'किरकोळ' प्रसंगातून वाढतं निर्ढावलेपण

Experience of Pune Police
Experience of Pune Police

मी पुण्यात लॉ ची विद्यार्थीनी आहे. गेल्या आठवड्यात माझ्यासोबत घडलेल्या एका अपघातानं पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दलच्या माझ्या संकल्पनांना धक्का बसला. तो प्रसंग मला इथं मांडायचायः

मी विश्रांतवाडी-विमानतळ रोडवरून माझ्या बाईकवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी धडक दिली. मला काही इजा झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. ट्रॅफिक पोलिसांनी मला तत्काळ मदत केली आणि जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यायला सांगितले. मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे अधिकाऱयांना भेटले. घडलेला प्रसंग सांगितला. 'काही गंभीर झालेले नाहीय ना? अर्धा-एकतास थांबा. मी कुणाला तरी तक्रार घ्यायला पाठवून देतो,' इतकंच त्यांनी उत्तर दिलं. स्टेशनमध्ये त्यावेळी अधिकारी आणि ठाणे अंमलदार दोघेच होते. आधीच्या तक्रारी नोंदवून झाल्यानंतर माझ्या तक्रारीची दखल घेऊ, असं ठाणे अंमलदारांनी सांगितलं. कॉलेजची परीक्षा सुरू असल्यानं मला घाई होती. कॉलेजला जा, नंतर येऊन तक्रार द्या, असं ठाणे अंमलदारांनी सुचवलं. पण, तक्रार नोंदवून घ्यायला ते तयार नव्हते. वाट पाहून कंटाळून मी बाहेर पडले. विषय सोडून दिला. परीक्षांच्या मागे लागले. गाडी माझी मीच दुरूस्त केली. 

गेले आठवडाभर हा विषय डोक्यात घुमतोय. माझ्याबाबतीत घडलेला अपघात पोलिसांच्यादृष्टीनं कदाचित किरकोळ होता; पण माझ्यादृष्टीनं तर तो मोठा होता. ट्रॅफिक पोलिसांनी मदत केल्यानं किमान मी काही मिनिटांत सावरू शकले. पण, नंतर पोलिस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलं गेलं, ते मला अमान्य आहे. कायद्याची विद्यार्थीनी म्हणून आणि एक मुलगी म्हणून या प्रसंगाकडं पाहिल्यानंतर मला वाटतं, पोलिसांनी चुकीच्या गोष्टी करणाऱया, अपघाताला जबाबदार असणाऱया मुलांना सोडून द्यायला मला नकळत भाग पाडलं. अपघाताला सर्वस्वी ती मुलं जबाबदार होती. 

पुण्यात महिला पोलिस कमिशनर आहेत. अशा परिस्थितीत महिला जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये येतात, तेव्हा त्याची किमान तातडीनं दखल घ्यायला हवी, असं मला वाटतं. किरकोळ घटना म्हणून ज्या मुलांना सोडून द्यायला भाग पाडलं, तिच मुलं उद्या निर्ढावली तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न मला पडलाय. अशा 'किरकोळ' घटनांची दखल घेतली, तरच कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होणार नाही का? पोलिसांचं दुर्लक्ष आणि परीक्षेचा ताण यामुळं मला हा विषय सोडावा लागला; पण गंभीर प्रसंगात अडकलेल्या महिलेलाही अशीच ट्रीटमेंट पोलिसांकडून मिळत असेल आणि तिला आवाज नसेल, तर तिची परिस्थिती काय होत असेल? मुख्य म्हणजे, भर रस्त्यावर अपघात घडवूनही आपल्याला कोण काही करणार नाही, हा संदेश पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मुलांमध्ये जात असेल, तर त्याला जबाबदार कोण...?

(संबंधित लेखिकेने नाव प्रसिद्ध केलेले नाहीः ई सकाळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com