धार्मिक स्थळांमधील 'पावित्र्यच' महत्वाचे

धार्मिक स्थळांमधील 'पावित्र्यच' महत्वाचे

बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना. धार्मिक पूजा-रीतीरिवाजाचा भाग म्हणून ही पीडीत महिला नदीत अंघोळ करत होती. तिच्यावर बलात्कार होत असताना तिने गयावया केली. आपल्याला आईसारख्या असणाऱ्या गंगा नदीच्या पावित्र्याचा तरी विचार करा...असं ही महिला त्या पुरुषांना विनवत होती. मात्र यातलं काहीही त्यांना ऐकू गेलं नाही. नदीकाठावर असलेल्या इतर लोकांनीही तिला मदत केली नाही. धार्मिक स्थळांचं पावित्र्य टिकवण्यासाठी महिलांवर कपड्यांपासून विविध प्रकारची बंधने घालणाऱ्या धार्मिक लोकांना आपल्या डोळ्यादेखत गंगाकाठावर एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, हे का अपवित्र वाटलं नाही? एकाही धार्मिक संघटनने या घटनेचा साधा निषेध केल्याचं वाचायलाही मिळालं नाही की ऐकिवातही नाही.

मागच्या आठवड्यातलीच आणखी एक घटना. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी 'भारतीय पेहराव' घालून येण्याची सक्ती करण्याचा ठराव देवस्थान समितीने केला. या ठरावानुसार भारतीय कपडे म्हणजेच शर्ट पैंट, साडी, सलवार-कमीज असे पूर्ण कपडे घालूनच भाविकांनी मंदिरात वावरणे नुसते अपेक्षित नाही तर बंधनकारक आहे. स्लीव्हलेस असलेला पूर्ण लांबीचा कुर्ता अथवा इतर कपडे जसं की थ्री-फोर्थ, स्कर्ट घालून यापुढे तुम्हाला अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाही.

या प्रकारावर माध्यमातून, सोशल मीडियातून अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी या ठरावाचा आणि नियमांचा निषेध केला तर हिंदू जनजागृती समितीसारख्या संस्थांनी या ठरावाला नुसता पाठींबाच दिला नाही तर अशा प्रकारचे नियम सर्वच मंदिरांत लागू करण्यात यावे, असेही आवाहन देवस्थान समित्यांना केले आहे. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर देवस्थानने कपड्यांच्या बाबतीत जो नवीन नियम लागू केला आहे, त्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी गावकऱ्यांचे म्हणणे सांगितले आहे. अंबाबाई मंदिर देवस्थान समितीच्या म्हणण्यानुसार मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिकांची ही अपेक्षा आहे, की मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी पूर्ण कपड्यांतच मंदिरात आले पाहिजे.

आता प्रश्न असा आहे की पूर्ण कपड्यांतच मंदिरात जाऊन प्रत्येकाने दर्शन घेण्यामुळे जर मंदिरांचे पावित्र्य जपले जाणार असेल, तर हा नियम केवळ धोतर वा पंचा नेसून पूजा करणाऱ्या पुरोहित, पुजारी यांना लागू होणार आहे का? की त्यांच्या केवळ धोतर, पंचा ओलेत्याचा पावित्र्याला अपवाद आहे? अनेक जणांना काही अडचणींमुळे, आरोग्याच्या तक्रारींमुळे पूर्ण लांबीचे कपडे घालणे शक्य नसते, त्यांचा कशा प्रकारे विचार केला जाईल? 

बरं पूर्ण कपडे घालून मंदिरात लोक गेले, पण त्यांच्या मनातील वाईट साईट विचार कसे घालवता येतील? मंदीर, देवस्थानं, धार्मिक जत्रांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही पुरुष स्त्रियांसोबत गैरवर्तन करतात, कुठेही हात लावणे, अश्लील चाळे, हावभाव करणे असे प्रकार केले जातात. अगदी यंदा गणेशोत्सवात लालबाग राजाच्या आगमन मिरवणुकीसाठी जमलेल्या गर्दीतही काही महिलांसोबत असा प्रकार घडला. हे असे प्रकार घडणे हे अपवित्र नाही काय? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आजवर किती धार्मिक संघटना पुढे आल्या? कोणत्या संघटनेने याबाबत साधा निषेध नोंदवला? 

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील शबरीमाला मंदिरातल्या महिला प्रवेशाबाबत निर्णय दिला. यापुर्वी मासिक पाळीच्या काळात शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नसे. सर्वेच्च न्यायालयाने मात्र हा भेदभाव चुकीचा ठरवला आणि पाळीच्या काळातही महिलांना मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू नये. असे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनरविचार याचिका दाखल केली पाहिजे असा विचार अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मांडला. पाळीच्या काळात महिला मंदिरात गेल्या तर मंदिराचं पावित्र्य कसं टिकणार? हा त्यांचा मुख्य प्रश्न होता. मात्र एखाद्या महिलेवर अत्याचार होत असताना मंदिराचे पावित्र्य भंग होत नाही का? या प्रश्नावर आपण कधी विचार करणार आहोत?

एकंदरितच मंदिरं, धार्मिक स्थळांचं पावित्र्य राखण्यासाठी महिलांवर विविध प्रकारची बंधनं सातत्याने घातली जातात. कपडे कसे घालावे? गाभाऱ्यात जाऊ नये, मारुतीच्या मुर्तीला स्पर्श करु नये, मशिद-दर्ग्यात एका विशिष्ट अंतरापर्यंतच महिलांना प्रवेश ते अगदी पाळीच्या काळात महिलांनी मंदिरात जाऊ नये अशी अनेक प्रकारची ही बंधनं आहेत. ही बंधनं पाळली की मंदिरांचे पावित्र्य टिकते. समता, लिंगभेदभावरहित सारखी वागणूक याचे आम्हाला काही देणेघेणे नाही. एवढे पाळले की बाकी मग महिलांसोबत गैरवर्तन, मारहाण, शिवीगाळ, लैंगिक शोषण, बलात्कार इ. झालं तर त्यात काय एवढं? सगळीकडेच तर हे होतं.. पुन्हा बायका घराबाहेरच का पडतात..त्यांनीच नको का काळजी घ्यायला..मंदिरांच्या रांगेत पुरुषांची गर्दी असेल तर कसं बाईने पदर, ओढणी वगेरे सांभाळून घेतलं पाहिजे. जरा अंग चोरुनच उभं राहिलं पाहिजे. त्यातूनही कुणाचा धक्का लागला किंवा कुणी दिला तर त्यात काय एवढं? देवाच्या दारी इतकं सहन नको का करायला? कुणी रोखून पहात असेल तर सरळ तिकडे दुर्लक्ष करावं.. अशी पुरुषी मानसिकता आपल्याकडे भिनलेली असल्याने असा प्रकार कुणा महिलेसोबत घडला, तर तिला आधार व मदत करण्याऐवजी तिने काय करावं, करु नये, कशी काळजी घ्यावी यावर तिचंच बौद्धिक घेतलं जातं. पोलिसही गुन्हा दाखल करुन घेण्याची तत्परता अनेकदा दाखवत नाहीत.

मागील काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या धार्मिक स्थळांमध्ये महिला व लहान मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. मंदिर, मदरसा, विहार, चर्च सगळीकडचेच प्रकार समोर आले. केरळमधल्या नन्सनी चर्चच्या फादरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. बिहारमध्ये बोधगया इथे विहारांत भिक्खूने लहान मुलांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला. तर पुण्यात मदरशामध्ये दोन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केलं गेलं. ही तर काही मोजकी ठळक उदाहरणं.. दररोज अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचत असतो. आसाराम बापू, बाबा रामरहिम सारखे अनेक अध्यात्मिक गुरु(?) महिला आणि लहान बालकांच्या लैंगिक शोषणाच्या आरोंपाखाली तुरुंगांत आहेत. अनेक धार्मिक आश्रमांत कायमचं रहायला गेलेल्या काही महिला पुन्हा कधीही कुणाला दिसल्या नाहीत, या महिलांचे नातेवाईक त्यांना भेटायला आश्रमांत गेले, तरी नातेवाईकांना महिलांना भेटू दिलं जात नाही, याबाबत अनेक पत्रकारांनी मोठी जोखीम पत्करुन वार्तांकनं केली आहेत..अशा अनेक कहाण्या आपल्याला इंटरनेटवर सर्च केलं तर सहज वाचायला मिळतील. मात्र या साऱ्यामुळे कधी आपलं समाजमन खूप ढवळून गेलंय, धार्मिक संस्थांनी याविरोधात मोर्चे काढलेत असं चित्र दिसत नाही. पावित्र्य टिकवण्याचं ध्येय जपणाऱ्या धार्मिक संस्थांना हा प्रश्न का महत्वाचा वाटत नाही, ते यावर काही भूमिका का घेत नाहीत..हा महत्वाचा मुद्दा आहे. आता नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. दुर्गा, आदिशक्ती म्हणून स्त्रीला देवी म्हणून 9 दिवस फार महत्व दिले जाईल, पुजा केली जाईल. कौतुकाचे सोहळे होतील, कर्तुत्वाच्या गाथा अभिमानाने गायल्या जातील.. हे चांगलेच..पण त्यानंतर पुन्हा महिलांसोबत धार्मिक स्थळी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, लैंगिक शोषण, मारहाण सुरु होईल. यामुळे धार्मिक स्थळांच्या पावित्र्यावर लागत असलेला अदृश्य कलंक पुसून काढण्यासाठी महिलांवर बंधने घालण्यापेक्षा त्यांना सुरक्षित, सन्मानाचा, आरोग्यदायी परिवेश उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. धार्मिक स्थळांनी तर महत्वाची जबाबदारी म्हणून याकडे पाहिलं पाहिजे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com