ज्याचं त्यालाच उपसावं लागतंय.

श्रीराम गरड
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

''मह्या बापानं शिकू दिलं असतं तर, कुठं मंबई पुण्याला कुणा नोकरदाराच्या घरात असते म्या. तुमच्या मागं इथं रानात काम करायला नसते. काम करू करू आपलं आयुष्याचं पार पाचराट झालंय. पण पदरात असलेल्या दोनं पोरांना चांगलं शिकवू. कामधंद्याला लावू, आयुष्यभर पोरं सावलीत बसत्यानं.म्हंजी आपुन बिनघोर.''

"मोठं पोरगं पाचवीला जाईल. गावात शाळा भी चांगली नाय. इथं मास्तर भी चांगले नाईत. पोरांचं वाट्योळ होतंय. त्यामुळे पोरांस्नी आपुन तालुक्याच्या शाळात घालू,'' , असं नंदी उठल्या उठल्या नवरा खंडोबाला सांगत होती.

 ''नंदे, तू काय येडी बीडी झाली की काय, तालुक्याच्या शाळात पोरास्नी घालायचं म्हणलं तर लई पैका लागतोय. तिथं पोरांस्नी ठेवायचं म्हणलं तर, आपल्या ओळखी पाळखीचं भी कुनी नाय, पोरं भी लहान हाईत. तीथं त्यांना एकट्याला सोडणं भी आपल्याला जमायचं नाय. अन् आपले दोन्ही पोरं तीथं म्हणल्यावर आपला जीव इथंलच्या कामात लागंल का?'' , असं खंडोबाही नंदीला समजावून सांगत होता.पण, नंदी अयकायला तयारच नव्हती.

''मह्या बापानं शिकू दिलं असतं तर, कुठं मंबई पुण्याला कुणा नोकरदाराच्या घरात असते म्या. तुमच्या मागं इथं रानात काम करायला नसते. काम करू करू आपलं आयुष्याचं पार पाचराट झालंय. पण पदरात असलेल्या दोनं पोरांना चांगलं शिकवू. कामधंद्याला लावू, आयुष्यभर पोरं सावलीत बसत्यानं. म्हंजी आपुन बिनघोर.''

'' वावराचं घेऊन बसलात तर वावर भी किती हाई आपल्याला साडे तीन एकर. त्यातलं 10 गुंठे तर विहरीपाई पडीकच पडल्यालं हाय. हे घर, ह्यो उकाडा, गुरांची जागा, अन् शेजारून गेलेला ह्यो ओढा याच्यात भी किती मोठं वावर गुतलंय. अन् राहिलेल्या वावरात पिकतंय तरी काय. ह्यो देवभी आपली शेतकऱ्यांचीच परिक्षा घेतो.''

''आवंदा पाऊस भी नाई झाला रट्टावून. पेरलं ते भी उगाल नाही. सगळं पैकं मातीत गेलेत. जे आलंय त्यातून खायचा प्यायचा अन् कपड्यालत्ताचा खर्च भी निघणार नाही. म्हैस अन् कालवड टाकू इकून. त्यातून दोन चार पैकं भेटतील. पोरांना शाळात घालू, अन् आपूण भी काम धंदा शोधू तव्हार हे पैकं वापरू.'' , असं नंदी खंडोबास्नी पटवून देत होती.

त्यानं भी दोन चार दिस इचार केला. गावात कोण वावर बटाईनं करतंय का म्हणून दोन टाईम गावात जाऊन चौकशी केली. पण आंवदा पाऊसच पडला नाही. म्होरल्या सालाला भी पडेल की नाय हे ठावं नाय. म्हणुन कुणी करायला भी तयार होईना. काही जुळत नाय म्हणल्यावर यानं आपल्या मोठ्या भावालाच सगळी जमिन कसायला दिली. जे पिकल ते सगळं तुला ठेव. कधी महिन्याकाठी बाजरीची, ज्वारीची गोणी लागली तर देत जा बाकी काहीही नको. या वायद्यावर सगळी जमीन भावालाच कसायला दिली. जनावरं भी इकायचा बेत पक्का केला. बुधवारी तालुक्याचा बाजार असतुया. म्हणून तांबंड फुटायच्याच आत म्हसाड अन् खाटी कालवड बाजारात न्यायची होती. टेम्पोवाल्याला 200 इसार भी देऊन ठेवलेला. त्यामुळं तेव भी येळेवरच आला होता.

"नंदे चहा ठेव. टेम्पोवाला आलाय". असं म्हणत त्यानं नंदीला आवाज दिला. तिनं भी चुलीत लाकडं कोंबून फुंक मारत चुल पेटवली अन् चहाचं पातेलं ठेवलं.

तव्हार टेम्पोवाला अन् खंडोबा म्हैस कुठून टेम्पोत चढीता येईल यांच्यासाठी जागा शोधू लागले. खंडोबा म्हणाला पाहुणं उकांडा हाई की उकांड्याला खेटूनच टेम्पो उभा करू. म्हंजी उकाड्यावरून म्हसाड चढवायला  सोपं जाईल. त्यामुळं टेम्पो उकाड्याच्या कडेला लावून दिला. तव्हार चहा भी तयार झालेला. नंदीनं हाका मारून खंडोबाला बोलवलं अन् दोघांस्नी चहा दिला.

म्हसाड अन् कालवडीला टेम्पोत भरायच्या अगोदर नंदींन म्हसाड अन कालवडीच्या पायावर तांब्याभर पाणी ओतलं. कपाळावर हळद कुंकु वाहिलं. टोपल्यातली शिळी भाकर म्हसाड अन् कालवडीच्या तोंडात भरीली अन् दोन्हींच्या तोंडावरून मायेचा शेवटचा हात फिरवला.

म्हसाड आता दोन वर्षापुर्वी पोरांस्नी दुध लागंत म्हणून आणलेली. पण कालवड नंदीच्या बापानं नंदीला लग्नानंतर दिली होती. तिचे लई दुध दुभते नंदीनं केले होते. तीच्यामुळं नंदीच्या घरी गोकुळ नादलं होतं. त्यामुळं नंदीला ह्या कालवडीचा लईच लळा होता. पण ईलाज नव्हता पोरास्नी शिकवायचंय तर पैका भी लागणार होता. आंवदा जनावरांना वर्षभर खायला पुरेल असं वावरात पिकलं भी नव्हतं. अन् अशा वेळेस हि मुकी जनावर कोणी संभाळायला भी घेणार नव्हतं. म्हणून ईकल्याशिवाय पर्याय नव्हता.

खंडोबानं अन् टेम्पोवाल्यानं थ्रुंब थ्रुंब करत म्हसाड अन् कालवडीला टेम्पोट घातलं अन जाम आवळून बांधलं. नंदीचा निरोप घेऊन खंडोबा टेम्पोत बसून बाजारला निघाला होता. मात्र टेम्पो नजरेआड होईस्तोवर नंदी पाहतच होती. खंडोबानं दोन्ही जितराभ ईकली. सांच्याला येताना बाजारातून पोरांस्नी गोडधोड खायला आणलं.

पुढच्या दोन दिसात दोघांनी सगळं काम आवरलं अन् बालबिस्तरा भरला. उद्या सकाळीच सातच्या एसटीनं तालुक्यास्नी जायचं होतं.दोघांच्या लग्नाला बारा वरीस झालं होतं. त्यामुळं या वर्षात नंदीनं भावकीत, गावात, शेजारपाजाऱ्यात जमवून घेतलं होतं. अन् खंडोबाचा जन्म रया गावात झालेला. त्यो लहानचा मोठा याच गावतल्या गल्लीत, ओढ्या-नदीत, गावच्या डोंगरात, गावतल्या शाळात अन् पारावरच्या मंदिरातच झाला होता. त्यामुळं गाव सोडणं दोघांनाही जड होतं. दोघांनीही सगळ्यांना भेटून घेतलं होतं. वावरातल्या विहरीकडं चक्कर मारली होती. म्हतारा म्हतारीच्या समाधीला जाऊन हात जोडून आले होते.

 दोघांनीही न बोलता संध्याकाळचं जेवणं उरकलं. पोरं कव्हाचीच जेवून झोपली होती. नंदीनं अंगणताच तळवट अंथरीला. त्यांच्यावर गोधडी टाकली अन् बाजेवर झोपलेल्या दोन्ही पोरांस्नी अंथरूणावर झोपवलं. अन् त्यांच्याशेजारी झोपली.  खंडोबानं तंबाखू मळली, तोंडात इडा टाकला अन् आभाळाकडं तोड करत अंथरूणावर पडला.

आकाश मोकळं होतं, चंद्र दिसत होता. चांदण्या पडल्या होत्या. रात्र वाढत होती, रातकिड्यांचा आवाज येत होता, मधीच कुत्रे ओरडत होती. मात्र हे मोकळं आकाश,चांदोबा, चांदण्या, काळोखी रात्र, रातकिड्यांचा आवाज हे सगळं शहरात गेल्यावर अनुभवायला भेटणार आहे की नाही? या विचारात दोघंही झोपी गेले होते.

क्रमश:

इतर ब्लॉग्स