स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आम्ही उपरेच...

Katkari
Katkari

देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका करणारा आणि सर्वच प्रकारच्या विकासापासून दूर फेकला गेलेला, प्रवाहापासून दुरावलेल्या अनेक समाजांपैकी एक म्हणजे कातकरी समाज. 

व्हिडिओ पहा- https://www.youtube.com/watch?v=69qQ_gcZmO0

'Tata Institute of Social Sciences' (TISS) या संस्थेने 2014 मध्ये एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात ठाणे व रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नाचा शोध घेतला गेला. त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण कातकरी समाजापैकी पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजाची लोकसंख्या 5.09 इतकी आहे. तसेच 1991च्या जनगणनेनुसार महारष्ट्रातील कातकरी समाजाची लोकसंख्या 2 लाख 18 हजार 253 इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कातकरी वस्त्या आढळतात. अशाच सह्याद्रीच्या रांगेत वसलेले नसरापूर हे गाव. पुणे-बंगळूर महामार्गावरील हे गाव पुण्यापासून केवळ 40 किमी अंतरावर आहे. या नसरापूर फाट्यावर (चेलडी) महामार्गाला लागूनचे 35 ते 40 कुटूंबाचीं कातकरी समाजाची वस्ती आहे. महामार्गामुळे या परिसराचा चांगला विकास झाला आहे. पण हा विकास महामार्गापासून केवळ 100 मीटर अंतरावर राहणाऱ्या कातकरी वस्तीपर्यंत पोहचू शकला नाही. कातकरी समाज असाच मागास, दारिद्र्यात राहिला. या जागेवर 1962 सालापासून झोपडीत राहणारा कातकरी आजूनही झोपडीतच आहे. मागील सहा दशकांमध्ये या भागाचे होत्याचे नव्हते झाले पण हा समाज आजही घाणीच्या साम्राज्यातच राहिला. 

घराचे प्रश्न?

1962 पासून राहणारा या समाजाकडे आजही स्वतःची एक गुंठाभर देखील जागा नाही. स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांना मतदानाची ओळखपत्रे मात्र, आवर्जून काढून दिली आहेत. बाकीच्या कादपत्रांची अजून सोय नाही. जागा नसल्यामुळे झोपडीत राहण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही. झोपड्यांच्या आवतीभवतीचे वातावरण पाहून किळस वाटेल अशी परिस्थिती. पाला-पाचोळ्यांनी बांधलेली ही झोपडी पावसाळ्यात गळते,  जमिनीवर सतत ओल असते, त्यामुळे मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांनाही ओलाव्यात झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही परिस्थिती केवळ नसरापूर येथील कातकरी वस्तीची नसून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कातकरी वस्त्यांवर अशीच परिस्थिती आहे. पाच पिढ्या ज्या जागेवर गेल्या ती जागा अजूनही आमच्या नावावर होत नसल्याची खंत येथील दगडू हिलम यांनी बोलूनही दाखवली. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न वस्त्र, निवारा यातील स्वतःचा निवाराच नसल्यामुळे स्थिर होता येत नाही. 

घराच्या भोवती असणाऱ्या अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना या लोकांना सामोरे जावे लागते. कुष्ठरोग, कर्करोग, कुपोषण, ताप, हिवताप, पोटाचे विकार यांचे प्रमाण जास्त असते. कातकरी समाजाच्या आरोग्यासंदर्भात एम.पी. ननल अशासकीय संस्थेकडून आरोग्य चाचणी घेण्यात आली होती. त्यात त्यांनी कर्जत मधील रामवाडी, कातकरीवाडी, जांभूळवाडी तर इंदिरा नगर, पुणे येथील 150 लोकांचे आरोग्याविषयक नमूना चाचणी घेतली गेली. यात त्यांना 138 लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने आरोग्याच्या समस्येने ग्रासलेले आढळून आले. तसेच 2014 मध्ये टीस (TISS)ने केलेल्या सर्वेक्षणात 56 टक्के कातकरी पाड्यांमध्ये 31.5 टक्के लोकांना कावीळ हा आजार असल्याचे आढळून आले आहे. हा आजार मुळात पाण्याच्या अस्वच्छतेमुळे होतो. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत 11 जणांची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालातून असे निदर्शनास आले की, देशभरातील आदिवासी जमातींमध्ये दर चार माणसांमागे एका व्यक्तीला उच्च रक्तदाब असतो. रक्तस्त्रावाने होणाऱ्या 57 टक्के आणि हृदयविकाराने होणाऱ्या 24 टक्के मृत्यूंच्या मागे उच्च रक्तदाबच असतो. 

जगण्याचे साधन 

या लोकांकडे मुळात शेती नसते. त्यामुळे शिकारीला जाणे, खेकडे व मासे पकडणे, भात लावणीला जाणे, वीटभट्टीवर जाणे आणि गरज पडल्यास इतर कोणतीही कामे करणे. या कामातून मिळणारी मजुरी ही तुटपुंजीच असते. त्यामुळे यांना गरजेच्या वस्तू ही घेता येत नाही आणि जर काम देणारा मालक ठग भेटला तर मजूरीलाही मुकावे लागते. 2004 मध्ये रॉबिन त्रिभुवन यांनी आदिम जमातीचे आरोग्य हे पुस्तक लिहिले होते. त्यावेळी त्यांनी कातकरी समाजाच्या जगण्याच्या साधनांबद्दल सांगताना वरील प्रमाणेच म्हंटले होते. पण आज 14 वर्षा होऊन देखील यामध्ये तिळमात्रही बदल झाले नाहीत.

समाजव्यवस्थेकडून मिळणारी वागणूक

अनुसूचित जमाती प्रवर्गात येणाऱ्या या लोकांकडे इतर समाजातील लोकांकडून दुय्यम वागणूक मिळते. उपजिवकेचे दुसरे साधन नसल्यामुळे नदी, ओढ्याच्या काठाने फिरून खेकडे, मासे पकडणे व ते बाजारात विकाणे आणि त्याच्यावरच जगणे, यावरच त्यांचा गुजारा चालतो. इंग्रजांच्या काळात या शेकडो जमातींवर चोर-दरोडेखोर असे शिक्के मारण्यात आले होते. त्याला कातकरीसुद्धा अपवाद नव्हता. परंतु, स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या समाजाकडे अनेकदा चोर म्हणूनच पाहिजे जाते. दुसऱ्याच्या शेता-भातात गेल्यावर चोऱ्या-माऱ्यांचा आरोप करून अनेकदा या लोकांना मारहाण झाल्याच्याही घटना घडत असतात. असे काही घडल्यास दाद कोणाकडे मागायची असाही प्रश्न यांच्यापुढे असतो. त्यामुळे आपली चूक असो नसो आपणच दोषी म्हणून सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नदी, ओढा, भाताच्या खाचरांमधून फिरणारी ही लोक खेकडे, मासे पकडतात. त्यामुळे यांच्या अंगाचा घाण वास यतो. हे लोक घाणेरडे असतात. म्हणूनही यांना कोणी जवळ करत नाही. परंतु, याच लोकांडून खेकडे, मासे विकत घेऊन त्यावर ताव मारणाऱ्यांची काही कमी नाही. 2014 च्या टीसच्या अहवालानुसार 30 ऑगस्ट 2013 रोजी भिवंडी, नवी मुंबई जवळ एका कातकरी समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. सवर्ण जातीच्या लोकांनी तिच्या अंगावरील कपडे फाडून गावकऱ्यांसमोरच तिचा अपमान करण्यात आला होता. सवर्ण समाजातील एका मुलाबरोबर या मुलीचे प्रेमसंबंध होते. तो पूर्ण दिवशी त्या मुलीला विवस्त्र अवस्थेत घरात कोंडून ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशी या समाजाची व्यथा आहे.

शिक्षणाची समस्या

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील शिक्षणाचा प्रकाश यांच्या झोपड्यांपर्यंत पोहचू शकला नाही. हा समाज शिक्षणापासून आजही वंचित आहे. फारतर प्राथमिक शिक्षणाच्या पुढे येथील कोणतीही व्यक्ती शिक्षण घेताना दिसत नाही. माध्यमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेणारी व्यक्ती शोधावी लागते अशी या समाजाच्या शिक्षणाची अवस्था आहे. याला समाजाच्या मानसिकते सोबतच आपली शिक्षणव्यवस्थाही कारणीभूत आहे. नसरापूर येथील कातकरी वस्तीवर किमान 20 ते 25 लहान मुले आहेत. परंतु, अंगणवाडी सुरू करण्यासाठी सरकारची जागा, सरकारी खोली लागते. इथे या लोकांना रहायला गुंठाभर जमीन नाही तिथे सरकार अंगणवाडीसाठी खोली कधी बांधून देणार. अशा परिस्थितीत अंगणवाडीही सुरू होऊ शकली नाही. त्यांच्या झोपड्यांपासून शाळा दोन-तीन किमी. आणि सहा पदरी महामार्ग असल्यामुळे मुले तो ओलांडून जाऊ शकत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे त्यांचे शिक्षण खोळंबले आहे. आमच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनीच एक कोप बांधली होती, पण ही कोपीची शाळा वाऱ्याने उडून गेली. त्यामुळे शिक्षक ही येण्यास बंद झाले. या लोकांचा हातावरचे पोट आणि पालकांमध्येच शिक्षणाविषयीची जागृती नसल्यामुळे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात.  2000 साली Tribal Research & Training Institute, Pune यांच्याकडून आदिम आदिवासी जमातीचा (PVTG) विस्तारीत अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार 1981 मध्ये कातकरी समाजाचा साक्षतेचे प्रमाण 4.37 टक्के होते. तसेच 2014 मध्ये टीसने केलेल्या सर्वेक्षण अहवाला नुसार 1997 मध्ये 16 टक्के तर 2009 मध्ये 21 टक्के अशी नोंद होती. यात प्रत्येक पाच पुरुषा मागे एक स्त्री शिकत होती. त्याचप्रमाणे 70 वस्त्यांचे केलेल्या सर्वेक्षणानुसार 59 टक्के मुले हे दहावीच्या पुढील शिक्षण घेत नाहीत.

एकीकडे आपण डिजिटल इंडिया, मेकईन इंडिया आणि विकासाच्या मोठ-मोठ्या गप्पा मारतो. पण दुसरी हा समाज आजही मूलभूत साधनासाठी झगडतोय. एकीकडे IIT, IIM च्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे प्राथमिक शिक्षण ही मिळत नाही. एकीकडे स्वच्छ भारत, क्लीन इंडिया ग्रीन इंडिया म्हणतो तर दुसरीकडे स्वच्छता हा शब्द ही माहीत नाही. हा विकासाचा विरोधाभास नाही का? असे हजारो प्रश्न मनात निर्माण होतात, परंतु त्याची उत्तरे काही मिळत नाहीत. तीच शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

व्हिडिओ पहा- https://www.youtube.com/watch?v=69qQ_gcZmO0​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com