थक्क करणारी, आकलनापलीकडची सांदण दरी !

थक्क करणारी, आकलनापलीकडची सांदण दरी !

सोलापूर : महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे अनेक चमत्कार दडले आहेत. नगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशय परिसरातील साम्रद गावाजवळील सांदण दरी हे असेच एक अनुपम निसर्गशिल्प. पश्‍चिम घाटातल्या या परिसराला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. साहसी निसर्ग पर्यटन करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण बनले आहे.

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर, हरिश्‍चंद्र, रतनगड, अलंग मदन कुलंग, आजोबा पर्वताच्या सान्निध्यात सांदण दरीच्या भिंती उभ्या आहेत. एकमेकांना समांतर वाटणाऱ्या भिंती युगानुयुगे निसर्गाचे बदलते चक्र अनुभवत आहेत. प्रत्येक ऋतूत सांदण दरीचा नजारा वेगळाच असतो. कशी तयार झाली असेल ही दरी? हा आकलनापलीकडील थक्क करून सोडणारा प्रश्‍न साऱ्यांना पडतो. प्राचीन काळी भूकंपाने पठारात भेग पडली आणि वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाणी, धुके यांच्या माऱ्याने दगड ढासळून पडत राहून ही भेग मोठी होत गेली असावी, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. येथे अधूनमधून मोठ-मोठे दगड ढासळतात. गडकोटांचा माहितीपट बनविणाऱ्या रानवाटा ग्रुपने सांदण दरीचा व्हिडिओ प्रदर्शित केल्यानंतर देशभरातून पर्यटकांची संख्या वाढतच आहे. आजवर हजारो पर्यटकांनी सांदण दरीला भेट दिली असून युट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हिडिओही उपलब्ध आहेत.

गेल्या दोन-चार वर्षांपासून विविध ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून सांदण दरीचा ट्रेक प्लान केला जात आहे. आजवर सोलापुरातील शेकडो निसर्गप्रेमींनी सांदण दरीचा अद्‌भुत नजारा अनुभवला आहे. भंडारदरा परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून राहण्याची व्यवस्था आहे. तिथे फोनद्वारे संपर्क करता येईल. खासगी हॉटेलही उपलब्ध आहेत. 

आधी पठार, मग विरळ झाडी, दाट झाडी, चढ-उताराची वाट अशा क्रमाने सांदण दरीचा परिसर आपल्याला थक्क करतो. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी म्हणून सांदण दरी प्रसिद्ध आहे. कधी दगडावर दगड पडून तयार झालेल्या बोगद्यातून पलीकडे जावे लागते तर कधी बसून घसरगुंडीप्रमाणे घसरत. या ठिकाणी प्रत्येक क्षण नव्या धाडसाचा आणि प्रत्येक पाऊल अज्ञात प्रदेशात घेऊन जाणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com