हे प्रकरण पोलिसांनी उघड केले आणि अनेक कोवळ्या जीवांची उध्द्‌वस्त होणारी आयुष्ये वाचली.

नराधम पवार याच्या कृत्याबाबत गावात दबक्‍या आवाजात चर्चा होत असे; मग शाळेतील अन्य शिक्षकांनी का मूग गिळले? शिक्षक एखाद्या घरगड्याप्रमाणे त्याच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर ते शिक्षक कसले? पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार असलेल्या या नराधमाने शाळेतील काही मुलींना मांगले येथे घरकामासाठी नेले. तेव्हाही त्याच्या अशा नीच कृत्याचा कुटुंबीयांना संशय कसा आला नाही? समाज म्हणून आपण कोठे कमी पडत आहोत, याचेही सर्वांनी आत्मपरीक्षण करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com