#MeToo : मानसिक शोषणाचं काय?

MeToo Physical and Mental Harassment at workplace article by Shiwani Khorgade
MeToo Physical and Mental Harassment at workplace article by Shiwani Khorgade

महिलांना आज 21 व्या शतकातही जिथे शिक्षण आणि कायदा दोन्ही गोष्टी दिवसेंदिवस मजबूत बनत चालल्या आहेत, तिथे #MeToo सारख्या चळवळींना उभं करावं लागतंय, हे फारच लज्जास्पद आहे. #MeToo ने आज आपल्या समाजात जोर धरला आहे, याचा फारच बेसिक अर्थ की, चांगुलपणाची शाल पांघरुन कित्येक पुरुष आपल्या विचारांचे नंगत्व लपवत आहेत. मग इथे पुरुषी मानसिकतेला बळी केवळ महिला हा घटकच पडत नाही तर संपूर्ण समाज, समाजातला प्रत्येक घटक, चांगले पुरुषसुध्दा, तरुणाई असे सर्वच बळी पडतात. #MeToo ची जसजशी प्रकरणे समोर येत आहेत तसतसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या घटकांवर होईलच. 'अरे, हे तर सर्वच सारखे' अशी सामान्य समाजाची मानसिकता बनत जाते आणि यातून क्लेष वाढत राहतो. यात पैसा, सत्ता, ताकद या सगळ्या गोष्टी नाहक बदनाम होतात हे ही खरं. ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत ती लोक काय दुसऱ्याची मानसिक, शारीरिक पिळवणूक करत नाही का? ज्या पुरुषांकडे पैसा, ताकद नाही ते पुरुष स्त्रीला उपभोगाची वस्तू समजत नाही का? किंवा आपण याच्या उलट बघुया. ज्या स्त्रियांकडे पैसा, सत्ता नाही त्या सगळ्याच स्त्रिया चांगल्या स्वभावाच्या असतात का? त्यांपैकी कुणीच स्त्री असल्याचा फायदा उचलत नाही का? सांगण्याचं तात्पर्य हे की, #MeToo चे आरोप झालेले सर्वच पुरुष सरसकट दोषी करार देणे योग्य नाही आणि ज्या स्त्रियांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत, त्यांच्यावर आताच का? कायदेशीर मार्ग का अवलंबला नाही? शिक्षण आणि पैसा दोन्ही असताना सोशल मिडीयाची गरज का पडली? हे प्रश्न करुनही उपयोग नाही. कुणी आपल्याकडे जबरदस्तीने 'माझं खरं आहे आणि माझंच ऐका' असं म्हणत येत नाहीये. मिळेल त्या दिशेने आपली मत मांडत आहेत. काही जणींनी कायदेशीर तक्रारही नोंदवली आहे. आता ते योग्य की अयोग्य हे समजून घ्यायला प्रत्येकाची स्वतंत्र बुध्दी आहे. त्यामुळे #MeToo च्या प्रकरणांमध्ये पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांचे धिंदोडे काढताहेत हे पुरे. यात आपण जनता म्हणून खरी बाजू चाचपून तिच्या मागे उभे राहायला हवे.

आता थोडं तिखट... 
मुळात पोटाची खळगी भरण्याचं ज्याला पडलंय ते कोणी यात पडत नसतं. ज्या मुलीला तिचं करिअर करायचंय, पैसा कमवाचाय, घर गाडी घ्यावी, कुटूंबासाठी सुखसोयी द्याव्यात ही स्वप्न आहेत (ज्यात काहीही गैर नाही. मुलींची अशी स्वप्न असतात.) ती मुलगी कामाच्या जागी झालेल्या अत्याचाराबाबत (शारिरीक आणि मानसिक अत्याचार) बोलणं म्हणजे महादिव्यातून जाण्यासारखं आहे. कारण त्या बॉस किंवा सिनिअरची बाहेर असणारी इमेज ही अगदीच सभ्य असू शकते, की ऑफिसमधील इतर लोकांचा ही व्यक्ती असं काही करेन यावर विश्वासच बसणार नाही किंवा एखाद्या समान हुद्द्यावर असलेल्या सहकाऱ्याने जरी गैरवर्तवणुक केली असेल तरी पुन्हा त्याची बाहेर असलेली इमेज, जर तो बॉसच्या चमच्यांपैकी असेल तर... वगैरे अशा अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे तिने बोलणं म्हणजे उपयोगाचंच ठरत नाही. बऱ्याच ठिकाणी धमकी, जिवाला धोका, करिअरमध्ये अडथळे, बदनामी या साऱ्या गोष्टी उभ्या राहतात आणि मुलगी पाऊल मागे घ्यायला लाचार होते. तुझ्याकडे पुरावा काय आहे? हा प्रश्न तर हात टेकवायला लावणाराच ठरतो. ऑफिसमधल्या इतर सहकारी पुरुषांना यातलं काहीच माहित नसतं असंही नाही, पण आधी म्हटलं ना की 'पोटाची खळगी भरण्याचं ज्याला पडलंय ते कोणी यात पडत नसतं.' हे आपल्याकडील सर्वात दुःखद सत्य आहे.

ज्या मुली किंवा बायका ऐन करिअर बनायच्या उंबरठ्यावर असताना बोलतात त्या तर मागेच राहतील आणि ज्या शांत राहतील त्या पुढे जातील... आणि कधीतरी वर्षांनी सोशल मिडीयावर #MeToo चळवळीतून तोंड उघडतील.... नाही का? पण आताचं काय? अशा खूप मुली आणि बायका लैंगिक आणि मानसिक शोषणात आजही आताही अडकल्या आहेत. त्यांना खरं तर न्याय मिळायला पाहिजे. आता सोशल मिडीयावर व्यक्त होणाऱ्यांनी तर हे सहन केलं असेल, पण हे सहन करावं लागूच नये यासाठी काय? का पुढे पाच-दहा वर्षांनी याही मुली आणि बायका त्यांच्यासोबत कधीकाळी झालेल्या गैरवर्तवणुकीबाबत आता सोशल मिडीयावरुन केवळ व्यक्त होणाऱ्यांपैकीच उरतील?

पत्रकारिता... जिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, लोकांना बोलतं करण्यासाठी, अयोग्य विरोधात योग्य असा लढा उभा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं जातं तिथेच अनेक नोंद न झालेली आणि जाणीवपुर्वक नोंद न होऊ दिलेली प्रकरणही आहेत. पुढे येण्याचं धाडस तेवढं करता आलं नाही आमच्यापैकी कुणाला. पुन्हा तेच करिअर, पैसा, इज्जत...वगैरे. आणि एवढ्यात पुढे आलेल्या #MeToo च्या ज्या प्रकरणांमध्ये महिला पत्रकारांनी आरोप केले आहेत. त्यांच्यावरच उलट 'पत्रकारिता क्षेत्रातल्या महिला या भोळ्या नसतात...' अशा वक्तव्यांनी शंका घेतली गेली. जनसामान्यांमध्येही पत्रकारितेतील महिलांबाबत फारसा आदर किंवा त्यांच्याबद्दल चांगल्या भावना असतील असं फार कमी वेळा जाणवलं आहे. पत्रकारीतेतील मुलींकडे एकुणच समाज आणि पत्रकारीतेतीलच पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची खूप गरज आहे, असं वाटतं. मला पत्रकारितेत काम करण्याचा खूप काही अनुभव नसला तरी असं वाटतं आणि आपल्या पत्रकारितेतील करिअरच्या सुरवातीच्याच काळात कोणत्याही महिला पत्रकाराला असं वाटणं म्हणजेही गंभीर आहे.

असो, #MeToo ही चळवळ कामाच्या ठिकाणी फक्त लैंगिक शोषणापुरतीच मर्यादित आहे की कामाच्या ठिकाणी मानसिक शोषणाविरोधातही हा लढा आहे? काही प्रकरणात तुम्ही लैंगिक शोषणाचे पुरावे देऊही शकता. पण मानसिक शोषणाचं काय? 'या व्यक्तीने माझं मानसिक शोषण केलंय' हे सिध्द करेपर्यंत निर्माण झालेली आजूबाजूची परिस्थिती त्या महिलेलाच वेडं ठरवून सोडेन. पुरुषी मानसिकतेचा पगडा असलेले आणि ज्यांचा इगो तळहातावर घेऊन वावरणारे सोज्वळ पुरुषांना हाताखालची बाई म्हणजे सोपे साधन वाटतं. ही काय करु शकते..हिच्या हातात काय आहे..हिचं कोण ऐकणार आहे.. अशी मानसिकता असलेल्या या सत्तेतील पुरुषांचं फावलंय म्हणूनच या क्षेत्रातली फारच क्वचित प्रकरणं बाहेर आली आहेत. अनेक जणींना करिअरमध्ये पुढे जाण्याचं ध्येय असतं. नाव व्हावं, मिळतंय ते अजून विस्तारावं याची अपेक्षा असते. ज्यात काही गैर नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याच आजूबाजूच्या दुसऱ्या एखादीचा बळी जातोय हे लक्षात आलं तरी होतंय ते कसं योग्य असंच मनाला समजावण्याचा प्रयत्न ती करते. चांगल्या, उच्चपदावर गेल्यानंतरही ती या पुरुषी मानसिकतेला थांबवते का? आपल्याला या व्यवस्थेचा फायदा होत आहे ना मग कशाला फिसकटायचं... अशा विचारात चालतंय ते चालत राहिले आहे.

भारतात तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर #MeToo ने जोर धरला. पण तो बहुतांशी सोशल मिडीया आणि त्यावरील अप्पर क्लास महिलांपर्यंतच मर्यादित राहिला. मिडल क्लास महिला ज्या नोकरी करतात, अशा कित्येकींची लैंगिक आणि मानसिक छळ सहन होण्याची कहाणी आहे. या कहाण्या अव्यक्तच आहेत. कुठे बोलणार? कुणाला सांगणार? कोण विश्वास ठेवणार? कोण साथ देणार?... हे प्रश्नही निरुत्तरीतच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com