'किरवंत'कार : प्रेमानंद गज्वी

प्रेमानंद गज्वी
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

Article Written by Premanand Gajvee

किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत? 

करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी केली होती. "घोटभर पाणी'सारखंच यश याही एकांकिकेला लाभावं म्हणून मी त्याची तालीम बघण्याच्या निमित्तानं त्याच्या घरी भेटायला गेलो. तर हा पठ्ठ्या आपल्या चाळवजा इमारतीत घराच्या दारात अंगावरचा शर्ट काढून पॅंटवरच बसला होता. त्याला मी येण्याचं कारण सांगितलं तर तो म्हणाला, ""तालमीला वेळच मिळत नाही. स्मशानात जावं लागतं.'' 
""काय करतोस स्मशानात?'' प्रश्‍न. 
तो म्हणाला, ""आत्ताच आलोय स्मशानातून. तशी माझी इच्छा नव्हती; पण आमच्या यजमान यादीतील एका कुटुंबात मृत्यू झाला आणि माणसं बोलवायला आली. ते मला जबरदस्तीनं घेऊन गेले. पुस्तकात बघून मी विधी केला.'' 
""पण करतोस काय स्मशानात?''  ""दोन दिवसांनी या. सगळं सांगतो.'' 

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी गेलो. सोबत मित्र होता. त्यांची एकमेकांना ओळख करून दिली. ""हा सुहास व्यवहारे अन्‌ हा सुधाकर कानडे. हं सांग ते स्मशानात काय करतोस?'' 
तो एकदम म्हणाला, ""कुठं जातो स्मशानात? मी नाही जात स्मशानात'' आणि एकदम गप्प झाला. तो काहीही बोलला नाही. आम्ही त्याचा निरोप घेतला आणि मालाडच्या मित्राला फोन केला. रामकृष्ण गाडगीळ- कुणी स्मशानकर्म करणारा भटजी आहे का, म्हणून विचारलं आणि त्यानं मालाडच्या स्मशानात कार्यरत असलेल्या अशोक जोशींबरोबर भेट घालून दिली. 
""स्मशानकाम मर्तिकाचं काम. ते करणारा ब्राह्मणच असावा लागतो; पण असं असलं, तरी समाजात त्याचं स्थान एकदम खालचं. ब्राह्मणातील "अस्पृश्‍य'च तो.'' 

अशोक जोशी बोलत होते आणि मला आठवत होता, सुहास व्यवहारे. स्मशानकर्मे करणाऱ्या बाह्मणाला अस्पृश्‍य मानलं जात असेल तर कोण स्मशानकर्मी, "स्मशानकर्म करतो' म्हणून सांगेल? आपली जात कळू नये, हा सुहासचा प्रयत्न होता म्हणून सुधाकर कानडेसमोर खोटं बोलला, हे स्पष्ट झालं होतं. 
कोकणात, स्मशानकर्म करणाऱ्याला "किरवंत' म्हटलं जातं. मूळ शब्द क्रियावंत. स्मशानाविषयी-मृत्यूविषयी "गरूड पुराण' या पुस्तकात सांगितलं आहे. उच्चवर्णीय ब्राह्मणांसाठी मंत्राग्नी म्हणजे प्रेत जळून राख होईपर्यंत वेदमंत्र म्हणत राहणं; तर शुद्रांसाठी भडाग्नी, कुठलेही मंत्र न म्हणता आणि ब्राह्मणेतरांसाठी पुराणांतील मंत्र. शाहू महाराजप्रकरणातील वेदोक्त-पुराणोक्त हे प्रकरण समाज जाणतोच. 

"धर्मसिंधू', "निर्णयसिंधू', "रामविजय कथासार', "अत्येंष्टी संस्कार', "संध्या' अशा अनेक पुस्तकांची माहिती अशोक जोशींनी दिली आणि ती देताना आपल्याला स्मशानकर्म करतो म्हणून ब्राह्मणसभेतील सत्यनारायणाच्या महापूजेतून कसं हाकलून दिलं ब्राह्मणांनी, हेही सांगितलं. 

"गज्वी देव नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, पाप नाही, पुण्य नाही आणि हे सगळ्या ब्राह्मणांना नीट माहीत आहे.' 
"तर मग हे सगळं तुम्ही लोकांना सांगत का नाही?' "कसं सांगणार. यामुळंच तर माझं पोट भरतं. मला माझं पोट बघायचं असतं.' 

अशोक जोशींनी खूप माहिती दिली; पण ती खरंच तशी आहे का, हे तपासून-समजून घेणं गरजेचं वाटलं आणि उदय तामशेट्ये व राजू चव्हाण असे तिघं आम्ही सावंतवाडीस गेलो. 
दिवसभर आम्ही सावंतवाडीचा परिसर पालथा घातला, पण एकही स्मशानकर्म करणारा "किरवंत' आम्हाला भेटला नाही. कंटाळून आम्ही मुक्कामावर जायला निघालो, तर रस्त्यात एक वयस्कर गृहस्थ भेटले. आम्ही उगाचंच विचारायचं म्हणून विचारलं; तर त्यांनी माहीत नाही म्हणून सांगितलं आणि म्हणाला, "ते गोकर्णशास्त्री आहेत, त्यांना विचारा. त्यांना असेल माहीत!' 

वाट पुसत आम्ही त्यांच्या घरी पोचलो, तर आधीच एक पुरुष-एक स्त्री त्यांच्याबरोबर गप्पा मारत होते किंवा आपल्या काही समस्या सांगत असावेत. आम्ही येण्याचं कारण सांगितलं तर ते म्हणाले, "आता किरवंत वगैरे असं काही राहिलेलं नाही. यावर कुणी काही लिहिलं नाही. तुम्ही कशाला या फंदात पडता?' 
असं म्हटल्यावर खरं तर संवादच संपला होता. तरी राजूनं विचारलं, "आम्हाला असं कळलं, की चित्तपावन ब्राह्मण हे काम करतात.' 

शास्त्री म्हणाले, "ते चित्तपावन नव्हे... चित्तपावन म्हणजे कोकणस्थ.' 
"ते कोकणातलेच आहेत, अशोक जोशी.' 
"कोकणातले आहेत! क्रियावंत जोशी हे निराळे, जोशी हे निराळे. कोकणातले जोशी निराळे, क्रियावंत जोशी हे निराळे, ते बहुतेक करून सारस्वत समाज असावा. अशी माझी कल्पना आहे.' शास्त्रीजी बोलत होते. 

आम्ही इतरही काहीबाही बोलत राहिलो. "स्मशानकर्म करणाऱ्यांची मुलं अपंग जन्मतात किंवा बाप जिवंत असताना "गरूड पुराण' वाचू नये, वगैरे...' शेवटी कंटाळून त्यांचा निरोप घेतला, तर रस्त्यात एक गृहस्थ भेटले. हे तामशेट्येच्या ओळखीचे निघाले. त्यांनी विचारलं, "इकडे कुठे?' 
आम्ही खरं ते सांगितलं तर त्यांनी काय म्हणावं, "म्हणजे त्या "किरवंतां'कडे?' 

"कशाला या फंदात पडता?' म्हणणारे ते भटजी आणि "नाही जात स्मशानात.' म्हणणारा सुहास, दोघांचीही धडपड एकच होती, "आपण स्मशानकर्मी आहोत.' हे कळू न देणं! 
आम्ही सर्व ग्रंथ खरेदी केले. वाचन, मनन, चिंतन... आणि अशोक जोशींनी दिलेली माहिती सोबतीला होतीच. पण माहिती म्हणजे नाटक नव्हे. आम्ही नाटक लिहिलं, "किरवंत.' दि. 15 ते 23 जून 1981 या काळात. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग झाले. लेखन पुरस्कारांसह नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. हे स्पर्धेतील प्रयोग मर्यादित होते. ते अधिक लोकांपर्यंत जायचं किंवा स्मशानकर्म करणाऱ्या ब्राह्मणांची व्यथा नि वेदना नेमकी कळायची, तर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणं गरजेचं होतं. त्यासाठी नाटकातील लोकेशन्स आणि पात्रांची संख्या कमी करणं गरजेचं होतं. आम्ही ते केलं. अनेक निर्मात्यांना भेटलो; पण स्मशानासंबंधीचं नाटक कोण पाहणार हे सांगून त्यांनी ते रंगमंचावर आणण्यास नकार दिला. पुरोगामी, आधुनिक रंगभूमीसंदर्भात जाहीर बोलणारे दिग्दर्शक तयार होईनात. अखेरीस आशेचा किरण समजून हे नाटक डॉ. श्रीराम लागू यांच्याकडे पाठवलं. 

त्यांचं पत्र आलं. "प्रिय प्रेमानंद, "किरवंत' काल मिळालं. आज वाचलं. दोनदा. विलक्षण आहे. सुन्न झालो आहे. त्यामुळं अधिक लिहित नाही. कोण करणार आहे? केलं तर पाहिजेच. मी करू का?' 

नाटक व्यावसायिक रंगमंचावर आलं. दिग्दर्शन डॉ. लागूंनी केलं. सिद्धेश्‍वर शास्त्राची प्रमुख भूमिकाही. प्रयोग होऊ लागले. लोक नाटक बघू लागले आणि विरोधाचा एक सूर उमटू लागला. 
"ब्राह्मण समाजात असं काही नाही. कुठून शोधला किरवंत. ब्राह्मण समाजाची ही बदनामी आहे.' 

विरोधी मतांना मोडीत काढत प्रयोग होत राहिले. नाटक मराठीच्या सीमा पार करत हिंदी, कन्नड, तेलगू, बंगालीसह इंग्रजी भाषेत पोचलं. छोट्याशा गावाकडून मुंबईत आलेलो मी, पोट भरण्यासाठी आणि पोट भरता भरता कला-साहित्याच्या प्रांतात उभा राहिलो. कसा आलो? कसा घडलो..? त्यासाठी जरा गावाकडं जाऊ... अर्थात फ्लॅशबॅक.. 

फ्लॅशबॅक 

घर सुटलं. म्हणजे सोडावं लागलं होतं. तेव्हा मी 12 वर्षांचा असेन! 

माझा जन्म शाळेच्या दाखल्यानुसार 15 जून 1947 रोजीचा. एकदा आईला म्हणजे वैदर्भीय बोलीभाषेत "मॉं'ला विचारलं की, "जन्म नेमका कधी झाला?' तर ती म्हणाली होती, "दिवाळी नंतर एक महिन्यानं' आणि मी इतका शहाणा की दिवाळीनंतरचा काळ शोधण्यासाठी चोख पंचांगाची पानं चाळली, तर माझ्या मॉंच्या म्हणण्यानुसार जन्मदिनांक आला 15 डिसेंबर1947. म्हणजे स्वातंत्र्यानंतर! 

जन्म पिंपळगावचा. ते आजोळ. आजोबांचे नाव नामा रामटेके. आजीचं नाव सीता. घरी भरपूर भाताची शेती. चंद्रपूर जिल्हा म्हणजे भातशेतीसाठी प्रसिद्ध, तेव्हाही आणि आजही; तर या आजी-आजोबांना सहा लेकरं. तीन मुलं, तीन मुली. माझी आई अंजना थोरली. कारगाव (जि. नागपूर)च्या शंकर गजभियेशी तिचं लग्न झालं. हे गजभिये घराणंही तसं भक्कम तालेवार! अठ्ठावीस एकर जमीन थोडी नव्हे! भात तर पिकायचाच पण मिरची, कापूस, गहू, जोंधळा, तूर, चणा सगळी पिकं घेतली जात. सांगायचा मुद्दा असा की, एका तालेवार आईबापाची लेक एका तालेवार घरात सून म्हणून रूजू झाली. 

मॉंची पहिली दोन मुलं अल्पशा आजारानं गेली. तिसरा मी. तसा किरकोळ शरीरयष्टी असलेला. डोक्‍यात खूप जखमा झालेल्या लहानपणी. कधीही मरून जाईन अशी अवस्था; पण मी जगलो. 
त्याकाळी म्हणजे 1954 साली मुलं सात वर्षांची होत, तेव्हा शाळेत घालत. गावी चवथीपर्यंत शाळा होती. आम्ही चवथी पास झालो आणि मग आमची रवानगी तालुक्‍याच्या शाळेत. न्यू आयडियल हायस्कूल, उमरेड. 

गाव सुटलं... गाव सुटणं म्हणजे काय? हे त्या 12 वर्षांच्या पोराला, म्हणजे मला कुठं काय कळायला? पण आता आठवतं. तहसील रोडवर तहसीलदारांची घरं होती, मोठी रुबाबदार. त्याच लाईनमध्ये प्रचंड मोठं एक घर होतं... वन प्लस वन आणि तिथं गजभिये खानदानीची पाच-सात पोरं... हे सगळे काकालोक तुलाराम, दशरथ, खेमराव. स्वतः हातानं स्वयंपाक करायची, खायची. शाळेत जायची. पण तीन-चार महिन्यांनंतर सगळी शिफ्ट झाली. सुदाम वसतिगृहात. जे सरकारी अनुदानावर चालायचं. 

वसतिगृहात आल्यामुळं गावावरून तांदूळ आणा, पीठ आणा, भाजीपाला आणा, भाजी कापा, भात शिजवा, पीठ मळून पोळ्या लाटा, जेवण झाल्यावर भांडी स्वच्छ करा सगळं थांबलं. होस्टेलचं तयार जेवण मिळू लागलं. हा एक आनंद. 
या होस्टेलवरची एक आठवण. संध्याकाळची वेळ. होस्टेलच्या मागच्या आवारात आम्हा सर्व पोरांना बोलावलं होतं. कुणीतरी एक मोठी, शहरातली व्यक्ती होस्टेलला भेट देणार होती. आम्ही सर्व 20-22 मुलं जमिनीवर बसलो होतो. समोर दोन खुर्च्या होत्या. होस्टेलचे प्रमुख पिल्लेवान त्या व्यक्तीला घेऊन आले. व्यक्ती मस्त गलेलठ्ठ अशी, सावळीशी.

अंगावर पॅंट-कोट. उंचही होती. पिल्लेवान सरांनी त्या व्यक्तीला खुर्चीत बसायला सांगितलं. ती व्यक्ती खुर्चीत बसण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्या व्यक्तीचं शरीर त्या खुर्चीत मावेना. तरी ती व्यक्ती खुर्चीत बसण्याचा प्रयत्न करीत होती. ते बघून मला हसू आवरेना! मला हसताना पाहून त्या व्यक्तीनं मला जवळ बोलावलं. मी काहीसा हसत, 
घाबरत (!) जवळ गेलो. 

"का हसलास?' 
पाचावर धारण बसायला हवी होती; पण तसं काही घडलं नाही. 
मी म्हणालो, "या खुर्चीत बसा.' 
"हुशार आहेस. जा जागेवर' 
झ्या जागेवर जाऊन बसलो. ती व्यक्ती आता मोठ्या खुर्चीत बसली होती. पिल्लेवान सरांनी परिचय करून दिला. काय परिचय करून दिला. आता आठवत नाही; पण मुंबईत आल्यावर कळलं. ती व्यक्ती होती आचार्य अत्रे. या आचार्य अत्रेंच्या नावे दिला जाणारा नाट्यलेखन पुरस्कारही मला मिळाला आहे. पण वयाच्या बाराव्या वर्षी एका मोठ्या नाटककाराची गाठ वरीलप्रमाणे पडली होती, हे आता आठवलं तरी आश्‍चर्य वाटू लागतं.

गाव सुटलं नसतं तर आचार्य अत्रेंशी भेट झाली असती? 
वर्ष होत नाही तोच पुन्हा गावी यावं लागलं. शाळेतून नावही काढावं लागलं. कारण होतं अंगावर कसले तरी डाग उमटले होते. जे पुढं औषधोपचारानं गेले. पण गावी दोन वर्ष उनाडक्‍या करण्यात गेली. शेताच्या बांधावर भटकणं, नदीनाले पार करणं, मासे पकडणं, डोहावर पोहत राहणं, कुणाच्या सांदीतील काकड्या चोरणं... एकदा तर आजोबांच्या बंद पेटीतील शंभर रुपये चोरले. 
आजोबा पैसे ठेवत ती संदुक. तिला भलं मोठं कुलूप. त्या कुलूपाची चावी भिवापूरच्या बाजारातील दुकानातून चोरली होती... कशी? चोरानं आपल्या अंगीभूत "हुनर' इतरांना सांगू नये! काय? 

चोरानं चोरी केल्यानंतर काही दिवस शांत बसायला हवं किंवा आपल्या वर्तनातील बदल कळणार नाही, असं वागायला हवं. पण कसंच काय नि फाटक्‍यात पाय! लिमलेटच्या गोळ्या, खारका, काजूचा फडशा. गावगाडाच तो. सगळे एकमेकांना ओळखणारे. दहा रुपयांची नोट मुलाच्या हाती 1960-61 साली. रुपयासुद्धा शंकास्पद वाटत असे! दुकानदारानं वडिलांच्या कानी घातलं. वडिलांनी जाब विचारला. आम्ही "नाय तं.' म्हणून मोकळे. पण आता शांत बसावं की नाही? पण आम्ही गेलो तालुक्‍याला. दोन सेलचा टॉर्च घेऊन आलो आणि त्या टॉर्चचा प्रकाश सिनेमा रिळाच्या पट्टीवर टाकून ज्याचे पैसे चोरले होते त्या आजोबालाच चित्रसिनेमा दाखवू लागलो. शंका येणार नाही? टॉर्च घ्यायला याच्याकडे पैसे कसे? आणि दरम्यान म्हातारा म्हणू लागला, माझे पैसे चोरीला गेले. 60 रुपये... खरं तर मी चोरले होते शंभर रुपये. म्हणजे आमच्या म्हाताऱ्या आजोबाचं गणीत कच्च होतं की काय? 

आमचा काका दशरथनं आमचे खिशे तपासले. गुप्त जागा शोधल्या पण पैसे काही सापडले नाही आमच्याकडे. 
...आणि एक दिवस आम्ही अंगात बनियन आणि पट्ट्याचा पायजामा घालून शाळेत गेलो. हातात शाळा सोडल्याचा दाखला. शाळेचे दोन शिक्षक शाळेच्या आवारात खुर्च्या टाकून बसलेले. एक शिक्षक दुसऱ्यास म्हणाले, "हे पोरगं वाह्यात आहे. हे कायचं शिकते शाळा?' तर दुसरे शिक्षक म्हणाले, "गावभर उंडरत असते. बसल एका जागी.' 

दोन वर्षांनंतर पुन्हा आम्ही शाळेत जाऊ लागलो. सहावीत प्रवेश मिळाला होता. रेग्युलर शिकणारे आणि आम्ही... आमच्यात भलतंच अंतर. आम्ही शेवटून पहिले. 
आणि शाळेचं गॅदरिंग आलं. आमच्याकडून देवघरे सरांनी सासुरवासीण सुनेचा मोनोलॉग पाठ करून घेतला. 14 वर्षांचं लेकरू झंपर-लुगडं नेसून तयार! आणि "छा गये नं' भाऊ. गावभर सासुरवासीण सून म्हणून प्रसिद्ध आणि मग पुढच्याच वर्षी "उमाजी नाईक' काळोजी. पंधराव्या वर्षी व्हिलन म्हणून उभे राहिलो. (आजही जुनी-जाणती मंडळी त्या अभिनयाची आठवण काढतात.) नाटक आमच्या मनीमानसी असं रुजू लागलं होतं. पण आम्ही एवढंच करत नव्हतो. गावी समाजाची भजनपार्टी होती. तिथं गाणी गात होतो. सिनेमाच्या चालीवरची गाणी आम्हीच रचत होतो. हा वारसा कदाचित आमच्या वडिलांकडून आमच्याकडे आला असावा. वडील गावात दंडार खेळायचे. गाणी रचायचे, गायचे. 

लहानपणीच आमच्या कानावर शब्द येत (आदळत) राहिले ते "बुद्धं सरणं गच्छामि!'चे. बुद्ध- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणीच आमच्या मनाचे राजे होते. ते संस्कार भक्कम आहेत, राहतील. कारण लहानपणी होणारे संस्कार अमीट असतात. 

सातवी पास झालो. आठवी गावी नव्हती. मग पुन्हा उमरेडला... पुन्हा गाव सुटलं... आणि दोन महिन्यांतच पुन्हा गावी. कारण जिल्हा परिषदेनं नव्यानं आठवीचा वर्ग सुरू केला होता. मग पुन्हा गावी. "जाव बे लड्डू आव बे लड्डू!' आई-वडील-भावंड पुन्हा एकत्रित राहू लागलो. आठवी पास झालो नि पुन्हा गाव सोडावं लागलं. नववीसाठी "जीवन विकास' या शाळेत प्रवेश घेतला. पुन्हा घरापासून ताटातूट! 

लहानपणी ही ताटातूट वगैरे जाणवायची नाही. जाणीव विकसित झाली नसेल म्हणून, कदाचित! पण आता होस्टलमध्ये अनेक मित्रमंडळींच्या सहवासात असताना जाणवायचं आपण एकटं आहोत. आपल्याला वडिलांची-आईची आठवण येते आणि मग आपणच आपलं सांत्वन करायचं... वडील यायचे सोमवारच्या आठवडी बाजाराला! मग व्हायची भेट-वडिलांशी! 

नववीत असताना शाळेच्या गॅदरिंगमध्ये पुन्हा नाटक, "जे का रंजले गांजले'त सरांनी काम कर म्हटलं; केलं. नाटक सतत अंगी मुरत राहिलं. म्हणजे माझ्या मेंदूची नाट्यजमीन सतत नांगरून तयार केली जात होती. मी स्वतः ठरवून नाही, ती हस्तेपरहस्ते तयार होत होती. पण असं कधी वाटलं नाही, की मोठेपणी आपण नटबीट व्हावं. खरं तर या काळात कव्वाली गात होतो. गाणी रचत होतो. म्हणजे सतत करत राहून घडत होतं. 
सुरुवातीला मी म्हटलं, "एका तालेवार आईबापाची लेक एका तालेवार घरात सून म्हणून रूजू झाली.' खरंच होतं ते! पण हळूहळू चित्र बदलत गेलं.

चित्र बदलण्याला आईवडील स्वतःच जबाबदार होते. एकत्र कुटुंबातून ते वेगळे झाले आणि आमच्या आजोबांनी वडिलांना शेतीपासून वंचित केलं. परिणाम आईवडिलांना शेतमजूर म्हणून काम करणं भाग पडलं. याचा परिणाम आमच्यावरही झाला. सुटीच्या दिवसांत उन्हाळी कामं करावी लागली. जंगलात तेंडूची पान तोडणं वा पुलावरची सिमेंट-रेतीची कामं म्हणजे जोडणीचा मसाला बनवणं किंवा सिमेंटचं पोतं तीन-चार किलोमीटर खांद्यावरून वाहून नेणं. या बरोबरच उमरेडजवळच्या पांढराबोडी धरणावरही काम करावं लागलं. अर्थात कामातून मिळणारा पैसा, पुस्तकं खरेदी करण्यासाठी वा शाळेचे कपडे वगैरे घेण्यासाठी उपयोगी येई. वडील घर चालविण्यासाठी शेतीच्या कामाबरोबरच वीटभट्टीवरही काम करीत. अलिप्तपणे आज विचार करतो तर हसू येतं. तालेवार शेती कुठं गेली? 

दहावीनंतर उमरेड सुटलं. नागपूरला कॉलेजसाठी स्थलांतर. दहावीला 72 टक्‍क्‍यांनी पास झालो. सायन्स विषय घेऊन पुढं शिकावं ही इच्छा, पण अनेकांनी भय दाखवलं. सायन्स कठीण असतं, इंग्रजी उत्तम हवं. शेवटी आर्टला-मॉरीस कॉलेजला ×डमिशन. कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रिझर्व्ह बॅंकेच्याशेजारी आणि मुक्कामाला बीनाकी- 7-8 मैलांपेक्षा दूर. चालून थकून जायचं. सायकल घ्यायला पैसे? तीन महिने ही पायपीट मग कधीतरी इंदोरा इथे स्थलांतरित झालो. 

दोन वर्ष नागपुरात काढली... यादरम्यान एक घटना घडली ती सांगितली पाहिजे. मॉरीसचं "प्री'चं वर्ष. सहामाही परीक्षा संपली आणि काही दिवसांनी मराठी शिकवणाऱ्या सरांनी भेटीला बोलावलं. म्हणाले, "तू गावाकडून आलेला. तुझं मराठी इतकं चांगलं कसं? सहामाही परीक्षेत तुला प्रथमवर्ग मिळाला. तुझी दहावीची मार्कशीट पाहिली. तुला मराठीत 81 टक्के मार्क्‍स आहेत. कसे?' झ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी शांत होतो. ते म्हणाले, "छान, व्यासंग सुरू ठेव.' अशी आस्थेवाईक चौकशी करणारे ते सर होते, शरदचंद्र मुक्तिबोध. पण हे सारं तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. 

जेमतेम दोन वर्ष नागपुरात... फर्स्ट इयर पास होईस्तो नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग होतं बडोद्याला. गाठलं बडोदा. सांगतो कुणाला... "गरिबीची माय बाळंत होईल आणि सुखाच्या बाळाला जन्म देईल.' अशी स्वप्नं पडत होती नं!!! 

तीन महिन्याचं ट्रेनिंग संपलं. पोस्टिंग मुंबईत. आरएमएसचं ऑफिस. एअर पोर्ट सॉर्टिंग ऑफिस. पत्र छपाई दप्तर. थेट ऑफिसमध्येच प्रवेश. तिथंच रात्री मुक्काम. मच्छरांच्या सोबत. विमानाच्या हॅंगरमधलं ऑफिस. सडाफटिंग. मुंबईत पाऊल ठेवलं ते असं. कुणाला प्रेम वाटेल या शहराविषयी? बेदरकार शहर! या शहराला आपलंसं करायचं चॅलेंज समोर होतं. 
"कुठून आली पोरं?' एक कुजबुजता आवाज कानी आला. मी जागाच होतो. उठून बसलो. संवाद झाला. आणि मुंबई या अवाढव्य शहरात, कुणीही ओळखीचं नसताना राहण्याचा प्रश्‍न सुटला. भट नावाच्या त्या गुजराथी माणसानं आपली रिकामी असलेली खोली राहायला दिली. भाडं होतं रुपये पंधरा आणि खोलीत राहणारे तिघं. नव्यानं नोकरीत रुजू झालेले. 

मढ आयलॅंडकडे जाणाऱ्या रोडवरचं मालवणी... दहा बाय बाराच्या खुराडेवजा खोल्या. पण त्या वेळी ताजमहालपेक्षा श्रेष्ठ होत्या. रात्रीच्या झोपेला आसरा मिळणं, कोण आनंद असतो... मला तो मिळाला. यै मुंबै ऋणी आहे गं मी तुझा... खरंच ऋणी आहे. लालबाग-परळमधून रात्रीच्या वेळी फेरी मारताना, कामानिमित्त तर फुटपाथवर विसावलेले असंख्य थकलेले जीव पाहिले, की मुंबईनं मला दिलेल्या त्या सुखाची तुलना होऊच शकत नाही, कशाशीच! पहिल्या फटक्‍यातच मुंबईनं मला चांगले मित्र दिले. रामकृष्ण गाडगीळ, भास्कर सोनावणे, सुरेश पाथरकर, आप्पा पुराणिक. आम्ही एकत्रित येऊन "नाट्यसहकार' नावाचा नाट्यग्रुप उभा केला आणि "करायला गेलो एक'सारखं नाटक गणपती उत्सवात सादर केलं. "साहित्याचा कारखाना'सारखी एकांकिका, "पार्ले म्युझिक सर्कल'च्या एकांकिका स्पर्धेत सादर केली आणि त्याच कालखंडात उत्तर भारतीय व्हायलिन वादक शर्मा, आंधळा होता नि जो माझ्या शेजारीच राहायचा, त्याच्या ओळखीनं "भद्रंभद्र' या गुजराती नाटकात एक भूमिकाही केली.

त्या वेळी प्रयोग सादर झाला होता के. सी. कॉलेजच्या हॉलमध्ये नि मानधन मिळालं होतं रुपये पाच. कवी प्रेमानंद म्हणून नाव छापून आलं होतं. 

अन्‌ मी "गज्वी' झालो... 

कव्वालीची आवड पूर्ण करण्यासाठी मी गोविंद म्हशीलकरांच्या कव्वाल पार्टीतच सामील झालो. माझं नाव आनंद गजभिये. या पहाडी पण गोड गळ्याच्या कव्वाली गायकानं माझं नावच बदलून टाकलं. "कितना लंबा है आप का नाम... गजभिये... छोटा कर दूँ!' आणि ते मला "गज्बी' म्हणू लागले. मी गाणी लिहित असे आणि गाण्यात शेवटी "तुका म्हणे'च्या धर्तीवर "गज्बी कहे' टाकू लागलो.

गज्बीऐवजी गज्वी. कारण हिंदी-उर्दू गझल लिहायची तर गज्बी खटकायचं नि असं काही नाव नव्हतं अस्तित्वात म्हणून "गज्वी' आणि "गज्वी' हे नाव मुस्लिम समाजात रूढ होतं. मी गाण्याच्या पुस्तकाचं नाव "आनंद गीते' ठेवणार होतो तर गोविंदजी म्हणाले, "इस नाम की किताब तो है!' "ठीक है' प्रेमानंद गीते' करते है!' आणि माझं नाव बदललं गेलं. मुंबईत आलो आणि आनंद गजभियेचा मी प्रेमानंद गज्वी झालो! 
स्थळ बदलल्यानंतर नव्या ठिकाणी आपली रुजवात नीट होईल की नाही, ही भीती असतेच.

ही भीती मनात वागवत जगत असताना पहिली कथा लिहिली "भिंत'. ती एका दैनिकात रविवार आवृत्तीत प्रसिद्ध झाली. लिहिली, पाठवली, छापून आली, स्वप्रयत्न... आणि पुढं "घोटभर पाणी' या एकांकिकेनं तर नाट्यवाङ्‌मयात स्वतःचा एक वेगळा "इतिहास' घडवला. पण सुरुवातीला कोण हा प्रेमानंद गज्वी? यु. पी. बिहारचा..? असं नाव कुठं महाराष्ट्रात आहे? असेल बंगाली वगैरे किंवा मुसलमान! ब्राह्मणच असेल! इतकं चांगलं दुसरं कोण लिहिल? हे संवाद थेट कानावर आदळत राहिले शिवाजी मंदिरच्या, छबिलदासच्या कट्ट्यावर! 

"घोटभर पाणी' या एकाच एकांकिकेनं विजय तेंडुलकर, माधव मनोहर, सुधीर दामले, गंगाधर पानतावणे, राजा ढाले, राम पटवर्धन, मित्रयादीत आले. डोक्‍यावर हातच होता म्हणाना! "घोटभर पाणी'नंतर गज्वीनं काहीच लिहिलं नसतं तरी तो महत्त्वाचा लेखक मानला गेला असता,' असं कौतुक ऐकलं आहे मी. पण आजूबाजूचं जग इतकं प्रश्‍नग्रस्त आहे की ज्याचं नाव ते! आणि डोळसपणे समाजाकडे लक्ष असेल तर नवं गवसतं, असा माझा अनुभव आहे. म्हणून लिहित राहिलो.

"किरवंत'पर्यंत... त्यानंतरही बरंच काही लिहिलं वेगवेगळ्या प्रश्‍नांवर, वेगवेगळ्या विषयांवर. 
मराठीच्या सीमा पार करत "किरवंत' भाषांतरित झालं. याचा मनस्वी आनंद होत असताना एखादा चुकार सूर कानी पडतोच. आजही. 

"किरवंत! ब्राह्मणातही अस्पृश्‍यता? खरंच असं आहे?' 
शांत... काहीही बोलत नाही. शांत असतो! पण आत... शांततेच्या पोटात लाव्हा खदखदत असतो, तरीही मी शांत असतो! काय बोलणार नं! 

- premanandgajveeg@gmail.com

इतर ब्लॉग्स