भावना दुखवल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय?

भावना दुखवल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय?

कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला आहे.

पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनांनसारखंही असतं... हे त्यांचं वाक्य वाचून अनेक आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्यावरून मनवर यांना शिवीगाळ करणे, ट्रोल करणे, धमक्या देणे, मारून टाकण्याची भाषा करणे ते अगदी तुमच्या आई - बहिणींच्या स्तनांवर लिहा...असं बोलणं सुरू झालं. ज्यांच्या भावना या कवितेचा, त्यातील उपमेचा नीट अर्थ समजून घेण्याआधीच दुखावल्या, त्यांनी हा सगळा गदारोळ इतक्या मोठ्या प्रमाणात केला, की शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध झुंडशाहीच्या या लढ्यात मुंबई विद्यापीठाने झुंडशाहीच्या बाजूने कौल देत कविताच अभ्यासक्रमातुन वगळली. 29 सप्टेंबर 2018 रोजी विद्यापीठाने तसे परिपत्रक प्रसिद्ध केले.

ज्या विद्यार्थ्यांना ही कविता म्हणजे आदिवासी स्त्रीचा अपमान, अनावश्यक लैंगिक संदर्भ असे वाटून त्यांच्या भावना दुखावल्या, त्या विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद करणं, लेखक मनवर यांच्याशी संवाद करणं, काही मान्यवर साहित्यिक, समाजशास्त्राचे अभ्यासक, तसेच यातील कायदेशीर बाबी आदींवर चर्चा करण्याआधीच रातोरात विद्यापीठाने ही कविता अभ्यासक्रमातून वगळली. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सॉक्रेटिस, तुकारामापासूनचा पुरातन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कवी, साहित्यिकांसोबतचे मतभेद नोंदवणे, त्यांच्यासोबत वैचारिक वाद करणे, असहमती दर्शवणे, निषेध करणे हे मार्ग उपलब्ध असतानाही ज्या वाईट प्रकारे मनवर यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झुंडशाहीने केला, तो प्रकार महाराष्ट्राच्या वैचारिक वाद परंपरेला लाज आणणारा आहे. कविता आवडली नाही, वाईट आहे यापेक्षाही आमच्या आदिवासी स्त्रियांच्या स्तनांवर का लिहिता, तुमच्या जाती - जमातीच्या स्त्रियांच्या लैंगिकतेवर, अवयवांवर लिहा. अशी भाषा मनवरांसाठी वापरली गेली. यातून विरोध करणाऱ्यांना दुसऱ्या बाईच्या लैंगिकतेवर लिहिलं, चुकून त्यातून तिचा अवमान झाला तर त्याबद्दल कदर नाही. स्त्रीचा अपमान होतानाही आम्ही केवळ आमच्याच जातीच्या स्त्रीसाठी काही करू, असा संकुचित विचार दिसतो. मनवर यांच्या कवितेतून तर असा कोणताही अवमान झाला नाही, काहीही अश्लीलता त्यात नाही, ती केवळ एक सुंदर उपमा आहे, ज्यात बाईच्या अवयवाचा अर्थ लैंगिकतेपलीकडेही असू शकतो. बाईचे अवयव किंवा स्त्री - पुरुष कुणाच्याही अवयवाकडे लैंगिकतेपलीकडे पाहता येते, हेच उलट या उपमेवरून दिसून येते, असं महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांचे, प्रकाशकांचे म्हणणे आहे. शब्द पब्लिकेशनचे प्रकाशक येशू पाटील, कवी व प्राध्यापक सुदाम राठोड, प्रा. संतोष पद्माकर पवार, प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर, कथाकार सतीश तांबे, कवयित्री व अभिनेत्री रेश्मा रामचंद्र अशा अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली व ते मनवर यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. 

मनवर हे अशा वादात अडकवले गेलेले, व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची घुसमट केलेले पहिले साहित्यिक नव्हेत. संत तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत फेकून देण्यापासून ते आनंद यादवांची कांदबरी प्रतिबंधित करण्यापर्यंत ही परंपरा आहे. वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवरही खटला भरला गेला. अलीकडेच मल्याळी लेखक एस. सतीश यांच्या मिश्या या कादंबरीवरही खटला भरण्यात आला होता व या कादंबरीवर बंदी आणण्याची मागणी केली होती. याचं कारण कादंबरीमध्ये केलेल्या दलितांच्या वर्णनामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. खरं तर दलितांची स्थिती किती दारुण आहे, हे दाखवण्यासाठी लेखकाने जे वर्णन केलं, तो उद्देशही लक्षात न घेता अनेकांच्या भावना दुखावून उद्रेक झाला. मात्र सप्टेंबर महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात न्यायालयाने कादंबरी प्रतिबंधित करता येणार नाही असे सांगितले आहे. 

दुसरं उदाहरण हांसदा सौवेंद्र शेखर या आदिवासी लेखकाचं. शेखरने मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आदिवासी विल नॉट डान्स या कथासंग्रहात, कथांमध्ये संथाल या आदिवासी जमातीच्या स्त्रियांच्या वेश्याव्यसायाबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या. विशेषतः पतित पावन संघटनेशी संबंधीत संथाळी आदिवासींच्या. त्यांनी कथासंग्रह बॅन करण्याची मागणी केली. झारखंड सरकारने तो एक वर्षासाठी बॅनही केला. सरकारी नोकरीतून शेखरला काढून टाकलं. जगभरातून झारखंड सरकारवर टीका झाली, न्यायालयाने शेखरच्या बाजूने निकाल दिला आणि काही महिन्यांपूर्वीच या कथासंग्रहावरची बंदी झारखंड सरकारने मागे घेतली आणि त्यांना नोकरीवर पुन्हा रुजू करुन घेतले. 

शेखरच्या कथासंग्रहात त्याने संथाळी बायका वेश्या व्यवसाय करतात, यावर कथा लिहिली आहे. हा सबंध संथाळी बायकांचा अपमान आहे, असं लोकांचं म्हणणं पडलं. आणि भावना दुखावल्या. खरं तर हा संपूर्ण कथासंग्रह वाचला तर लक्षात येतं की संथाळी बायकांच्या वेश्याव्यवसायाबद्दल लिहिताना शेखरने या बायकांची भुकेकंगाल परिस्थिती आपल्यासमोर ठेवली आहे. पाच रुपयांसाठीही या महिलांना आपला देह विकावा लागतो, आदिवासी भागात खनिजांसाठी खाणकामाचे विविध प्रकल्प वाढत असताना आदिवासींचं होणारं विस्थापन, खालावलेली परिस्थिती या सगळ्याची दाहकता वाचकांपुढे मांडण्याता लेखकाचा उद्देश आहे, असं जाणवतं. वीतभर पोटासाठी महिलेला दिवसभर देहविक्री करावी लागणं, हे चित्र किती भयंकर आहे हेच त्याच्या कथेतून आपल्यासमोर उभं राहतं. शिवाय तिथल्या सद्य राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीची दाहकता समजते. मात्र, हे सारे समजून न घेता, केवळ भावना दुखावल्या म्हणून पुस्तकांवर, कलाकृतींवर बंदी आणणं, लेखकाला लोकांनी आई - बहिणीवरुन शिव्या देणं, मारुन टाकण्याच्या धमक्या देणं, हे सारं समाज म्हणून आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, याचा विचार व्हायला हवा.

दिनकर मनवर यांच्या सध्या वादग्रस्त ठरलेल्या पाणी कसं असतं? या कवितेच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी आहे. त्यातला एक महत्वाचा मुद्दा लेखकाचं लेखन विविध कॉन्टेक्स्टमध्ये समजून घेण्याचा आहे. तसेच या निमित्ताने साहित्य शिकवणारे प्राध्यापक चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना कसे घडवतात, चिकित्सक दृष्टीकोन त्यांच्यामध्ये निर्माण करतात का? हेही प्रश्न महत्वाचे आहेत. केवळ स्तनाची उपमा दिली म्हणून तो स्त्री चा अपमान होतो का?, अवयवांकडे केवळ लैंगिक दृष्टीकोनातूनच पाहायचं का?, लैंगिकतेला सरसकट वाईट अपवित्र ठरवून मोकळ व्हायचा का?, एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातही आपण बाईच्या अवयवांना केवळ लैंगिकतेशीच का जोडू पाहतो?, खजुराहोसारखी हजारो वर्ष पुरातन शिल्प असलेल्या आपल्या देशात नग्नतेकडे सौंदर्यदृष्टीने पाहता येणे का शक्य होत नाही?, लेखक - कवी, पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आजही का जीव गमावावा लागतो? असे अनेक प्रश्न या घटनेने समोर उभे केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी परस्पर संवाद आणि सामंजस्य निर्माण झालं तरच ठीक, अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणखी बळी जातील, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com