चित्रपट महोत्सव - एक "पाहणे'

महेश बर्दापूरकर 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व एकदा "कन्फर्मेशन' आल्यानंतर सुरू होते प्रवास, तिथं राहण्याची व खाण्याची व्यवस्था यांची जुळवाजुळव. हे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरचा खरा आनंद असतो तो महोत्सव अनुभवण्याचा... 

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व एकदा "कन्फर्मेशन' आल्यानंतर सुरू होते प्रवास, तिथं राहण्याची व खाण्याची व्यवस्था यांची जुळवाजुळव. हे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरचा खरा आनंद असतो तो महोत्सव अनुभवण्याचा... 

महोत्सवात दरवर्षी दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या 200पेक्षा अधिक असते. सामान्य प्रेक्षकांना केवळ सात दिवसांत दोनशे चित्रपट कसे पाहून होतात, ही शंका येते आणि ती साहजिकच आहे. महोत्सवाच्या वाऱ्या करणाऱ्यांना हे गणित बरोबर सुटतं किंवा ते त्यांनी आपल्या परीनं सोडविलेलं असतं. म्हणजे असं की, महोत्सवामध्ये अनेक विभाग पाडलेले असतात. त्यामध्ये महत्त्वाचा विभाग असतो इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. या विभागामध्ये जगभरातातून नोंदणी केलेल्या अनेक चित्रपटांतून 15 चित्रपट स्पर्धेसाठी निवडले जातात. हेच 15 चित्रपट सर्व ज्युरी मेंबर्स पाहतात व त्यातूनच सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून, अभिनय, दिग्दर्शन आदी पुरस्कार दिले जातात. त्यामुळं कोणताही मुरलेला "महोत्सववीर' यातील जास्तीत जास्त चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतोच. या चित्रपटांतील बहुतांश निर्माते, दिग्दर्शक, कलाकार महोत्सवाला उपस्थित असतात व चित्रपटापूर्वी व त्यानंतर त्यांचे विचार ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. त्यातून त्यांची चित्रपट बनविण्यामागची प्रेरणा, केलेले प्रयत्न यांचीही माहिती मिळते. 

"वर्ल्ड पॅनोरमा' हा महोत्सवातील दुसरा महत्त्वाचा विभाग. यामध्ये 60च्या आसपास सिनेमांचा यावर्षी समावेश होता. यामध्येही जगभरातून आलेले त्या-त्या देशांचे त्यावर्षी नावाजलेले चित्रपट पाहण्याची संधी मिळते. या प्रकारामध्ये चित्रपटांच्या कथेत, मांडणीत, सादरीकरणात मोठं नावीन्य पाहायला मिळतं. या प्रकारातील सिनेमे "माऊथ पब्लिसिटी' याच निकषावर पाहण्यासाठी निवडावे लागतात. पहिल्या दोन-तीन दिवसांत महोत्सवाच्या ठिकाणी अमुक एक चित्रपट "मस्ट' आहे, अशी चर्चा रंगते व प्रेक्षक वेळापत्रक पाहून तो पुन्हा कोणत्या दिवशी आहे याचा अंदाज घेऊ लागतात. तो वेळापत्रकात नसल्यास मात्र हुरहूर लागते व पुढच्या एखाद्या महोत्सवात तो पाहण्याचे मनसुबे रचण्याशिवाय पर्यायच राहात नाही. तर, या दोन प्रकारांतील सुमारे 75 सिनेमांपैकी तुम्ही जास्तीत जास्त किती सिनेमे पाहू शकता, हे महत्त्वाचे ठरते. 

महोत्सवात काही छोटे विभागही असतात. यामध्ये "इंडियन पॅनोरमा', "फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप', "युनेस्को गांधी पदका'साठी नोंदविलेले सिनेमे, एक देश आणि एका दिग्दर्शकावर प्रकाशझोत टाकणारा विभाग, त्यावर्षी निधन पावलेल्या भारतीय कलाकार, दिग्दर्शक आदींना आदरांजली वाहणारे चित्रपट दाखविणार विभाग यांचा समावेश असतो. 

प्रेक्षागृहे आणि रांगा 
महोत्सवाला प्रवेश मिळाल्यानंतर डेलिगेट, मीडिया, प्रायोजक, पाहुणे आदींसाठी वेगवेगळे कलरकोड असलेली ओळखपत्रं वाटली जातात. या ओळखपत्रावरील बारकोड स्कॅन झाल्याशिवाय तुम्हाला महोत्सवाच्या ठिकाणी अथवा कोणत्याही प्रेक्षागृहात प्रवेश मिळत नाही. त्यामुळं हे ओळखपत्र सतत जवळ किंवा अगदी गळ्यातच ठेवणं गरजेचं ठरतं. हे ओळखपत्र मिळाल्यानंतर दरदिवशीच्या वेळापत्रकानुसार तिकिटांचं वाटप केलं जातं. यामध्ये डेलिगेट्‌सना दररोज तीन आणि मीडियाला पाच चित्रपट पाहण्याची संधी मिळते. वेळापत्रकानुसार चित्रपटांची निवड करून तिकीट खिडकीवर जाऊन त्या चित्रपटाचं तिकीट घेणं अपेक्षित असतं. (त्याला वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत, रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येकाला ती मिळतात.) आता हे तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला रांगेत उभं राहून प्रेक्षागृहात प्रवेश मिळवावा लागतो. समजा तुमचा तिकिटांचा कोटा संपलेला असूनही तुम्हाला एखादा चित्रपट पाहायचाच असल्यास त्यासाठीही एक पर्याय उपलब्ध असतो. नॉन तिकीट किंवा रश लाइन हा तो पर्याय. यामध्ये प्रेक्षकांनी रश लाइनमध्ये जाऊन उभं राहणं अपेक्षित असतं. तिकीट काढलेल्यांची लाइन संपल्यानंतर किंवा चित्रपट सुरू होण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी राहिल्यानंतर रश लाइनमधील प्रेक्षकांना प्रेक्षागृहात सोडण्यास सुरवात होते. आतील सीट पूर्ण भरल्यानंतर प्रवेश देणं बंद केलं जातं. 

गोवा फिल्म फेस्टिव्हलसाठी आयनॉक्‍स या सिनेमागृहाचे चार स्क्रीन व गोवा कलाअकादमीचे एक प्रेक्षागृह उपलब्ध असते. यातील आयनॉक्‍सच्या चारपैकी दोनची संख्या 700च्या पुढं तर उरलेल्या दोनांची 500 पेक्षा कमी आहे. गोवा कलाअकादमीमध्ये एकाच वेळी 1200 प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपटांना सर्वाधिक गर्दी असते व त्यासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागतात. हे चित्रपट शक्‍यतो गोवा कलाअकादमीमध्येच दाखविले जातात. (यंदा नियोजनातील अभावामुळं स्पर्धेतील काही सिनेमे आयनॉक्‍समध्ये ठेवण्यात आले व त्यामुळं पहिले चार दिवस मोठा गोंधळ उडाला. प्रेक्षकांचा मोठा रोष आयोजकांना सहन करावा लागला व दुसऱ्या टप्प्यात त्यात सुधारणा करणं त्यांना भाग पडलं.) एखादा चित्रपट तिकिटं काढलेल्यांच्या संख्येमुळंच हऊसफुल झाल्यास रश लाइनमधील प्रेक्षकांना माघारी फिरावं लागतं. आयनॉक्‍स आणि गोवा कलाअकादमी या दोन प्रेक्षागृहांदरम्यानचं अंतर एक किलोमीटरपेक्षा थोडं जास्त आहे. त्यामुळं चित्रपटाची वेळ आणि ठिकाण यांचा अचूक अंदाज घेऊन तुम्हाला चित्रपटांची निवड करावी लागते व त्यानुसार तिकिटं काढावी लागतात. अन्यथा, तुमचंच वेळापत्रक कोलमडतं, काही वेळ फुकट जातो किंवा रश लाइनमध्ये उभं राहून चित्रपट पाहण्याचा चान्स घ्यावा लागतो. 

सीट, फोन, एटिकेट्‌स 
प्रेक्षागृहात प्रवेश केल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम असल्यानं रांगेत पुढं असणाऱ्यांना मागील बाजूची व अगदी मधली सीट पटकावता येते. यासाठी प्रेक्षक आटापिटा करताना दिसतात. रश लाइनमधून शेवटी आलेल्या प्रेक्षकांना जागा आहे तिथं बसावं लागतं. चित्रपट सुरू होण्याआधी चित्रपटाची थोडक्‍यात माहिती दिली जाते व त्याचवेळी मोबाईल फोन बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याचं आवाहनही केलं जातं. जर चुकून तुमचा फोन सुरू राहिला आणि त्यांची घंटी वाजली, तर जवळपासच्या प्रेक्षकांच्या जोरदार टोमण्यांचा मारा सहन करावा लागलाच म्हणून समजा! अनेक अननुभवी प्रेक्षकांना चित्रपट सुरू असताना फेसबुक, व्हॉट्‌सअप पाहण्याची हुक्की येते. प्रेक्षागृहाच्या अंधारात जवळपासच्या प्रेक्षकांना या उजेडाचा त्रास होत असल्यानं त्याला तो बंद करण्याच्या सूचना मार्मिक भाषेतून ऐकाव्या लागतात. प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ अथवा पाणी नेण्याची परवानगी नसल्यानं त्याचा त्रास होत नाही, मात्र शक्‍यतो प्रेक्षकांना त्रास होईल अशा पद्धतीनं मध्येच उठून जाणं, खूप उशिरानं प्रवेश करणं या गोष्ट टाळलेलंच श्रेयस्कर ठरतं! 

कशासाठी? पोटासाठी... 
महोत्सवामध्ये सकाळी नऊपासून रात्री अकरापर्यंत चित्रपट दाखविले जातात. दोन चित्रपटांमध्ये अर्ध्या ते पाऊण तासाचं अंतर असतं. त्यामुळं जेवण, चहा, नाश्‍ता यांचं वेळापत्रक आखणं ही तारेवरची कसरत ठरते. आयनॉक्‍समधील पदार्थांच्या दराची कल्पना असणाऱ्यांना हा किती महागडा प्रकार असू शकतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आयोजकांकडून आयनॉक्‍सच्या आवारात खाद्याच्या अनेक स्टॉल्सना परवानगी दिली जाते. गेली काही वर्षं महिला बचतगटांचे स्टॉल्सही येथे होते. तेथील पदार्थ स्वस्त व खाण्यास सुटसुटीतही असायचे. वडापाव, दाबेली, इडली-डोसा, पोळी-भाजी अशा पदार्थांना प्रेक्षक पसंती देत असत. यंदाच्या वर्षी काही तांत्रिक कारणांमुळं या गटांनी स्टॉल्स लावले नसल्याचं समजलं. त्यामुळं प्रेक्षकांचे हाल झाले व एकमेव फुडमॉलवर लोक गर्दी झाली. तेथील पदार्थ न आवडणाऱ्यांसाठी प्रेक्षागृहाच्या बाहेर असलेल्या निवडक हॉटेलमध्ये जाऊन खाण्याशिवाय पर्याय नसतो. तिथंही वेळेत ऑर्डर घेतली जाऊन अपेक्षित वेळेत पुन्हा प्रेक्षागृहावर पोचण्यासाठी आटापिटा करावा लागतो. गोवा कलाअकादमीमध्ये एकमेव कॅन्टीन असून, तिथंही पदार्थ घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. व्हेज व नॉनव्हेज बिर्याणी, पुलाव, बर्गर, हॉटडॉग, समोसा, केक हे इथले काही पदार्थ प्रेक्षक आवडीनं खातात. इथला चहाही दहा रुपये असल्यानं परवडतो. (माध्यमांसाठी मीडिया सेंटरमध्ये दिवसभर चहा आणि कॉफी व त्याच्याबरोबर बिस्कीट-केक अशी व्यवस्था असते. या वर्षी प्रथमच ही सेवा संपूर्ण महोत्सवाच्या कालावधीत व अत्यंत तत्पर असल्यानं मीडियाचे प्रतिनिधी खूष होते.) गोव्यात रात्री नऊनंतर बाहेर काही खायला मिळणं अशक्‍यच असल्यानं त्यादृष्टिनं नियोजन करणंही गरजेचं ठरतं. रात्री नऊनंतर बससेवाही बंद होत असल्यानं महोत्सवाच्या ठिकाणापासून लांब राहणाऱ्यांना रात्रीचे चित्रपट न पाहणं किंवा पायी जाण्याची तयारी ठेवणं, हेच पर्याय असतात. 

...आणि चित्रपट 
एवढ्या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर चित्रपट पाहणं आणि त्याचा आस्वाद घेणं हा खरंतर अमृतानुभवच. जगभरातील चित्रपट, त्यांची सादरीकरणाची पद्धत, विषयांतील वेगळेपण, अभिनय, संगीतातील प्रयोग अशा अनेक गोष्टी अगदी मंत्रमुग्ध करतात. भारतातील मेनस्ट्रीम सिनेमांतील मोठा मेलोड्रामा असलेल्या कथा, प्रेक्षकांना प्रत्येक गोष्टी समजावूनच सांगणार ही दिग्दर्शकांची मानसिकता, भरमसाट गाणी व मोठी लांबी यांच्या तुलनेत हे चित्रपट अत्यंत पॉलिश्‍ड, नेमके व फापटपसारा न मांडता हवा तो संदेश देणारे असतात. (भारतातही प्रमाण कमी असले तरी आता असा सिनेमा बनतो आहे.) आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील युक्रेनचे "डोनबास' व "व्हेन द ट्री फॉल्स', बल्गेरियाचा "अगा', पोलंडचा "53 वॉर्स' असे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. जाफर पनाही या इराकी दिग्दर्शकाचा "3 फेसेस', प्रवीण मोरछाले दिग्दर्शित लडाखी चित्रपट "वॉकिंग विथ द विंड' अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. महोत्सवाला जाणं आणि सादर होणारे चित्रपट अनुभवणं हा खरंच रोमांचकारी व संस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकांनं एकदा तरी घ्यावा असाच हा संपन्न करणारा सोहळा असतो...

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या