मला नाही का रे स्वतःच आयुष्य

मला नाही का रे स्वतःच आयुष्य

आज सकाळी उठलो अंघोळ केली. चहा/दूध प्यावं म्हणलं तर ताईचा तंबोरा फुगलेला. चहा करायचा तर भांड्यांची आदळ-आपट पाहिली. मी आपला गप्प बसलो. चुलीचा नुसता धूर झालेला. ताई तेव्हढ्यात म्हणाली माझं जीवन म्हंजी नुसतं वल्या लाकडा सारखं झालंय. फक्त धुपत-धुपत लोकांच्या आयुष्यासाठी जगायचं. आई-बाप, नातेवाईक यांच्या फक्त सुखासाठी, नावासाठी, प्रतिष्ठेसाठी झगडायचं. स्वतःच असं जीवन नाहीच जणू मला.

ह्यो पाव्हना आला की म्हणतो की चांगलं स्थळ हे. करून टाका लग्न घर चालून चांगला ठेपा आलाय. त्यो आला पाव्हना की म्हणतोय कुठं आपल्यात पोरींना शिकवतेत. सोळा सतरा वयाची झाली की टाकायची उजून. अठरा वर्षाच्या आत कायद्याने लग्न व्हत नाही. केलं नाही पाहीजे पण माझ्या वर्गातल्या निम्म्या अर्ध्या पोरी अठरा वयाच्या आधीच लग्न करून सासरी गेल्या. काही तर बाळंतपणाला आल्या. काही बाळंतपण सहज होणं शक्य नाही म्हणाला डॉक्टर तर सीझर केलं काहींचं. काही बाळंतपणात मेल्या. आल्यावर भेटत्यात काखेत एखादं लेकरू घेऊन.

लोकांना फक्त सोयीनुसार प्रेम करायला जमतं. असं काही झालं की पळवाटा काढायला मोकळे. मला शिकायचं हे. ह्यांच्या सारख्या पायावर उभा राहायचं हे. पण संघर्ष आहे किती अवघड. घरून निघालं की खाली मुंडकं घालायचं आणि सरळ वर्गात गेल्यावरच वर करायचं. वाटानं जाताना येणारे डायलॉग, टिप्पणी, शिट्टी, शेरेबाजी, घालून-पाडून बोलणं. हे सगळं कान निराळं टाकायचं आणि आपलं शाळात जाऊन बसायचं. कोणाला सांगायची सोय नाही. सांगितलं तर शाळा-कॉलेज बंद व्हायची भीती. त्यात घरच्यांचं असं.

झालंय काय नेमकं ताई?

अरे माझं लग्न जमावणार आहेत. आईला आणि आज्जी ला नको म्हणलं तर आज्जी म्हणाली की माझं लग्न तर तुझ्या पेक्षा लहान असतानाच झालं होतं. आई पण तेच म्हणाली. आई ला म्हणलं शिक म्हणून तर तूच म्हणत होतीस ना? आता काय झालं? आई म्हणाली ज्या त्या वयात लग्न झालेलं ग्वाड दिसतं. आणि पोरींना सांभाळणं अवघड झालं आहे. मग मी पण म्हणली की काय अवघड झालं आहे नेमकं? आई म्हणाली काही काही कानावर पडतं. त्या दिवशी च सुमन आक्का सांगत होती शेजारच्या गावातली कॉलेज जाणारी पोरगी पळून गेली.

पाठीमागे तुझ्या आजुळाला गेले होते तुझ्या तर तुझ्या सारख्या कळत्या-सुरत्या दोन पोरींना रस्त्यांवर अडवून टारगट पोरांनी नको ते केलं. जीवानिशी गेल्या दोन्ही पोरी. काळजी वाटते त्यामुळं करून टाकावं वाटतंय लग्न. परत मी म्हणलं जर असं काही वाटत असेल तर लग्न झालेल्या बायका सुरक्षित आहेत? की लग्न होऊन दहा वीस वर्षे झालेल्या बायका सुरक्षित आहेत? लग्न झालेल्या बायकांना तर मग असला काही त्रास झाला नाही पाहिजे. त्यांच्या पण रोज बातम्या येत्यात. लग्न झालं म्हणजे परत धोका नाही असं काही आहे का? कशाला फालतू कारण सांगून मला बनवा-बनवी करताहेत.

तर मग आई गप्प बसली की आज्जी उचकली. लागली मोठ्याने बोलायला. ही शाळा मुळावर आलीय. घरातल्या शहाण्या च ऐकायचं नाही. जे आपलं हे तेच खरं करायचं. पोरींच्या जातींन एवढं बोलू नाही. मान-मर्यादा काही असतंय का नाही? नुसता शेळी सारखा शेंडा खुडायचा. कलीच लंय उलटा फिरलाय सगळं काही आकरितच कोण कोणाला जुमानायला तयार नाही. अंगाखांद्यावर वाढिलेली शिंगरं आज हमरी तुमरी वर बोलत्यात.

एक तर लग्न कर नाहीतर शेतात काम कर. उद्या पासून शाळा बंद. लागली काडी त्या शाळा ला. तिच्या मूळ तर सगळे आघाव सारखं वागायला लागलेत. एकतर लग्न कर नाहीतर शेतात काम कर. त्या शिवाय तुला पण अक्कल येणार नाही भवाने. कामात कोचलं की सगळं बराबर होतं. मग नाही सुचत शेळी सारखं शेंडा खुडायला.

सांग तूच सोमेश मी काय करू?

कोणाला बोलू?

का इकडं धुपले शिक्षण मिळावं म्हणून तिकडं पण नवरा, मुलं, सासू, सासरे, संसार ह्याच्यातच धुपत राहू? 
मला नाही का रे स्वतःच आयुष्य.
मी आपला गुपचूप बळच दूध घोटत उठलो.

क्रमशः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com